वीजबिल वसुलीसाठी महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक रस्त्यावर

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ‘हर घर दस्तक’ मोहीम सुरू

औरंगाबाद,६ जानेवारी /प्रतिनिधी:- वीजबिल थकबाकी वसुलीसाठी महावितरणच्या ‘हर घर दस्तक’ मोहिमेत औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले हे स्वत: रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोहिमेत सहभागी झाल्याने वीजबिल वसुलीस वेग आला आहे. महावितरणची संपूर्ण यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे. थकबाकीदार ग्राहकही वीजबिल लगेचच भरून मोहिमेस सकारात्मक प्रतिसाद देत आहेत.

     वीजबिलांच्या प्रचंड थकबाकीमुळे महावितरण आर्थिक अडचणीत आलेली आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांच्या संकल्पनेतून ‘हर घर दस्तक’ मोहीम राबवण्यात येत आहे. औरंगाबाद शहराबरोबरच जिल्ह्याचा ग्रामीण भाग तसेच जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी व हिंगोली या मराठवाड्यातील सर्व आठ जिल्ह्यांत महावितरणची ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. ग्राहक नियमित व वेळेत वीजबिल भरत आहेत का हे पाहण्यासाठी महावितरण कर्मचारी आता घरोघरी जाऊन वीजबिल भरल्याची खात्री करत आहेत.

औरंगाबाद शहरात शहागंज व छावणी उपविभागात 4 व 6 जानेवारी रोजी राबवण्यात आलेल्या विशेष वसुली मोहिमेत सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले हे स्वत: सहभागी झाले. तसेच औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता भुजंग खंदारे, औरंगाबाद शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता प्रकाश जमधडे, अधीक्षक अभियंता (इन्फ्रा) संजय सरग, कार्यकारी अभियंता प्रेमसिंग राजपूत यांच्यासह औरंगाबाद शहर मंडलातील विविध कार्यालयांतील अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, कनिष्ठ अभियंता, तांत्रिक कर्मचारी तसेच विविध संवर्गातील संपूर्ण कार्यालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही एकाच वेळी या मोहिमेत ग्राहकांना भेट देऊन वीजबिलांची वसुली केली.

        ग्राहकांना वीजबिलाबाबत असलेल्या शंकांचे तात्काळ निरसन तसेच आवश्यक त्या ठिकाणी बिल दुरुस्त करून त्यांना जागेवरच ऑनलाईन भरण्यास महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रोत्साहित केले. तसेच ज्या ठिकाणी ग्राहकास वीजबिल ऑनलाईन भरण्यास अडचण होती किंवा वीजबिल भरणा केंद्र जवळ नव्हते त्यांच्याकडून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी बिलाची रक्कम स्वीकारून अॅपद्वारे वीजबिल भरणा करून घेतला. त्यांना बिल भरल्याचा तात्काळ मोबाईलवर एसएमएस पाठवण्यात आला. या मोहिमेत शेकडो ग्राहकांनी तातडीने बिल भरून सहकार्य केले. ज्यांनी बिल भरण्यास प्रतिसाद दिला नाही, त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. तसेच अनेक दिवसांपासून बिले न भरणाऱ्या काही ग्राहकांचे थेट मीटरच काढून आणण्यात आले. वीजबिल वसुलीसोबतच या मोहिमेत वीजचोरीची प्रकरणेही उघडकीस आली. या ग्राहकांना वीजचोरीची बिले देण्यात येणार आहेत. तसेच संशयास्पद वीजवापर आढळलेले ग्राहकांचे मीटर जप्त करून तपासणी केली जाणार आहे.  

        शहागंज उपविभागात 4 जानेवारी रोजी राबवलेल्या व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांच्या वसुली मोहिमेत 163 ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता तर 52 ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला. तसेच 750 ग्राहकांनी वीजबिल भरून वीज खंडित होण्याची कारवाई व गैरसोय टाळली. तर छावणी उपविभागात 6 जानेवारी रोजी राबवलेल्या मोहिमेत 187 ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता तर 93 ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला. तसेच 283 ग्राहकांनी वीजबिल भरून वीज खंडित होण्याची कारवाई व गैरसोय टाळली.  सर्व वीजग्राहकांनी थकबाकीसह आपले चालू वीजबिल भरून सहकार्य करावे आणि वीजपुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.