नऊ लाखांना गंडा घातल्या प्रकरणी आणखी एका भोंदु बाबाला बेड्या

औरंगाबाद,१३ जानेवारी / प्रतिनिधी :- घरावर सापांचा साया असून गुप्त धन काढून देतो, असे आमिष दाखवून कपडा व्यापाऱ्याला तब्बलन नऊ लाखांना गंडा घातल्या प्रकरणी छावणी पोलिसांनी बुधवारी दि.१२ रात्री आणखी एका भोंदु बाबाला बेड्या ठोकल्या. त्‍याला १८ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी पी.एस. मुळे यांनी गुरुवारी दि.१३ दिले. शंकर रामचंद्र डोकुलवार (४४, रा. तेहरानगर, शिवाजीनगर जि. नांदेड) असे अटक करण्‍यात ओलेल्या भोंदुबाबाचे नाव आहे.

या प्रकरणात शेख रफत शेख करीम (३४, रा. गवळीपुरा छावणी) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार शेख रफत हे कपड्याचे व्यापारी आहेत. रफत आणि त्यांच्या पत्नीचे सतत भांडण होत असल्याने घरात अशांतता होती. परभणीच्या एका मित्राने त्‍यांना मानवत येथील सायलू महाराजांची भेट घेण्याचा सल्ला दिला. जून २०२१ मध्ये रफत, त्यांची पत्नी आणि मित्र हे मानवला गेले. परंतु सायलू महाराज ऐवजी त्‍यांना सीताराम महाराज भेटला. सीताराम महाराज, शंकर महाराज आणि इतर आरोपींना त्‍यांना घरात सापाचा साया आहे, गुप्‍त धन काढून देण्‍याचे आमिष दाखवून ९ लाख ९५ हजार २०० रुपयांना गंडा घातला. गुप्तधन न निघाल्याने त्यांनी सीताराम महाराज यांची परभणी येथे जाऊन भेट घेतली आणि पैसे परत करण्याची मागणी केली. त्यावेळी माझ्याकडे अघोरी विद्या असून याची कोठेही वाच्यता केली तर कोंबडा बनविण्यात येईल, अशी धमकी दिली. या प्रकरणात छावणी पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. तपासादरम्यान अटक आरोपीच्‍या मनावत येथील एसबीआयच्‍या बँक खात्‍यावर १ जून ते ९ डिसेंबर दरम्यान १८ लाख ४९ हजार ४८८ रुपयांचा व्‍यवहार झाल्याचे समोर आले.

गुन्‍ह्यात यापूर्वी आसिफ अब्दुल कुरेशी आणि सायलु गायकवाड या दोघांना अटक करण्‍यात आली होती. न्‍यायालयाने त्‍याची पोलिस कोठडीनंतर न्‍यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्‍यानंतर शोध घेवून शंकर डोकुलवार याला अटक करुन आज न्‍यायालयात हजर केले. गुन्‍ह्यातील मुद्देमाल जप्‍त करायचा आहे. तसेच आरोपीने हा गुन्‍हा कोणाच्‍या सांगण्‍यावरुन केला याचा देखील तपास करायचा बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती सहायक सरकारी वकील उध्‍दव यांनी न्‍यायालयाकडे केली.