गोदावरी व शिवना नदी पात्रातून वाळूचा अवैध उपसा नदीकाठच्या गावात वाळूसाठे ; प्रशासनाचे दुर्लक्ष

वैजापूर ,११ जानेवारी / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील गोदावरी व शिवना नदीच्या पत्रातून वाळू तस्करांकडून मोठ्याप्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा सुरू असून नदीकाठच्या गावात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूकीचा सुळसुळाट मोठया प्रमाणात वाढला आहे.स्थानिक महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वाळु तस्कर बेफाम झाल्याचे चित्र नदीकाठच्या गावात निर्माण झाले आहे.

Displaying IMG-20220111-WA0118.jpg


नदी पात्रालगतच्या ठिकाणाहून अवैध वाळू उपसा करण्यासाठी महसूल व पोलीस अधिकाऱ्यांकडून या  गोरखधंद्याला जणू अलिखीत परवानगीच मिळाल्याने वाळूचोरांचे चांगलेच फावत आहे. गोदापात्रातील बहुतांश वाळूपट्टे वीरगाव पोलीसांच्या हद्दीत येत असून या पट्ट्यात महसूलपेक्षा पोलीसांचीच जास्त चलती आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील अव्वलगाव, बाभूळगावगंगा, नागमठाण, नांदूरढोक, डोणगाव आदी गोदापात्रातील वाळूपट्ट्यातुन वाळुचोरांंनी रात्रंदिवस वाळूचा बेसुमार उपसा करत पात्रात धुडगूस घातला आहे. हप्तेखोरीच्या माध्यमातुन वाळू चोरट्यांनी सध्या तरी गोदावरी पात्रावर कब्जा मिळवला आहे. वाळू उपसा करण्यासाठी चोरट्यांना अलिखीत परवानगी मिळाल्याने चोरटे गोदाकाठच्या ग्रामस्थांचा विरोधही जुमानायला तयार नाहीत याशिवाय गोदाकाठच्या वाळूपट्ट्यांवर महसूलपेक्षा पोलीसांची जास्त ‘पॉवर’ चालते. वाळूचोरी करायची असल्यास महसूल अधिकाऱ्यांपेक्षा पोलीसांची ‘मर्जी’ महत्वाची मानली जाते. बरकतीच्या समजल्या जाणाऱ्या या धंद्यात अनेकांनी उड्या घेतल्याने ही बाब पोलीसांच्या देखील पथ्यावर पडली आहे. काही पोलीस कर्मचाऱ्यांना वाळूच्या या गोरखधंद्यात ‘परम-यश’ आल्याने ते कर्मचारीही वाळू चोरांच्या साथीने शासनाला लाखोंचा ‘चंदन’ लावून वाळू चोरट्यांशी अर्थपूर्ण संबंध जोपासत आहेत.उपविभागीय अधिका-याकडून कारवाईचे संकेत…. 
गोदावरी नदी पात्रा शेजारील अव्वलगाव येथे मोठया प्रमाणात वाळु साठे केल्याची तक्रार  महसूल विभागाला प्राप्त झाली आहे.या तक्रारीनुसार अवैध वाळु साठा करणा-या लोकांवर कारवाई करण्याचे संकेत उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी दिले आहेत. 

Displaying IMG-20220111-WA0119.jpg


आधुनिक यंत्राद्वारे होतोय वाळूचा उपसा…. नदीपात्रात सध्या बऱ्यापैकी पाणी आहे. मात्र वाळू चोरट्यांनी शक्कल लढवून आधुनिक यंत्राद्वारे नदीपात्रातुन दिवस रात्र बेफाम वाळू उपसा सुरू केला आहे. या वाळू उपशाचा व्हिडियो देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. तरीसुद्धा येथील महसूल विभाग व वीरगाव पोलीस कुंभकर्ण झोपेत आहे. आता याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनीच लक्ष देऊन निपचित पडलेल्या यंत्रणेला जागे करावे अशी मागणी गोदापात्रालगत असलेल्या गावातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.