दर्पण : सामाजिक पत्रकारितेचा शुभारंभ

बंगालमध्ये ज्या ज्या चळवळी उभ्या राहिल्या, त्याचे अनुकरण महाराष्ट्रात झाल्याचे लक्षात येते. राजकीय हक्काची मागणी करणारी पहिली संस्था कोलकत्यात निघाली. तिचे अनुकरण ‘बाँबे असोसिएशन’ या नावाने मुंबईत झाले. बंगालमध्ये ‘ब्राह्मो समाज’ निघाला तर मुंबईत ‘प्रार्थना समाज’ निघाला. त्याचबरोबर स्त्री शिक्षण, विधवाविवाह, प्रौढविवाह या चळवळी बंगालमध्ये सुरू झाल्या. त्याचे अनुकरण महाराष्ट्रात झाल्याचे दिसून येते. वृत्तपत्र निर्मितीबाबतही अनुकरण झाल्याचे लक्षात येते. थोर समाज सुधारक राजा राममोहन रॉय यांच्या ‘संवाद कौमुदी’ या वृत्तपत्राशी बाळशास्त्री जांभेकरांचे ‘दर्पण’ हे मिळतेजुळते होते.

निसर्ग सौंदर्याची खाण असलेल्या कोकणातील आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी स्वातंत्र्यपूर्वकाळात वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी अत्यंत कठीण परिस्थितीत मुंबई येथे 6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’ या नावाने पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले.

जांभेकर यांनी ‘दर्पण’च्या पहिल्याच अंकात म्हटले की, “स्वदेशीय लोकांमध्ये विलायेतील विद्यांचा अभ्यास अधिक व्हावा आणि या देशाची समृद्धी व येथील लोकांचे कल्याण याविषयी स्वतंत्रतेने व उघड रीतीने विचार करावयास स्थल व्हावे, त्याचबरोबर मनोरंजन करणे, चालत्या काळाचे वर्तमान कळविणे आणि योग्यतेस येण्याचे मार्ग दाखविणे आदी समाजासाठी करण्याचे ठरविले आहे.”

अशा रीतीने त्यांनी आपले संपादकीय धोरण जाहीर केले. एतद्देशीयांप्रमाणेच ‘दर्पण’चा येथील इंग्रज लोकांतही प्रसार व्हावा म्हणून तसेच देशी लोकांना इंग्रजी भाषेचा विशेष सराव व्हावा म्हणून त्यातील अर्धा मजकूर इंग्रजी भाषेत दिला जात असे. ‘दर्पण’चे इंग्रजी नाव THE BOMBAY DURPAN होते. ‘दर्पण’मध्ये ग्रहगोल व तारे, इंग्लंडमधील राजकीय सुधारणा, स्त्रीशिक्षण, जातिभेद, पुनर्विवाह, हिंदू व ख्रिश्चन धर्म आदी विषयांपासून ते गुडगुडी ओढणे आणि नाटक शाळेस प्रोत्साहन यासारखे विषय हाताळलेले आढळतात. तसेच सरकारच्या विरोधात अग्रलेखातून टीका केल्याचे लक्षात येते. वाचकांच्या तक्रारी व सूचनांना जागा देणारे सदर ‘जनमानसाचा कानोसा’ त्या काळात प्रसिद्ध होते. विविध प्रकारच्या मनोरंजक वार्ता, ग्रंथपरीक्षण आदी विषय ‘दर्पण’मधून हाताळलेले आढळून येतात.

‘दर्पण’ हे वृत्तपत्र म्हणून नव्हे, तर मतपत्र म्हणून अधिक लोकप्रिय झाले. अल्पावधीतच ते सुशिक्षित समाजात व राजकर्त्यांत गाजले. जांभेकरांनी विधवाविवाह, स्त्रीशिक्षण यांचा पुरस्कार केला, तसेच बालविवाहाचा निषेध केला. या संदर्भात ‘दर्पण’मधून सातत्याने लेखन केले.

जांभेकरांची बुद्धिमत्ता अष्टपैलू होती. त्यांचे संस्कृत, मराठी, गुजराती, लॅटिन आणि इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व होते. गणित व ज्योतीष या विषयाचे ते गाढे अभ्यासक होते. म्हणूनच ‘दर्पण’चा अंक परिपूर्ण असे. त्या काळात या अंकाचे तीनशे वर्गणीदार होते. जवळपास साडेआठ वर्षे ‘दर्पण’चा अंक निघाला. 26 जून 1840 रोजी शेवटचा अंक निघाला आणि ‘दर्पण’ बंद पडले.

‘दर्पण’प्रमाणेच ‘दिग्दर्शन’ हे मराठी भाषेतले पहिले मासिक बाळशास्त्री जांभेकर यांनी 1840 साली सुरू केले. ‘दर्पण’प्रमाणे ‘दिग्दर्शन’ वाचकांची पकड घेऊ शकले नाही. त्याचे कारण असे की, सुरुवाती पासूनच ‘दिग्दर्शन’चे अंक अनियमित होते. या अंकाचे दोनशे वर्गणीदार होते. ‘दिग्दर्शन’मध्ये शास्त्रीय विषयांवरचे लेख असत. त्यातील विवेचन सोप्या, सुबोध भाषेत केलेले असे. ‘दिग्दर्शन’मध्ये विषयांची विविधता होती. उदा. सणांची उत्पत्ती, रसायनशास्त्र, चीन देशाचे वर्णन, सूक्ष्मदर्शक यंत्र, मुंबईचे वर्णन, वाफयंत्रे, तपकिरीचे व्यसन, जगभरातील मनोरंजक बातम्या असे विषय हाताळलेले आढळून येतात. यातील बहुतेक लेख जांभेकरांनी लिहिलेले होते. ‘दिग्दर्शन’ जवळपास चार वर्षे चालले. ‘दिग्दर्शन व ‘दर्पण’ या पत्रांची संपादकीय सूत्रे जांभेकर यांच्या हाती होती. मात्र वृत्तपत्रावर संपादक म्हणून त्यांचे नाव नव्हते. सरकारी व इतर पत्रव्यवहार करताना संपादक म्हणून त्यांचा उल्लेख आढळतो.

बाळशास्त्री जांभेकर यांच्या चरित्राचे अवलोकन केले असता त्यांच्याठायी असलेल्या अलौकिक गुणांची महती लक्षात येते. मुंबई येथे अभ्यासासाठी आलेले बाळशास्त्री स्वकर्तृत्वाने इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवितात. इंग्रजांचे वर्चस्व असलेल्या ‘दी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’ या संस्थेत प्राध्यापक, सेक्रेटरी बनतात आणि नंतर दक्षिण मुंबई इलाख्याचे शिक्षणाधिकारी बनतात, हे केवळ अलौकिक आहे. भाषाज्ञान, इतिहास, गणित, पदार्थविज्ञान, भूगर्भशास्त्र, पुरातत्व संशोधन अशा विविध विषयांत ते पारंगत होते. यावर त्यांनी त्या काळात अनेक संशोधनात्मक ग्रंथ लिहिले. उत्तम शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, ग्रंथकार, पत्रकार, संपादक आणि सामाजिक जागृती करणारे समाजसुधारक असे त्यांचे विविध पैलू आहेत.

दादाभाई नौरोजी यांच्यासारखे अनेक विद्वान आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे शिष्य होते. तत्कालीन मुंबई सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश सर टी. ई. परी, रेव्हरंड डॉ. विल्सन, न्यायमूर्ती सर चंदावरकर आदी आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या थोर नामवंतांनी बाळशास्त्रींच्या विद्वत्तेचे कौतुक केले होते. त्यावेळच्या सर्व इंग्रजी व अन्य भाषांतील वृत्तपत्रांनीही त्यांच्या कार्याचा गौरव केला होता.

स्वातंत्र्यपूर्व काळात काळाची गरज ओळखून समाजप्रबोधन, ज्ञानप्रचार आणि लोकसुधारणेचे एक प्रमुख साधन म्हणून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ सुरू केले. स्वतः बाळशास्त्री तत्कालीन समाजात सरकारीदरबारी मान्यता पावलेले विद्वान होते. शिक्षण म्हणून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणाऱ्या बाळशास्त्रींनी आपल्या देशबांधवांच्या शिक्षणासाठी वर्तमानपत्र सुरू केले. लोकशिक्षणाचे प्रभावी साधन म्हणजे वृत्तपत्र हे त्यांच्या पत्रकारितेच्या कारकीर्दीत स्पष्ट झाले.

लोकस्थिती, धर्मरीती आणि उपयोगी फेरफार घडवून आणणे, हे नियतकालिकांचे कर्तव्य आहे, अशी बाळशास्त्रींची धारणा होती. राजा राममोहन रॉय यांच्या प्रयत्नांनी सुधारणेची वाट चोखळणारा बंगाल प्रांत त्यांच्या डोळ्यांसमोर होता. जुनाट रूढींचा त्याग करून बंगाली लोकांप्रमाणे महाराष्ट्रीय जनतेनेही आधुनिक सुधारणांची कास धरावी यासाठी प्रयत्न करण्याचे ‘दर्पण’ हे उत्तम साधन होते. बंगालमधील जागृती आणि राजा राममोहन रॉय याविषयी ‘दर्पण’च्या पहिल्याच अंकात लिहिण्यात आले होते.

शेतकरी लोकास सरकारचे उत्तेजन, कंपनी सरकारच्या तीन इलाख्यांतील जमाखर्चाची यादी, या देशातील लोकांतून मोठ्या सरकारी जागांवर नेमणुका, राजा राममोहन रॉय यांची विलायतेतील प्रश्नोत्तरे, या देशावर रशियनांचा हल्ला होण्याचे भय, रहदारी जकाती, विलायतच्या बादशहाच्या कौन्सिलात फेरफार असे विषय ‘दर्पण’मधून चर्चिले जात. वाफयंत्राच्या वृत्तांतापासून मनात आलेल्या गोष्टी, शहर साफ ठेवण्याकरिता नेमणूक, विलायतेतील आगीच्या गलबताचे व्यवहार असे विषयही ‘दर्पण’मधून येत असत.

इंग्रज आपल्या सत्तेची पकड घट्ट करण्याचा सर्वतोपरी आणि सर्व शक्तिनिशी प्रयत्न करीत असताना हिंदी जनतेतील दोष नष्ट करून, त्यांची पात्रता वाढवून राज्यकारभार करण्याची जनतेला हळूहळू संधी द्यावी हा विचार त्या काळात बाळशास्त्रींनी ‘दर्पण’मधून मांडला. प्रसंगी योग्य त्या शब्दांत इंग्रज राज्यकर्त्यांची कानउघडणी करण्यास आणि  इंग्रज सरकारचे दोष स्पष्टपणे सांगण्यास बाळशास्त्री कचरले नाहीत. बाळशास्त्रींना हे अतिशय धोरणीपणाने आणि संयमाने करावे लागत असे. पुढे उडणाऱ्या स्वातंत्र्यलढ्यातील भडक्यांसाठी ठिणगी टाकण्याचे काम ‘दर्पण’ ने निश्चितच केले आणि त्याचीच परिणती पुढे लोकमान्य टिळकांच्या ‘केसरी’तून सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा कडकडाट होण्यात झाली.

6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा करणे म्हणजे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी महाराष्ट्राच्या भावी पिढ्यांसाठी दिलेल्या विचारांचा आणि कृतिशीलतेचा वारसा जपून कृतज्ञता व्यक्त करणे होय. म्हणूनच खऱ्या अर्थाने ‘दर्पण’ मधून सामाजिक पत्रकारितेचा शुभारंभ झाला, असेच म्हणावे लागेल.

डॉ. संभाजी खराट

 उपसंचालक (माहिती)

विभागीय माहिती कार्यालय,

 कोल्हापूर