पुरस्कारांना भारावून न जाता पंडित बिरजू महाराज यांनी स्वतःला कलेसाठी समर्पित केले-पार्वती दत्ता
पद्मविभूषण पंडित बिरजू महाराजांना महागामी परिवारातर्फे श्रद्धांजली
औरंगाबाद,१७ जानेवारी / प्रतिनिधी :- भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रात “कथक’ नृत्याला जगभरात नावलौकिक मिळवून देणारे युगपुरुष पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांचे आज सकाळी निधन झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या शिष्य गुरु पार्वती दत्ता यांच्याद्वारे महागामी गुरुकुल, एम. जी. एम. कॅम्पसमध्ये सायंकाळी ५.३० वाजता प्रार्थना सभा आयोजित केली गेली. कोरोना निर्बंधांच्या अनुषंगाने अत्यंत कमी मान्यवरांच्या उपस्थित आयोजित या सभेत त्यांच्या शिष्य गुरु पार्वती दत्ता यांच्याद्वारे महाराजांच्या आठवणींना उजाळा दिला, महाराजांचे बालपण ते कलाक्षेत्रातील त्यांचे योगदान तसेच त्यांच्या सानिध्यात असतांनाच्या त्यांच्या आठवणी उपस्थितांसमोर मांडत त्यांनी साश्रू नयनांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी वडिलांची छत्रछाया गमाविलेले महाराज यांनी आपल्या वडिलांकडून मिळालेला नृत्य वारसा पुढे नेण्याचा निर्णय घेतला आणि संपुष्टात येणारा राजाश्रयाचा काळ व इंग्रजांची जुलमी राजवट या ना अनेक संकटांवर मात करत भारतीय शास्त्रीय संगीतातील “कथक” नृत्याचे नाव भारतातच नाहीतर जगभर पोहचवले. १९८३ साली भारत सरकारतर्फे मिळालेला “पद्मविभूषण” पुरस्कार तसेच संगीत अकादमी पुरस्कार यांसारखे असंख्य पुरस्कार साल दरसाल त्यांना मिळत गेले परंतु त्यांना मिळालेल्या पुरस्कारांना भारावून न जाता त्यांनी स्वतःला कलेसाठी समर्पित केले आणि नवनवीन कला अविष्कारांचे सादरीकरण करत गेले. कथक नृत्यात पारंगत महाराजची नृत्यासोबतच गायन, लेखन व १० पेक्षा जास्त वाद्य वाजवण्यातही निपुण होते व दैनदिन जीवनातील, निसर्गातील अनेक गोष्टी त्यांना नेहमीच नवनवीन रचना तयार करण्यात प्रेरित करत असत, पक्षांच्या किलबिलातून प्रेरित होत तात्काळ त्यांना कलाकृती सुचत असे हेही या सभेत गुरु पार्वती दत्ता यांनी सांगितले. महागामीच्या सुरुवातीच्या काळापासून ते महागामीची जडण घडण होत असतांनाच्या प्रवासात महाराजांचे नेहमीच मार्गदर्शन राहिले याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
या सभेत विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू तसेच एम. जी एम संस्थेचे विश्वस्त व कर्मचारी उपस्थित होते. आपल्या श्रद्धांजलीपर संवादात कुलपती अंकुशराव कदम यांनी पंडित बिरजू महाराजांच्या महागामीमध्ये झालेल्या अनेक भेटींचा उल्लेख करत त्यांच्या द्वारे लावलेले वडाचे रोपटे आज वटवृक्ष झाल्याचे व त्यांच्या हस्ते महागामीच्या “शारंगदेव सदन” या सभागृहाचे भूमिपूजन झाल्याची आठवण करून देत त्यांच्यासोबतच्या आठवणी पुन्हा स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली.