महापालिकेच्या लेटर हेडवर अकरा जणांना नियुक्त्या: मुख्‍य आरोपी सोनाली काळे हिला अटक

औरंगाबाद,९ जानेवारी / प्रतिनिधी :- महापालिकेच्या लेटर हेडवर आयुक्तांची बनावट स्वाक्षरी करून अकरा जणांना विविध पदांवर नियुक्त्या देण्यात आल्याप्रकरणी सिटीचौक पोलिसांनी मुख्‍य आरोपी सोनाली ज्ञानेश्र्वर काळे/नामेकर (३४, रा. पाण रांजणगाव ता. पैठण ह.मु. श्रीकृष्‍णनगर, शेंद्रा एमआयडीसी) हिला शनिवारी दि.८ सायंकाळी अटक केली. आरोपी सोनालीला ११ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी व्‍ही.डी. सुंगारे/तांबडे यांनी रविवारी दिले.

आरोपी सोनाली काळे हिच्‍या ताब्यातून बनावट कागदपत्र, बँक पासबुक, धनादेश, महापालीकच्‍या विविध कार्यालयांसबंधीचे रबरी शिक्के, स्‍टॅंम्प पॅड, मोबाइल, पेनड्राईव्‍ह, दुचाकी (क्रं.एमएच-२०-एफसी-७५४४) आणि गाडीच्‍या दोन नंबर प्‍लेट असा ऐवज जप्‍त करण्‍यात आला आहे.

या प्रकरणात महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख राजु काशीनाथ सुरे यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, महापालिकेच्या लेटरहेडवर अकरा जणांना अग्निशमन विभागात नोकरी देण्यात आल्याबद्दलचे पत्र देण्यात आले आहे. त्यावर आयुक्त पांडेय यांची स्वाक्षरी केलेली आहे. मुळात ही स्वाक्षरी बनावट असून, लेटरहेडवर टाकण्यात आलेला आवक-जावक क्रमांक देखील बोगस आहे. या क्रमांकाची पडताळणी केली असता त्याचा संदर्भ लागत नाही. या नियुक्त्यांची माहिती गुरुवारी, ४ मार्च रोजी पांडेय यांच्या मोबाइलवर व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून प्राप्त झाली. पांडेय यांनी त्याची लगेच दखल घेत पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले आहे. त्‍यानूसार, या प्रकरणात सिटीचौक पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.
यांच्याविरोधात गुन्हे दाखल
सुरे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार उमेश प्रमोदराव चव्हाण, निकिता नारायण घोडके, रोहन शिवाजी जाधव, सोपान उत्तम खांडेभराड, नितीन ज्ञानेश्वर महालकर, सचिन ज्ञानेश्वर महालकर, शुभांगी विनोद चव्हाण, प्रतिक प्रमोद चव्हाण, विभावरी दत्तात्रय चौबे, विशाल राम तायडे, आणि सोनाली ज्ञानेश्र्वर काळे यांच्या विरोधात भादंवि कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१ व ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी सोनाली काळे हिला पोलिस कोठडी

आरोपी काळे हिला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, आरोपीने पालिका आयुक्त आणि अ‍ग्निशमन अधिकाऱ्यांच्या  बनावट स्‍वाक्षऱ्या  व बनावट स्टॅम्प  मारुन नियुक्तीपत्र व इतर कागदपत्र बनवुन शासनाची फसवणुक केली आहे. आरोपीने ते बनवाट नियुक्तीपत्र, स्टॅम्प  व इतर कागदपत्र कोणाच्‍या मदतीने बनविले याचा तपास करायचा आहे. आरोपीने तयार केलेले बनवाट नियुक्तीपत्राव्‍दारे मुलांना नियुक्ती देण्‍याचा नेमका उद्देश काय, गुन्‍ह्यातील इतर आरोपींपैंकी काहींची चौकाशी करण्‍यात आली असता, आरोपी सोनाली काळे हिनेच बनावट नियुक्तीपत्र, कागदपत्रे व इतर साहित्‍य दिल्याचे कबुल केले आहे. तसेच सोनालीने इतर आरोपींसोबत अग्निशमन दलाच्‍या विविध पदासाठी आर्थिक व्‍यवहार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. सोनालीने इतर आरोपींचे बनावट ओळखपत्र बनवले होते, ते तिने कोठे व कोणाकडुन बनवले याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपी सोनालीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती सरकारी वकीलांनी न्‍यायालयाकडे केली.