पुन्हा शिवसेना-भाजप युती होणार?, शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांच्या विधानाने रंगली चर्चा

नवी दिल्ली,४ जानेवारी/प्रतिनिधी:- 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना  आणि भाजप यांच्यात निर्माण झालेल्या राजकीय संघर्षानंतर युती तुटली. त्यानंतर शिवसेनेने विरोधात असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली. तेव्हापासून शिवसेना आणि भाजप नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचं पहायसा मिळत आहे. पण आता पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युतीची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे आणि त्याचं कारण म्हणजे शिवसेनेच्या मंत्र्यांनी केलेलं एक विधान आहे.

राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसेना-भाजप युतीबाबत भाष्य केलं आहे. नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला तर राज्यात भाजप आणि शिवसेना एकत्र येवू शकतात. गडकरी यांचे ठाकरे कुटुंबियांसोबत अतिशय जवळचे नाते आहे.

राज्यात कोणतंही परिवर्तन घडवायचं असेल त्याची चावी म्हणजे नितीन गडकरी आहेत. नितीन गडकरी यांच्यासोबत आमचे जुने संबंध आहेत. त्यांचे सर्वांशीच चांगले संबंध आहेत. मग ते विरोधक का असेनात. गडकरी हे राजकारणातील विद्यापीठ आहेत. त्यांचे आणि उद्धव ठाकरे यांचेही जुने संबंध आहेत.
मात्र राज्यातील भाजप नेत्यांच्या राजकारणामुळे गडकरी राजकारणात लक्ष देत नाहीत. भाजप आणि युतीचा पूल बांधायचा असेल तर ते फक्त गडकरीच करू शकतात. परंतु युतीचा निर्णय शेवटी उद्धव ठाकरेच घेतील, असे वक्तव्यही अब्दुल सत्तार यांनी केलंय.

आज राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात संघर्ष सुरू आहे. यात राज्याचे नुकसान होऊ नये. यामुळे नितीन गडकरी यांच्या सारख्या राजकीय नेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा. नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला निश्चितच मार्ग निघेल असंही अब्दुल सत्तार म्हणाले.

जळगाव-औरंगाबाद रस्त्याचे काम वेगाने

अब्दुल सत्तार यांनी नवी दिल्लीत नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी जळगाव-औरंगाबाद रस्त्याचे काम जलदगतीने व्हावे, अशी मागणी केली. या रस्त्याची 200 कोटी रुपयांची कामे बाकी होती. हा निधी गडकरी यांनी तातडीने मंजूर केल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली.