महाराष्ट्राचा आवाज हरपला!-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली

जनहिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जपणारा तत्त्वनिष्ठ, निस्वार्थी नेता हरपला! -शरद पवार

मुंबई:– “शेतकरी व कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज हरपला आहे. महाराष्ट्राने एक संघर्षशील नेतृत्व गमावले आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.

मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले की, “एन. डी. पाटील हे राज्याच्या पुरोगामी विचारांचे व्यासपीठ होते. महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांची मशाल त्यांनी शेवटपर्यंत पेटत ठेवली. लढणे आणि संघर्ष करणे हेच त्यांचे जीवन होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातले ते एक बिनीचे शिलेदार होतेच, पण त्यानंतरच्या बेळगावसह सीमा लढ्यातील प्रत्येक आंदोलनात एन. डी. आघाडीवर होते. सीमा भागात जाऊन त्यांनी लढे दिले व पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचा चांगलाच स्नेह होता. महाराष्ट्राच्या विरोधात कोणी ‘ब्र’ काढलाच तर शिवसेनाप्रमुखांच्या बरोबरीने ‘एन. डी.’ उभे राहिलेच म्हणून समजा.

“अखंड महाराष्ट्रात बेळगावसह सीमा भाग यावा हा त्यांचा ध्यास होता. एखाद्या वादळासारखे ते शेतकरी, कष्टकऱ्यांच्या लढ्यात उतरत. महाराष्ट्रासाठी त्यांचे नेतृत्व प्रेरणादायी होते. एन. डी. पाटील यांच्या जाण्याने महाराष्ट्र राज्याचे अतोनात नुकसान झाले असून मी त्यांना महाराष्ट्र राज्यातर्फे आणि शिवसेनेतर्फे अभिवादन करतो,” अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी शोक व्यक्त केला.

ज्येष्ठ नेते प्रा एन. डी. पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

शरद पवार :-डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्रातील शेतकरी आणि कष्टकरी वर्गाप्रती सच्ची आस्था असलेला आणि जनहिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जपणारा तत्त्वनिष्ठ व निस्वार्थी नेता आज हरपला आहे. उपेक्षित लोकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी विधिमंडळातही आवाज उठवला, आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी सभागृह गाजवले.शेतकरी कामगार पक्षाची धुरा निष्ठेने सांभाळणार्‍या एन. डी. पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची जबाबदारीही त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात तितक्याच क्षमतेने पार पाडली. संस्थेच्या वाटचालीतील त्यांचे योगदान कधीच पुसले जाणार नाही.सर्व कुटुंबियांप्रति या दुःखद प्रसंगी सांत्वना व्यक्त करतो. प्रा. एन. डी. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

‘सामाजिक, राजकीय जीवनावर प्रभाव’
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. गडकरी यांनी म्हटलं आहे, ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. राज्याच्या सामाजिक व राजकीय जीवनावर प्रा. पाटील यांचा मोठा प्रभाव राहिला आहे. शेतकरी – कामगार यांचे अनेक प्रश्न त्यांनी वेळोवेळी मांडले व ते सोडवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो, असं गडकरींनी म्हटलं आहे. 

एन.डी.पाटील यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार प्राध्यापक एन.डी. पाटील यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

प्रा. एन डी पाटील हे जनसामान्य, कष्टकरी, शेतकरी व कामगारांसाठी अतिशय पोटतिडीकीने काम करणारे झुंजार नेते होते. कोणताही प्रश्न ते अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडत व त्याचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करत. शिक्षण क्षेत्राकरिता त्यांचे कार्य मोठे होते. अनेक आंदोलने व विधायक चळवळींना त्यांनी नेतृत्व प्रदान केले.  राज्य विधान मंडळाचे सदस्य म्हणून दीर्घ काळ काम करणारे प्रा. पाटील आदर्श लोकप्रतिनिधी होते.  त्यांच्या निधनामुळे शिक्षण, समाजकारण व राजकारण यांसह विविध क्षेत्रांमध्ये वावर असलेल्या एका प्रामाणिक लोकनेत्याला आपण मुकलो आहोत. दिवंगत प्रा. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील साहेब म्हणजे सामान्य माणसाच्या संघर्षाचा कृतिशील विचार

ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील साहेब म्हणजे सामान्य माणसाच्या संघर्षाचा कृतिशील विचार-उपमुख्यमंत्री अजित पवार

 “महाराष्ट्राच्या पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील साहेब म्हणजे सामान्य माणसाचा संघर्षाचा कृतिशील विचार होता. सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी जीवनाच्या अखेरपर्यंत ते संघर्ष करीत राहिले. त्यांच्या निधनानं शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, कष्टकरी, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांसाठी लढणारं संघर्षशील नेतृत्वं हरपलं आहे. सीमाभागातील मराठीभाषक बांधवांचा आधारवड कोसळला आहे. प्रा. एन. डी. पाटील साहेब निर्भिड, नि:स्पृह, निडर नेते होते. महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांशी प्रामाणिक राहून त्यांनी काम केलं. वयाच्या नव्वदाव्या वर्षीही रस्त्यावर उतरुन संघर्ष करणाऱ्या प्रा. एन. डी. पाटील साहेबांचं निधन ही महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीची मोठी हानी आहे. आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील पुलोद सरकारमध्ये त्यांनी सहकारमंत्री म्हणून काम केलं. आमदार म्हणून काम केलं. विधानमंडळातील प्रत्येक क्षण आणि प्रत्येक शब्द हा वंचित बांधवांना हक्क मिळवून देण्यासाठी उपयोगात आणला. प्रा. एन. डी. पाटील साहेब हे आमच्या कुटुंबातील सदस्य होते. त्यांचं निधन हे महाराष्ट्रातल्या, सीमाभागातल्या प्रत्येक कुटुंबाची हानी आहे. मी प्रा. एन. डी. पाटील साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करीत प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.

सार्वजनिक जीवनातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड – प्रा.एन.डी. पाटील यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची श्रद्धांजली

ज्येष्ठ नेते, माजी सहकार मंत्री प्रा. एन.डी. पाटील यांच्या निधनामुळे सार्वजनिक जीवनातील एक ऋषितुल्य, लढवय्ये, लोकाभिमुख व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी  प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

शोकसंदेशात श्री.चव्हाण यांनी नमूद केले आहे की, प्रा.एन. डी. पाटील हे विधिमंडळातील आणि चळवळीतील धडाडती तोफ होते. त्यांच्या निधनाने शेतकरी व कष्टकऱ्यांचा एक बुलंद आवाज हरपला आहे. त्यांचे संपूर्ण जीवन लोकांसाठी समर्पित राहिले. शिक्षण क्षेत्रातही त्यांनी मोठे योगदान दिले. सार्वजनिक संस्थांचा कारभार कसा चालवावा, याचे उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिले होते. आचार, विचार आणि कर्तृत्वाने राजकारणात व समाजकारणात त्यांचे एक वेगळे स्थान निर्माण झाले होते. त्यांचा जीवनपट व कार्य पुढील अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक राहिल, असे सांगून लोकनेते प्रा. एन.डी. पाटील यांना श्री. चव्हाण यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

देवेंद्र फडणवीस  :- गेले 7 दशकं अनेक सामाजिक-राजकीय घडामोडींचे साक्षीदार, धडाडीचे कामगार नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय वाईट वाटले.मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दु:खाच्या समयी त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकियांच्या दु:खात मी सहभागी आहे.शेतकरी-कामगारांचे अनेक प्रश्न त्यांनी धडाडीने सोडविले. गिरणी कामगारांच्या हक्कासाठी सुद्धा त्यांनी मोठा लढा दिला. सतत नवीन विचारांचा ध्यास ही त्यांची ओळख होती. सुमारे 22-23 वर्ष त्यांनी विधिमंडळ गाजविले. त्यांच्या निधनाने दूरदृष्टी लाभलेला नेता हरपला आहे.

प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनाने शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्याच्या प्रश्नांची तड लावणारे नेतृत्व हरपले – पालकमंत्री जयंत पाटील

प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनाने शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्याच्या प्रश्नांची तड लावणारे नेतृत्व हरपले – जलसंपदामंत्री जयंत पाटील

प्रा. एन. डी. पाटील यांनी नि:स्पृहपणे शेतकरी, कामगार वर्गासाठी आयुष्यभर जोमाने  संघर्ष  केला. अत्यंत अक्रमक शैलीत आयुष्यभर सत्तेच्या विरोधात राहून लढा देण्याची भूमिका त्यांनी स्वीकारली.  प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनाने शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्यांच्या प्रश्नांची तड लावणारे नेतृत्व हरपले, अशा शब्दात जलसंपदामंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली .

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, प्रा. एन. डी. पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची जबाबदारी समर्थपणे पेलली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अत्यंत पारदर्शीपणे रयत शिक्षण संस्थेने कार्य केले. त्यांच्या निधनाने अनेकांचे नुकसान झाले आहे. विशेषत: वाळवा तालुक्यातील जनतेचे फार मोठे नुकसान झाले आहे. वाळवा तालुक्यातील भूमी क्रांतीकारकांना, विचारवंतांना, समाजसुधारकांना जन्म देणारी भूमी आहे. या भूमीत प्रा. एन. डी. पाटील यांचा ढवळी येथे जन्म झाला. शिक्षणाच्या सामर्थ्यावर त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे कार्य केले. शिक्षण क्षेत्रात त्यांनी गाठलेली मजल मोठी आहे. ती गाठत असताना सत्तेच्या वळचणीला न बसता, संघर्ष हाच आपल्या आयुष्याचा प्रमुख भाग बनविला. प्रा. एन. डी. पाटील हे शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्याच्या प्रश्नांची तड लावणारे नेतृत्व होते. कोल्हापुरात राहून त्यांनी कोल्हापूरकरांच्या अनेक प्रश्नांची तड लावली. अशा या थोर नेत्याला भावपूर्ण श्रध्दाजंली!

दरम्यान, पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिवंगत ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.

‘अनुभवी नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला’
तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रा. एन डी पाटील यांच्या निधनावे खूप ज्येष्ठ आणि अनुभवी नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

ना. धों. महानोर:-

शिक्षणाशिवाय पर्याय नाही. गोर-गरीब, दुर्बल घटकातल्या कुठल्याही जाती जमातीच्या मुला-मुलींना मोफत शिक्षण द्यावं, विचार व संस्कार द्यावेत हा कर्मवीर भाऊराव पाटलांचा रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आदर्श निर्माण केला त्यासाठी प्रा. एन. डी. पाटील यांनी निष्ठापूर्वक योगदान दिलं.

May be an image of 4 people and people standing

शेतकरी व शेतमजूर पाण्याशिवाय शेती नाही. फळ प्रक्रिया, अन्न प्रक्रिया याशिवाय पर्याय नाही म्हणून शासन कुठलंही असलं तरी या पद्धतीचा विचार आमदार व मंत्री असतांना विधिमंडळात व त्याबाहेर अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीनं त्यांनी आयुष्यभर मांडला.शेतकरी कामगार पक्ष व त्या पक्षाच्या जाती-धर्मातीत अतिशय पुरोगामी विचारानं व लढाऊ बाण्यानं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सर्वंकष विचाराचा वसा घेऊन पाटील साहेब आयुष्यभर निष्ठापूर्वक काम करीत राहिले.१९७८ च्या काळात व नंतरही मी विधानपरिषदेत आमदार असतांना दुष्काळ, पाणी, शेती व समाज परिवर्तनाचा विचार यासाठी दिर्घ चर्चा घेऊन बोलत राहिलो त्यासाठी परिपूर्ण विचार, आकडेवारी व मागचा साध्यंत इतिहास मी त्यांच्याशी चर्चा करून व नोंदी घेऊन बऱ्याचदा बोलत होतो. माझ्या जडण घडणीत त्यांच्या जीवननिष्ठा, विचारनिष्ठा या मला खूप काही देऊन गेल्या.१९८० च्या जळगाव ते नागपूर शेतकरी दिंडीमध्ये देशातले अनेक पक्षांचे महत्वाचे नेते श्री. शरदचंद्र पवार साहेब यांनी जोडले होते. ही ऐतिहासिक शेतकरी दिंडी अनेक अर्थानी यशस्वी करण्यामध्ये जे काही पाच-पंचवीस लोक होते त्यात एन. डी. पाटील साहेब हे अग्रणी होते. ६ डिसेंबर १९८० दिंडीच्या सुरुवातीच्या आदल्या दिवशी दिवसभर संपूर्ण दिंडीचं आरेखन, देशभरचे वक्ते व शेतमालाच्या संबंधीतले महत्वाचे प्रश्न या त्यांनी व पवार साहेबांनी दिवसभर १४ तास बसून पक्के केले. पहिली सभा पळसखेड मध्येच झाली आणि जवळपास २ लाख लोकं सभेला अमरावतीमध्ये होती त्यामुळे राज्यातील व देशातील राज्यकर्ते हादरले व पोहोरा बंदीच्या जंगलात दिंडीला यशवंतराव चव्हाण साहेब, शरदराव पवार साहेब, राजाराम बापू पाटील साहेब, गणपतराव देशमुख साहेब यांसारखे नेते व एक लाख लोकांना अटक करण्यात आली व भांडाऱ्याच्या मार्केट यार्डच्या जेल मध्ये टाकून देण्यात आले. अशावेळीसुद्धा निर्धाराने प्रचंड गर्जना करून शेतकऱ्यांचा आवाज व प्रश्न याची तुतारी एन. डी. पाटील व त्यासारखे लोक तिथे मोठ्याने घुमवित राहिले. याशिवायच्या गेल्या ५० वर्षातल्या माझ्या व्यक्तिगत जीवनातल्या कुटुंबात व सार्वजनिक जीवनात ते माझ्यासाठी एक आधारवड होते.उतराई होण्यासाठी माझ्याकडे तसं काहीच नाही. एक छोटीशी गोष्ट माझ्या ३५ पुस्तकांपैकी ‘गाव गरुड’ हे पुस्तक मी त्यांना नम्रतापूर्वक अर्पण केलेलं आहे.प्रा. एन. डी. पाटील साहेब त्यांचं जगणं, सुरुवातीचा खडतर प्रवास, शिक्षणाचा व पुरोगामी विचारांचा त्यांनी आयुष्यभर निष्ठापूर्वक प्रत्यक्षात स्वतःला झोकून दिलेला विचार, प्रचंड वाचन व अभ्यासपूर्ण बोलणं हे नव्या पिढीतल्या तरुण-तरुणींनी जर घेतलं तर त्यांना एक नवी दिशा मिळू शकते असा मला विश्वास वाटतो.माझ्या कुटुंबियांच्या वतीनं मी अत्यंत अश्रूपूर्ण नयनांनी श्रद्धांजली अर्पण करतो.

आ.सतीश चव्हाण :-जेष्ठ पुरोगामी नेते, शेतकरी, कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारे प्रा.एन.डी.पाटील यांचे आज वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने पुरोगामी महाराष्ट्राचा बुलंद आवाज हरपला आहे. एन.डी.पाटील यांनी नेहमीच स्पष्ट वैचारिक भूमिका घेत कष्टकऱ्यांची बाजू मांडली. शेतकरी कामगार पक्षाचा लढाऊ विचार त्यांनी शेवटपर्यंत जपला. महाराष्ट्राने आज मोठा कर्ता विचारवंत गमावला आहे. प्रा.एन.डी.पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली…!