बनावट जन्म दाखला:सैनिक भरतीत एका उमेदवाराला बेड्या,पाच उमेदवारांचा शोध

औरंगाबाद,१२ जानेवारी / प्रतिनिधी :-  बनावट जन्म दाखला सादर करुन मराठवाड्यातील सहा उमेदवारांनी सैनिक भरतीत सहभाग घेतला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर छावणी पोलिसांनी एका उमेदवाराला मंगळवारी दि.११ सायंकाळी बेड्या ठोकल्‍यातर उर्वरित पाच उमेदवारांचा शोध सुरु आहे.

महाबळेश्र्वर पुंडलिकराव केंद्रे (२५, रा. दैठणा ता. कंधार जि. नांदेड) असे अटक आरोपीचे नाव असून त्‍याला १५ जानेवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी पी.एस. मुळे यांनी बुधवारी दि.१२ दिले.

या प्रकरणात कर्नल तरुणसिंग भगवानसिंग जमवाल (४०) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, उस्‍मानाबाद, हिंगोली, जळगाव, बीड आणि लातुर या विभागाचे सैन्य अधिकारी म्हणुन फिर्यादी काम पाहतात. २०१६ ते २०२० या काळात वरील विभागात सैन्‍य भरती प्रक्रिया सुरू होती. त्यावेळी जालना येथील २०१७ च्‍या भरती प्रक्रियेत विजय नामदेव मनगटे (रा. वाकड, ता. कन्नड), जळगाव येथील २०१८ च्‍या भरती प्रक्रियेत  शंकर सुरेश वाघ (रा. पळसखेड चक्का ता. सिंदखेड जि. बुलडाणा), २०१७ मध्‍ये जालना येथील  महाबळेश्वर पुंडलिकराव केंद्रे (रा. दैठणा, ता. कंधार, जि. नांदेड), २०१६ मध्‍ये नांदेड येथील प्रशांत रामचंद्र महाले (रा. दुसाने, ता. साक्री, जि. धुळे), किरण कौतीक भाडगे (रा. वाकड, ता. कन्नड) आणि अनीस अलाऊद्दीन शेख (रा. माळी गल्ली, परभणी) यांनी ऑनलाईन फॉर्म भरले होते, मात्र त्‍यावेळी ते उमेदवार अपात्र ठरले.  त्‍यानंतर वरील सर्व उमेदवारांनी २०२० मध्‍ये सैन्‍य भरतीसाठी ऑनलाईन फार्म भरले. मात्र वरील उमेदवारांनी यावेळी आपल्या जन्‍म तारखेचे बनावट प्रमाणपत्र सादर केले. विशेष म्हणजे यावेळी सर्व उमेदवार मैदानी व लेखी परिक्षेत उत्तीर्ण होऊन भरतीसाठी पात्र ठरले. कागदपत्रांच्‍या छाननी दरम्यान हा घोटाळा उघकीस आला. प्रकरणात छावणी पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपीला महाबळेश्र्वर केंद्रे याला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील जनार्दन जाधव यांनी आरोपी केंद्रे हा मार्च २०१३ मध्‍ये एसएससी पास झाला आहे. त्‍यावर ४ जून १९९६ अशी जन्‍मतारीख नमुद आहे, ते प्रमाणपत्र जप्‍त करायचे आहे. आरोपीने बनवाट टीसी आधारे सिरसम (ता. पालम, जि. परभणी) येथील प्रथमेश विद्यालयात प्रवेश घेतला व २०१८ मध्‍ये तो दुसऱ्यांदा १० वी पास  झाला. त्‍याला बनवाट टीसी देणारा संजय जोशी (रा. माळाकोळी ता. लोहा जि. नांदेड) याला अटक करायची आहे. प्रथमेश शाळेत आरोपीला प्रवेश घेण्‍यासाठी कोणी मदत केली याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.