लातूर जिल्ह्यात कोविड -19 च्या संसर्गाचा टक्का वाढला

नागरिकांनी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे-जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांचे आवाहन

May be an image of 1 person, standing and text that says "लातूर"
  • कोणतीही ताप, खोकला लक्षणे दिसताच जवळच्या तपासणी केंद्रावर जावून तपासणी करुन घ्यावी.
  • आंतरराष्ट्रीय किंवा मोठ्या शहरातून आले असल्यास आरटीपीसीआर चाचणी करावी

लातूर ,७ जानेवारी /प्रतिनिधी :-देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.लातूर जिल्ह्यातही रुग्णांची संख्या वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामध्ये मागील चार दिवसापासून पॉझिटिव्हीटीचा रेट वाढत आहे. 6 जानेवारी, 2022 रोजीचा संसर्गाचा दर 3.63 टक्के इतका आहे. ही तिसऱ्या लाटेची सुरुवात आहे.ही माहिती जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली. 

कोविड- 19 प्रतिबंधासाठी नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करुन गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, अनावश्यक प्रवास व त्रिसुत्रीचे पालन करावे. लग्न तसेच इतर कार्यक्रमात 50 पेक्षा नागरिकांना एकत्र येण्यास प्रतिबंध आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.

बऱ्याच नागरिकांना काही लक्षणे दिसत आहेत, ताप, सर्दी, खोकला असतो परंतु काही नागरिक तपासणीसाठी घाबरत आहेत. तपासणीसाठी घाबरु नये, शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार गृह विलगीकरण सुविधा उपलब्ध आहे. याकडे नागरिकांनी दुर्लक्ष करु नये. कुठलाही ताप, खोकला, अशक्तपणा अशी लक्षणे दिसली तर, जवळच्या तपासणी केंद्रावर जावून तपासणी करुन घ्यावी.
नवीन ओमायक्रॉन वायरसची संसर्ग क्षमता खूप जास्त आहे. याची लक्षणे पुर्वीसारखी आहेत. पण याची सुरुवात अशक्तपणापासून होते. यावर एकच उपाय म्हणजे लसीकरण आहे. ज्या नागरिकांनी दोन्ही लसीकरणाचे डोस घेतले आहेत, त्यांना संसर्ग झाला तरी सौम्य असेल आणि त्यापासून आपण सुरक्षित राहू. ज्यांचा दुसरा डोस प्रलंबित आहे, त्यांनी तात्काळ लसीकरणाचा दुसरा डोस करुन घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

3 जानेवारी, 2022 पासून वयोगट 15 ते 17 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरु केले आहे. जिल्ह्यात याला चांगला प्रतिसाद आहे. या वयोगटातील 30 टक्के झाले आहे. 70 टक्के उर्वरित शिल्लक आहे. 15 ते 17 वयोगटातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करुन त्यांना जवळच्या लसीकरण केंद्रावर जावून लसीकरण करुन घेण्याबाबत प्रवृत्त करण्याबाबतही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी जिल्ह्यातील नागरिकांना, पालकांना, शिक्षकांना आवाहन केले आहे.
परदेशातून किंवा देशातील कोणत्याही महानगरातून प्रवास करुन लातूर जिल्ह्यात आलेल्या नागरिकांनी प्रथम आरटीपीसीआर चाचणी करुन घ्यावी. कोविड संसर्ग होवू नये यासाठी जिल्हा प्रशासन सर्वोत्तोपरी प्रयत्न करत आहे. शासकीय रुग्णालयात कोविड -19 च्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय सुविधा, ऑक्सिजन पुरवठा, मनुष्यबळ याबाबतची सुसज्जता झाली असल्याचेही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.
नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण असेल माहिती द्यावयाची असेल त्यासाठी येत्या दोन ते तीन दिवसात टोल फ्रीचीही व्यवस्था करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले आहे.