देशातील कोविड चाचण्यांनी ओलांडला एक कोटींचा टप्पा
रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर सुधारून 60.86% पर्यंत
नवी दिल्ली, 6 जुलै 2020


कोविड उपचार आणि व्यवस्थापनातली देशातली लक्षणीय उपलब्धी म्हणजे, कोविड-19 च्या आतापर्यंत झालेल्या चाचण्यांची संख्या आता 1 कोटींपेक्षा जास्त झाली आहे.
यावरून, देशव्यापी चाचण्यांना देण्यात आलेले प्राधान्य लक्षात येत असून, “टेस्ट, ट्रेस आणि ट्रीट’ म्हणजेच, चाचण्या-संपर्कशोध आणि उपचार या त्रिसूत्रीवर भर दिला जातो आहे, त्याशिवाय, सर्व घटकांकडून वारंवार पाठपुरावा करत, त्यानुसार धोरणात बदल करण्याच्या केंद्र आणि राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या भूमिकेचे परिणामदिसत आहेत.
गेल्या 24 तासांत, देशात 3,46,459 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. आतापर्यंत करण्यात आलेल्या एकूण चाचण्यांची संख्या आता, 1,01,35,525 इतकी झाली आहे.
देशभरात चाचण्यांसाठीच्या प्रयोगशाळांची संख्या सातत्याने वाढवण्याचा देखील सकारात्मक परिणाम दिसतो आहे. आजपर्यंत देशात कोविडसाठी एकूण 1105 प्रयोगशाळांची व्यवस्था करण्यात आली आहे. यातल्या 788 प्रयोगशाळा सरकारी असून 317 प्रयोगशाळा खाजगी आहेत.
या प्रयोगशाळांमध्ये कोविड-19 च्या निदानासाठी होणाऱ्या विविध चाचण्या पुढीलप्रमाणे :–
- रियल-टाईम RT PCR आधारित चाचणी प्रयोगशाळा: 592 (सरकारी: 368 + खाजगी: 224)
- TrueNat आधारित चाचणी प्रयोगशाळा: 421 (सरकारी: 387 + खाजगी: 34)
- CBNAAT आधारित चाचणी प्रयोगशाळा: 92 (सरकारी: 33 + खाजगी: 59)
कोविड-19 चे प्रतिबंधन आणि व्यवस्थापन यासठी केंद्र सरकार आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेश करत असलेल्या एकत्रित आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आजपर्यंत देशात कोविडचे रुग्ण बरे होण्याची संख्या 4,24,432 पर्यंत पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासांत देशभरात कोविडचे 15,350 रुग्ण उपचारानंतर बरे झाले.
कोविडच्या सक्रीय रुग्णांच्या तुलनेत, बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1,71,145 इतकी अधिक आहे. यामुळे, रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 60.86% इतका झाला आहे.
सध्या देशांत कोविडच्या 2,53,287 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
देशात, कोविड-19 संक्रमणाच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी केंद्र सरकार आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेश एकत्रित काम करत आहेत.
या एकत्रित प्रयत्नांचा भाग म्हणून, केंद्र सरकारने चाचण्यांमध्ये वाढ केली असून, कोविड रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध आणि योग्य वेळेत रुग्णांवर उपचारांचे व्यवस्थापन केले जात आहे. केंद्र सरकारने राज्यांनाही चाचण्यांची क्षमता वाढवण्यासाठी मदत केली आहे.
या सर्व प्रयत्नांचा परिणाम म्हणून, देशातील रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचा दर आता कमी झाला आहे. राष्ट्रीय स्तरावर हा सरासरी दर आता 6.73टक्के इतका आहे.
5 जुलै 2020 रोजी, देशातील,सरासरी दरापेक्षा पॉझिटिव्ह रुग्णांचा दर कमी असलेली राज्ये, आणि राष्ट्रीय दरापेक्षाप्रती दशलक्ष लोकसंख्येच्या प्रमाणात राष्ट्रीय सरासरीपेक्षा चाचण्यांचे प्रमाण अधिक असलेली राज्ये खालीलप्रमाणे:
अनुक्रमांक | राज्य | पॉझिटिव्ह रुग्णदर टक्केवारीत | चाचण्या प्रति दशलक्ष |
1 | भारत(राष्ट्रीय) | 6.73 | 6,859 |
2 | पुद्दुचेरी | 5.55 | 12,592 |
3 | चंदिगढ | 4.36 | 9,090 |
4 | आसाम | 2.84 | 9,987 |
5 | त्रिपुरा | 2.72 | 10,941 |
6 | कर्नाटक | 2.64 | 9,803 |
7 | राजस्थान | 2.51 | 10,445 |
8 | गोवा | 2.5 | 44,129 |
9 | पंजाब | 1.92 | 10,257 |
दिल्लीत, केंद्रशासित सरकारकडून सुरु असलेल्या प्रयत्नांना केंद्र सरकारने मोठे पाठबळ दिले आणि चाचण्यांच्या संख्येत वाढ होईल, याकडे लक्ष दिले. RT-PCR चाचण्यांची संख्या वाढवली गेली, त्यासोबतच, नव्या रॅपिड अँटिजेन पॉईंट ऑफ केअर चाचण्याही सुरु करण्यात आल्या. या चाचण्यांचा रिपोर्ट केवळ 30 मिनिटात कळू शकतो.
केंद्र सरकारच्या या सुनियोजित आणि लक्ष केंद्रित करुन केलेल्या प्रयत्नांमुळे, आधी दिल्लीत ज्या दररोज केवळ 5481 चाचण्या (1 ते 5 जून दरम्यान) केल्या जात होत्या, त्यांच्यात नंतर लक्षणीय वाढ होऊन, आता एक महिन्यानंतर, म्हणजेच 1 ते 5 जुलै या दरम्यान दररोज सरासरी 18,766 चाचण्या केल्या जात आहेत. चाचण्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होऊनही, दिल्लीतील रुग्ण पॉझिटिव्ह निघण्याचा दर मात्र कमी झाला असून गेल्या तीन आठवड्यात हा दर 30 टक्क्यांवरुन 10 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे.