जलजीवन मिशनची कामे दर्जेदार करा- सुनील चव्हाण

  • सर्वेक्षण जानेवारी, डीपीआर मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना
  • अ वर्गवारीतील 42 गावांच्या डीपीआरला मंजुरी

औरंगाबाद,११ जानेवारी / प्रतिनिधी :-  जलजीवन ‍मिशनच्या सर्वेक्षण,  सविस्तर प्रकल्प अहवालासह प्रत्यक्ष कामांना अधिक गती द्यावी. कामांचे सर्वेक्षण जानेवारी आणि डीपीआर मार्च अखेर पूर्ण करावेत. मिशन अंतर्गत असलेली कामे वेळेत, दर्जेदाररित्या पूर्ण करून नागरिकांना शुद्ध, स्वच्छ आणि शाश्वत पाणी देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या. मिशनअंतर्गत असलेल्या अ वर्गवारीतील 42 गावांच्या डीपीआरला मंजुरीही श्री. चव्हाण यांनी दिली. 

Displaying _DSC5124.JPG

            ‍जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन संदर्भात आयोजित आढावा बैठकीत चव्हाण बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे  कार्यकारी अभियंता अजय सिंह, जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशनचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे, भूवैज्ञानिक कैलास आहेर, वॅपकॉस कंपनीचे किरण चौधरी, बी. श्रीनिवास, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे मनीष रणखांब आदी उपस्थित होते.

Displaying _DSC5129.JPG

            जलजीवन मिशन अंतर्गत 2024 पर्यंत राज्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबास प्रती माणसी किमान 55 लिटर पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यात 1298पैकी 1176 गावांमध्ये नळ योजना कार्यान्वित आहे. तर 122 गावामंध्ये नळ योजना नाही. स्वतंत्र नळ योजना 926, प्रादेशिक पाणी पुरवठा 16 गावांमध्ये आहे. जलजीवन मिशन योजनेंतर्गत प्राथमिक आराखड्यानुसार अ वर्गवारीत 341, ब वर्गवारीमध्ये 496 आणि नव्याने प्रस्तावित योजनेत 415, सोलार योजनेत 113 गावांचा समावेश आहे. या  सर्व गावांमध्ये गावकृती आराखडे पूर्ण झाले आहेत. पाणी वाटप समितीच्या निर्णयाप्रमाणे अंदाजे अंदाजपत्रके  तयार करण्यात आलेली आहेत. अ, ब वर्गवारीतील सर्वेक्षण 15 जानेवारी, क वर्गवारीतील 30 जानेवारीपर्यंत पूर्ण करावे. त्याचबरोबर अ वर्गातील 30 जानेवारी, ब वर्गातील 15 फेब्रुवारी आणि क वर्गातील 31 मार्चपर्यंत डीपीआर आवश्यक त्याबाबींसह सादर करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

            डीपीआरनंतर पाणी स्वच्छता मिशनची  मान्यता प्रक्रिया पार पडेल. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रशासकीय मान्यतेनंतर निविदा प्रक्रियेस सुरूवात होणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

            गावांच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत केळगाव, चारनेर, सिरसाळा आदींसह पैठण तालुक्यातील गावांना मंजुरीही श्री. चव्हाण यांनी यावेळी दिली.  बैठकीत श्री. गटणे यांनीही विविध सूचना अधिकाऱ्यांना केल्या. मिशनच्या कामांची  सविस्तर माहिती श्री. वाघमारे यांनी सादर केली.