जलजीवन मिशन योजनेअंतर्गत वैजापूर तालुक्यातील 14 गावांतील पाणीपुरवठा योजनेला मंजुरी

वैजापूर ,१४ जानेवारी / प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन योजनेत एक स्वतंत्र पाणीपुरवठा योजना व 14 योजनांना सुधारात्मक पुर्नजोडणी कामाला पाणी पुरवठा विभागाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.या कामामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्यासाठी शुध्द पाणीपुरवठा गावपातळीवर उपलब्ध होईल.
जलजीवन मिशन योजनेत मतदार संघातील गावाचे प्रस्ताव मंजुर केल्याबद्दल माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ग्रामीण पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे आभार मानले.या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य कार्यकारिणी सदस्य साईनाथ मतसागर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके यांचा समावेश होता. महाविकास आघाडी सरकारने ग्रामीण भागात नागरिकांना पिण्याचे पाणी सक्षमीकरणासाठी जलजीवन मिशन योजनेची अंमलबजावणी करण्याची महत्त्वकांक्षी भुमिका हाती घेतली आहे. वैजापूर तालुक्यातील झोलेगाव,भोकरगाव, कवीटखेडा, हाजीपूरवाडी, देवगावशनी, चांदेगाव नादी, सिद्धपूरवाडी, नगिनापिंपळगाव, राजुरा, पाथ्री, गारज , डवाळा अशा एकूण 14 गावातील योजनांचा समावेश करावा यासाठी माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांच्या नेतृत्वाखाली शासनस्तरावर पाठपुरावा सुरु असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके यांनी दिली. डोंगरथडी भागातील पाराळा गावासाठी पाणीपुरवठा योजनेस मान्यता मिळाली आहे.त्यामुळे पाराळा गावाचा कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल.मन्याड साठवण तलावातून 2500 मीटर लांबीची व  150 व्यासाच्या डी.आय. पाइपलाईनद्वारे गावात पाणी आणण्याचे नियोजन आहे. नवीन पाण्याच्या टाकीसह फिल्टर प्लान्टचा समावेश यात करण्यात आला असून 55 लिटर दर दिवशी प्रति व्यक्तीस शुद्ध पाणी मिळणार आहे. गावांतर्गत 90 व्यासाच्या जी. आय. पाईप असून 24 तास पाणी देण्यात येईल.माजी आमदार चिकटगावकर यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांची शिष्टमंडळाने भेट घेतली.पाराळा येथील पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन बनसोडे यांच्या हस्ते व्हावे करण्याचे निमंत्रण देण्यात आले. आमदार सतीश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार कैलास पाटील यांच्या पाठबळामुळे पाराळा पाणीपुरवठा योजना मार्गी लागल्याचे विशाल शेळके यांनी सांगितले.