अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्यास एक वर्षे सक्तमजुरी

औरंगाबाद,१८ जानेवारी / प्रतिनिधी :- लग्नाचे आमिष दाखवुन अल्पवयीन मुलीला पळवुन नेणारा जालिंदर  रामराव मकासरे (३२, रा. भागाठाणा ता. गंगापुर) याला एक वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्‍यायाधीश के.आर. चौधरी यांनी ठोठावली.

या प्रकरणात १५ वर्षीय पीडितेच्‍या आईने फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, फिर्यादी या मेस चालवतात. ३ जून २०१९ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पीडिता ही कपडे वाळत घालून गॅलरीत बसलेली होती. फिर्यादी या आंघोळीला गेल्या होत्‍या. आंघोळ व घरातील काम आटोपल्यानंतर फिर्यादी या आईकडे जावून बसल्या काही वेळाने पीडिता घरात नसल्याचे त्‍यांच्‍या लक्षात आले. फिर्यादीने सर्वत्र पीडितेचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही. त्‍याच वेळी पिरसरात रुम करुन राहणारा जालिंदर मकासरे हा देखील पसार असल्याचे फिर्यादीच्‍या निदर्शनास आले. या प्रकरणात वेदांतनगर पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

पोलिसांनी तपासकरुन पीडितेला ताब्यात घेतले. १९ जून २०१९ रोजी पीडितेने जबाब दिला. त्‍यात घटनेच्‍या एक ते दीड वर्षांपूर्वी आरोपी मकासरे हा फिर्यादीकडे जेवणाचा डबा घेण्‍यासाठी यायचा. त्‍यावेळी पीडितेची आणि आरोपीची ओळख झाली. कधी-कधी पीडिते त्‍याला डबा घेवनू त्‍याच्‍या रुमवर जात होती. तर कधी-कधी फिर्यादी देखील पीडितेला शाळेत नेऊन-आणुन सोडण्‍याचे काम आरोपीला सांगत होती. त्‍यातच त्‍यांची चांगली मैत्री झाली, ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. घटनेच्‍या पाच महिन्‍यांपूर्वी आरोपीने पीडितेला आपण पळून जावून लग्न करु असे सांगितले.

त्‍यानूसार ३ जून २०१९ रोजी दुपारी दोन वाजेच्‍या सुमारस पीडितेने घरातून २०० रुपये घेवून घरातून पळ काढला. आरोपी मकासरे याने तिला दुचाकीवर बसवून हरेगाव येथे आत्‍याकडे आणले. ३ ते १८ जूनपर्यंत दोघे तेथेच राहिले. १८ जून २०१९ रोजी आरोपीचा भाऊ बबन ऊर्फ बाळु हा हरेगाव येथे आला. त्‍यानंतर पीडितेला फिर्यादीच्‍या ताब्यात देण्‍यात आले.

खटल्याच्‍या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी चार साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपी जालींदर मकासरे याला दोषी ठरवून भादंवी कलम ६३६ अन्‍वये एक वर्षे सक्तमजुरी, एक हजार रुपये दंड दंड न भरल्यास १५ दिवसांच्‍या अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली.