पक्ष विरोधी कारवाया: संजय पाटील निकम यांना शिवसेना पक्षातून निलंबित करण्याची जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे यांची पक्षाकडे शिफारस

वैजापूर ,१५ जानेवारी / प्रतिनिधी :-वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक संजय पाटील निकम हे सातत्याने पक्षाचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांच्याविषयी तसेच पक्षविरोधी कारवाया व कृत्य करून पक्षाची बदनामी करीत असल्याने त्यांना पक्षातून निलंबित करण्यात यावे अशी शिफारस शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे यांनी शिवसेना सचिव अनिल देसाई यांच्याकडे शनिवारी (ता.15) केली.

वादळी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे संजय पाटील निकम हे शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख असून, शिवसेना पक्षात असतांना त्यांनी पक्षाविरुध्द बंड पुकारून माजी आमदार स्व.आर.एम.वाणी यांच्याविरुद्ध विधानसभेची निवडणूक लढवली होती. बाजार समितीचे संचालक असलेले संजय पाटील निकम हे सध्या विविध कारणाने चर्चेत असून, पक्षात राहून पक्ष व पक्षाचे पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांच्याविषयी पक्षविरोधी कृत्य व कारवाया करीत असल्याचा तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आरोप आहे. 

या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख सचिन वाणी व शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यानी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निकम यांच्याविषयी तक्रार केली.

संजय पाटील निकम हे सातत्याने तालुक्यातील  लोकप्रतिनिधी व पक्षाचे पदाधिकारी यांच्याविषयी पक्षविरोधी कृत्य व पक्षाची बदनामी होईल असे वागत असून, वृत्तपत्रांना जाणूनबुजून माहिती पुरविणे तसेच पक्षाच्या व अन्य बैठकांमध्ये वादग्रस्त भूमिका मांडून वाद निर्माण करीत आहे अशी तक्रार त्यांनी केली. श्री.दानवे यांनी या तक्रारीची गंभीरपणे दखल घेऊन पक्षशिस्त राहावी यासाठी श्री.संजय पाटील निकम यांना पक्षातून निलंबित करावे अशी शिफारस शिवसेना सचिव अनिल देसाई यांच्याकडे केली.