नव्या भारताचा मंत्र – स्पर्धा करा आणि जिंका. सहभागी व्हा आणि जिंका. संघटित व्हा आणि लढाई जिंका:-पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुदुच्चेरी येथे 25 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली ,१२ जानेवारी / प्रतिनिधी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून  पुदुच्चेरी येथे 25 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन केले.आज स्वामी विवेकानंद यांच्या   जयंतीनिमित्त  हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. या कार्यक्रमा दरम्यान, पंतप्रधानांनी “माझ्या स्वप्नातील भारत ” आणि “भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे दुर्लक्षित नायक ” या विषयावरील निवडक निबंधांचे प्रकाशन केले. या दोन विषयांवर  1 लाखांहून अधिक तरुणांनी सादर केलेल्या निबंधांमधून हे निबंध निवडण्यात आले आहेत . पुदुच्चेरी  येथे सुमारे 122 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह स्थापन करण्यात आलेल्या सूक्ष्म, लघु , मध्यम उद्योग  मंत्रालयाच्या तंत्रज्ञान केंद्राचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. पुदुच्चेरी  सरकारने सुमारे 23 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या  पेरुंथलैवर कामराजर मणिमंडपम – खुल्या रंगमंदिरासह प्रेक्षागृहाचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर, नारायण राणे,  भानु प्रताप सिंह  वर्मा आणि   निसिथ प्रामाणिक, डॉ तमिलीसाई सौंदर्यराजन, पुदुच्चेरीचे  मुख्यमंत्री एन. रंगास्वामी, राज्यमंत्री आणि संसद सदस्य उपस्थित होते.

या कार्यक्रमाला  संबोधित करताना पंतप्रधानांनी राष्ट्रीय युवा दिनानिमित्त देशवासियांना  शुभेच्छा दिल्या.स्वामी विवेकानंदांना वंदन करून पंतप्रधान म्हणाले की, या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील त्यांची जयंती अधिक प्रेरणादायी आहे. श्री.ऑरोबिंदो  यांची 150 वी जयंती आणि महाकवी सुब्रमण्य भारती यांची 100 वी पुण्यतिथी देखील याच काळात  येत असल्याने या कालावधीचे अतिरिक्त महत्त्व पंतप्रधानांनी नमूद केले.”या दोन्ही महान व्यक्तींचे पुदुच्चेरीशी विशेष नाते आहे. या दोन्ही व्यक्ती एकमेकांच्या साहित्यिक आणि आध्यात्मिक प्रवासात साथीदार राहिल्या आहेत”,असे पंतप्रधान म्हणाले.

Image

भारतासारख्या प्राचीन देशातील तरुणांवर  भाष्य करताना पंतप्रधान म्हणाले, आज जग भारताकडे आशेने आणि विश्वासाने बघत आहे. कारण, भारताची लोकसंख्याही  तरुण आहे,आणि भारताचे मनही तरुण आहे. भारताच्या क्षमतांमध्ये  आणि त्याच्या स्वप्नांमध्ये तरुणाई आहे.भारत त्याच्या विचारांनीही आणि चेतनेनेदेखील तरुण आहे. भारताच्या विचारांनी  आणि तत्त्वज्ञानाने नेहमीच बदल स्वीकारले आहेत आणि म्हणूनच भारताच्या  प्राचीनतेत आधुनिकता आहे, असे ते म्हणाले. जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा देशातील तरुण नेहमीच  पुढे आले आहेत. जेव्हा जेव्हा राष्ट्रीय चेतना  दुभंगतात तेव्हा  शंकरासारखे तरुण पुढे येतात आणि आदि शंकराचार्यांच्या रूपाने  देशाला एकतेच्या धाग्यात बांधतात. जुलूमशाहीच्या काळात,गुरु गोविंद सिंह जी यांच्या साहिबजादे सारख्या तरुणांचे बलिदान आजही आपल्याला मार्गदर्शन करत आहे.भारताला स्वातंत्र्यासाठी बलिदानाची गरज असताना भगतसिंग, चंद्रशेखर आझाद आणि नेताजी सुभाष यांसारखे तरुण क्रांतिकारक देशासाठी आपले जीवन समर्पित करण्यासाठी पुढे आले.जेव्हा जेव्हा देशाला अध्यात्मिक पुनरुत्थानाची गरज असते तेव्हा ऑरोबिंदो आणि सुब्रमण्य भारती यांसारखी  महान व्यक्तिमत्व त्याठिकाणी मार्गदर्शक ठरतात, असेही पंतप्रधान म्हणाले.

भारतातील तरुणांकडे लोकसंख्येच्या  लाभांशासह लोकशाही मूल्ये आहेत,त्यांचा लोकशाही लाभांश देखील अतुलनीय आहे असे सांगत  भारत आपल्या तरुणांना लोकसंख्येचा लाभांश तसेच विकासाचा चालक मानतो हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. भारतातील तरुणांना तंत्रज्ञानाचे आकर्षणही आहे आणि लोकशाहीचे भानही आहे.आज भारतातील तरुणांमध्ये कठोर परिश्रम करण्याची क्षमता आहे तर भविष्याबाबतही स्पष्टता आहे. त्यामुळेच भारत आज जे बोलतो, त्याला जग उद्याचा आवाज मानते, यावर पंतप्रधानांनी भर दिला.

पंतप्रधान म्हणाले की, स्वातंत्र्याच्या वेळी तरुण पिढीने देशासाठी सर्वस्व अर्पण करण्यास क्षणभरही मागेपुढे पाहिले नाही. आजच्या तरुणांना देशासाठी जगायचे आहे आणि आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने पूर्ण करायची आहेत.तरुणांमधील क्षमता  जुन्या रूढीवादी विचारांचे ओझे वाहत नाही ते कसे झटकायचे हे त्यांना माहित आहे.आजची ही तरुणाई नवीन आव्हाने, नवीन मागण्यांनुसार स्वतःचा आणि समाजाचा विकास करू शकते आणि नव निर्मिती करू शकते. आजच्या तरुणांमध्ये असलेली ‘करू शकतो ‘ ही भावना आहे  प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी आहे. 

आज भारताचा युवावर्ग जागतिक समृद्धीची नीती संहिता लिहित आहेत,अशा शब्दांत  पंतप्रधानांनी प्रशंसा केली.भारतीय युवक ही जगभरातील युनिकॉर्न व्यवस्थेत गणली जाणारी प्रचंड मोठी शक्ती आहे. भारतात आज 50,000 पेक्षा जास्त स्टार्टअपची  एक मजबूत यंत्रणा तयार झाली आहे. यापैकी 10 हजार स्टार्टअप महामारीच्या आव्हानात्मक काळात उदयास आले. पंतप्रधानांनी – स्पर्धा करा आणि विजयी व्हा, – असा नव भारत मंत्र दिला म्हणजेच  संघटीत व्हा आणि जिंकून या. पंतप्रधानांनी ऑलिंपिक आणि पॅरालिम्पिक्स मधील तसेच लसीकरणातील युवकांच्या सहभागाचा उल्लेख केला आणि हेच जिंकण्याची इच्छा आणि जबाबदारीची जाणीव असल्याचे लक्षण असल्याचे सांगितले. 

मुलगे आणि मुली समान आहेत,हयावर सरकारचा विश्वास असल्याचे  पंतप्रधानांनी नमूद केले. या विचारसरणीनमुळे, मुलींचे लग्नाचे वय  21 वर्षांपर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला  आहे. मुली देखील त्यांचे करिअर घडवू शकतात, त्यासाठी  त्यांना जास्त वेळ मिळावा,  या दिशेने उचललेले हे एक अतिशय महत्वाचे पाऊल आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. 

पंतप्रधानांनी सांगितले, की आपल्या स्वातंत्र्य चळवळीत असे  अनेक लढाऊ सेनानी होऊन गेले, ज्यांना त्यांच्या योग्यतेइतकी मान्यता मिळाली नाही. आपले तरुण अशा निष्ठावंत व्यक्तींबद्दल जितके लिहितील, संशोधन करतील,तितकी  देशाच्या आगामी पिढ्यांमध्ये त्यांच्याबद्दलची जागरुकता अधिक वाढेल, असेही ते म्हणाले. त्यांनी तरुणांना पुढे येऊन स्वच्छता मोहिमेमध्ये योगदान देण्याचे आवाहन केले. 

राष्ट्रीय युवक महोत्सवाचा उद्देश भारतातील युवकांच्या मनांना आकार देण्यासाठी आणि राष्ट्राच्या एकत्रित सामर्थ्यात त्यांचे रुपांतर करण्यासाठी आहे. सामाजिक सामंजस्य तसेच बौद्धिक आणि सांस्कृतिक एकत्रीकरणासाठी केलेला हा सर्वात मोठा अभ्यास आहे. याचा उद्देश भारतातील विविध संस्कृतींना जवळ  आणून त्यांना ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ च्या एकत्रित धाग्यात गुंफून संचालीत करण्याचा प्रयत्न आहे.