स्व.आर.एम.वाणी चषक देवा क्रिकेट क्लबने पटकावला

वैजापूर,१० जानेवारी / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्याचे माजी आमदार स्व.आर.एम.वाणी यांच्या स्मरणार्थ वैजापूर तालुका शिवसेना व युवासेनेतर्फे आयोजित वैजापूर प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 1 लाख 51 हजार रुपये येथील देवा क्रिकेट क्लबने पटकावले तर व्दितीय पारितोषिक 1 लाख रुपये पोलिस क्रिकेट क्लबला मिळाले.

विजेत्या संघाना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते रविवारी पारितोषिक वितरण करण्यात आले.आर.एम.वाणी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मरणार्थ वैजापूर तालुका शिवसेना व युवासेनेतर्फे येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर आयोजित  या क्रिकेट स्पर्धेत एकूण 12 संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात येथील देवा क्रिकेट क्लबने पोलिस क्रिकेट क्लबला पराभूत करून आर.एम.वाणी चषक व 1 लाख 51 हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकाविले. दुसऱ्या क्रमांकाचे 1 लाखाचे बक्षीस पोलिस क्रिकेट क्लबला तर राजपूत क्रिकेट क्लबला 71 हजार रुपयांचे तिसरे पारितोषिक मिळाले.

Displaying FB_IMG_1641742099460.jpg

गोल्डन क्रिकेट क्लबला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. 51 हजार रुपयांचे चौथे पारितोषिक त्यांनी पटकावले.या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 1 लाख 51 हजार रुपये शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यातर्फे, व्दितीय पारितोषिक 1 लाख रुपये आ. अंबादास दानवे यांच्यातर्फे, तिसरे बक्षीस 71 हजार रुपये आ.रमेश पाटील बोरणारे यांच्यातर्फे तर माजी नगराध्यक्ष साबेर खान यांच्यातर्फे 51 हजाराचे चौथे बक्षीस देण्यात आले.याव्यतिरिक्त बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द मॅच, मन ऑफ द सिरीज आदी बक्षिसे ठेवण्यात आली होती.

या स्पर्धेत अलंकार वानखेडे व सलीम वैजापुरी यांनी समालोचक म्हणून तर दीपक पिंपळगांवकर (भोसरी, पुणे), धीरज माने (सातारा), लक्ष्मण खंडागळे (पुणे)  व मनीष काळे (सोलापूर) यांनी अंपायर म्हणून काम पाहिले. विजेत्या संघांना शिवसेना नेते, चंद्रकांत खैरे यांच्याहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. याप्रसंगी आ.रमेश पाटील बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख सचिन वाणी, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, पालिकेतील शिवसेना गटनेते प्रकाश पाटील चव्हाण, महेश बुणगे, भाऊसाहेब पाटील गलांडे, संजय बोरणारे, रणजित चव्हाण, नगरसेवक शैलेश चव्हाण, पारस घाटे,डॉ.संतोष गंगवाल, युवासेनेचे आमिर अली, श्रीराम गायकवाड, श्रीकांत साळुंके, अनिल न्हावले, सुलतान खान, अमोल बोरणारे, प्रदीप साळुंके यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.