राष्ट्रवादी काँग्रेस तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका लढवणार

उत्तर प्रदेशात भाजपला अजून मोठे धक्के बसणार? शरद पवारांचा मोठा दावा

मुंबई : लोकसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केलीय. राष्ट्रवादी काँग्रेस तीन राज्यात विधानसभा निवडणूक लढवणार आहे. त्यात उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर या राज्यांचा समावेश आहे. महत्वाची बाब म्हणजे यावेळी पवारांनी आपण स्वत: उत्तर प्रदेशचा दौरा करणार असल्याचं जाहीर केलंय.

Image

‘पाच राज्यात निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी तीन राज्यात निवडणूक लढवणार आहे. मणिपूरमध्ये राष्ट्रवादीचे चार आमदार होते. तिथे काँग्रेससोबत पाच जागांवर निवडणूक लढवणार आहोत. तसंच गोव्यात काँग्रेस पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरु आहेत. काही ठिकाणी आम्ही जागा लढवू इच्छित आहोत. त्याची माहिती दोन्ही पक्षाला दिली आहे. येत्या दोन दिवसात निर्णय होईल, असं पवार यांनी सांगितलं.

उत्तरप्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टी एकत्र निवडणूक लढणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच उत्तरप्रदेशात जाणार असल्याचंही यावेळी शरद पवारांनी सांगितलं आहे. तसेच एकत्र बैठकीत जागा वाटप धोरण ठरणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.

मणिपूर-गोव्यात काँग्रेससोबत आघाडी

मणिपूरमध्ये पाच जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढणार आहे. मणिपूर राज्यात काँग्रेससोबत बोलणी सुरू आहे. तसेच गोव्यातही काँग्रेस पक्षासोबत आणि तृणमूल काँग्रेस पक्षांसोबत चर्चा सुरू आहे. गोव्यात परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे. भाजपचं गोव्यातून सरकार हटवण्याची गरज आहे. येत्या दोन दिवसांत आघाडीचा निर्णय होईल असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

अयोध्येतील राम मंदिराचा निर्णय हा कोर्टाच्या निकालानुसार आहे. हा निर्णय सगळ्यांनी स्वीकारला आहे. आता मथुरा, काशी यांचा उल्लेख हे वातावरण ढवळण्याचं, कलुषित करण्याचं काम करतायत. लोकांना हे समजतं असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

शरद पवार स्वत: उत्तर प्रदेशचा दौरा करणार

त्याचबरोबर ‘उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीसोबत राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. उद्या एक मोठी बैठक होत आहे. तिथे आमचे प्रदेशाध्यक्ष के.के शर्मा सहभागी होतील. उद्या लखनऊमध्ये जागावाटपाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात आम्ही तिथे जाणार आहोत. उत्तर प्रदेशात परिस्थितीत मोठा बदल होत आहे. मला आनंद आहे की मेहंदी साहेब जे उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत. त्यांनी गांधी, नेहरूंच्या विचाराने राजकारण केलं. ते आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे अनेक साथीदार पक्षात येत आहेत’, असा दावाही पवार यांनी पत्रकार परिषदेत केलाय.

योगींच्या वक्तव्याचा पवारांकडून समाचार

उत्तर प्रदेशात परिवर्तन होणार आहे. उत्तर प्रगदेशात लोकांना बदल अपेक्षित आहे. तिथे जो एक सांप्रदायिक विचार मजबूत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तिथल्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य मी ऐकलं की 80 टक्के लोक आमच्यासोबत आहेत. 20 टक्के फक्त आमच्यासोबत आहेत. अशाप्रकारचं वक्तव्य देशाच्या अल्पसंख्याक समुदाला ठेस पोहोचवणारं आहे. हे वक्तव्य एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला शोभा देत नाही. देशात सेक्युलर विचार मजबूत करायचा असेल, एकतेला ताकद द्यायची असेल तर असा विचार, अशी भूमिका समाजहिताची नाही. त्यामुळे मला वाटतं की उत्तर प्रदेशातील जनता त्यांना धडा शिकवेल, असं मोठं वक्तव्य पवार यांनी केलंय.

Image

या पत्रकार परिषदेपूर्वी उत्तरप्रदेशातील काँग्रेस अल्पसंख्यांक चेहरा म्हणून ओळख असलेले सिराज मेहंदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सिराज मेहंदी सोबत 13 आमदार राष्ट्रवादीत येणार आहेत.

शरद पवार यांना स्वामी प्रसाद मौर्य यांच्या भाजपला रामराम ठोकत समाजवादी पार्टीतील प्रवेशाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी शरद पवार यांनी मौर्य यांच्यासोबत अजून काही आमदारही पक्ष सोडणार असल्याचं कळतं. त्यामुळे उत्तर प्रदेशात यावेळी परिवर्तन होणार आहे, असा दावा शरद पवार यांनी केलाय. महत्वाची बाब म्हणजे यावेळी शरद पवार यांनी 13 आमदार समाजवादी पार्टीत प्रवेश करणार असल्याचं मोठं भाकित पवार यांनी केलं आहे.