मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात विविध कार्यक्रम

लेखक भेट, मुलाखत, व्याख्याने, कविसंमेलन व ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन 

नांदेड,१३ जानेवारी / प्रतिनिधी :- मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सलग दोन आठवडे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठातील भाषा, वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुल, ज्ञान स्रोत केंद्र आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या संयुक्त  विद्यमाने हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 

शुक्रवार दि. १४ जानेवारी रोजी स. १०:३० वा. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येईल, यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, अधिष्ठाता डॉ. एल. एम. वाघमारे, डॉ. अजय टेंगसे, डॉ. वैजयंता पाटील, डॉ. शैलजा वाडीकर यांची उपस्थिती राहणार आहे. ग्रंथप्रदर्शनाने पंधरवाड्याची सुरुवात होणार असून महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. केशव देशमुख, डॉ. पृथ्वीराज तौर, डॉ. पी. विठ्ठल यांचा सत्कार करण्यात येणार आहे. असे ज्ञान स्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी यांनी सांगितले. 

कोव्हीड-१९ परिस्थिती लक्षात घेऊन शासन निर्देशांनुसार पंधरवड्यातील सर्व कार्यक्रम दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने होतील असे भाषा संकुलाच्या संचालीका डॉ. शैलजा वाडीकर यांनी कळवले आहे.  साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या साहित्यिकाची मुलाखत, लेखक भेट, पुस्तक चर्चा, कवी संमेलन, व्याख्याने ऑनलाईन पद्धतीने होतील. 

विजय जाधव (मी आणि माझे कादंबरी लेखन), स्नेहलता स्वामी (गांधारी कादंबरीची निर्मितीप्रक्रिया), डॉ. वैजनाथ अनमुलवाड      (आदिवासी बोली), डॉ. केशव देशमुख  (वाचनसंस्कृती), डॉ. जगदिश कुलकर्णी (ग्रंथ आणि ग्रंथालये), डॉ. पी. विठ्ठल (मराठीचे उपयोजन) यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बालसाहित्यिक संजय वाघ यांच्याशी थेट संवाद होणार असून पृथ्वीराज तौर हे वाघ यांची मुलाखत घेतील. पंधरवड्याचा समारोप कवीसंमेलनाने होणार असून दुर्गेश सोनार (मुंबई), पवन नालट (अमरावती), मेघराज मेश्राम (नागपूर), प्रशांत केंदळे (नाशिक) आणि आशा डांगे  (औरंगाबाद)  कविता वाचन करतील. यावेळी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. दिपक बच्चेवार यांची विशेष उपस्थिती असेल. 

पंधरवड्यातील सर्व कार्यक्रम सर्वांसाठी ऑनलाईन पद्धतीने खुले असून रसिकांनी व मराठी भाषा प्रेमींनी त्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. शैलजा वाडीकर, डॉ. जगदिश कुलकर्णी आणि डॉ. पृथ्वीराज तौर यांनी केले आहे.