रस्ते अपघाताला आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षेवर अधिक भर देणे आवश्यक – परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांच्या सूचना

सोलापूर,७ जानेवारी /प्रतिनिधी:- रस्ते अपघाताचे प्रमाण कमी  होण्यासाठी वाहनचालकांना शिस्त लावणे अधिक गरजेचे आहे. अपघात प्रवण क्षेत्राकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात अशा सूचना,  परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिल्या.

शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे परिवहन विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीस उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर, अमरसिंह गवारे ,मोटर वाहन निरीक्षक सुखदेव पाटील, महेश रायबान उपस्थित होते.

यावेळी परिवहन मंत्री परब म्हणाले ,  परिवहन विभागामार्फत विविध सेवा ऑनलाईन पद्धतीने देण्यात येतात यापुढेही लोकांना अधिक सुलभपणे कशा सुविधा दिल्या जातील यावर लक्ष केंद्रीत करून विभाग  अधिक कार्यक्षम करण्यात यावा अशा सूचनाही परिवहन मंत्री परब यांनी दिल्या.

तसेच सोलापूर विभागात महसूल वसुलीचे दिलेले उदिष्ट वेळेत पूर्ण केले. राहिलेले  उद्दिष्ट या दोन महिन्यात पूर्ण करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बैठकीत परिवहन विभागातील महसूल वसुली, वायुवेग पथकाची कामगिरी, सीमा तपासणी नाक्याची कामगिरी, रस्ता सुरक्षा विषयक कामकाज, ऑनलाइन वाहन नोंदणी ,विक्रेत्यामार्फत होणारी वाहन नोंदणी आदी विषयांचा सविस्तर आढावा घेतला. तसेच यावेळी सोलापूर परिवहन विभागाच्या कामकाजाबाबत समाधानही व्यक्त केले.