साक्षी चितलांगेने मिळविला वुमन ग्रँडमास्टरचा दुसरा नाॅर्म,महिला मध्ये ‌तिसरा क्रमांक

औरंगाबाद,४ जानेवारी /प्रतिनिधी:- सिटजेस, स्पेन‌ येथे डिसेंबर अखेरीस झालेल्या सनवे सिटजेस इंटरनॅशनल चेस फेस्टीवल २०२१ मध्ये औरंगाबादची वूमन इंटरनॅशनल मास्टर साक्षी दिनेश चितलांगे ने १० पैकी ६  गुण प्राप्त करीत महिला मध्ये  तिसरा  क्रमांक मिळविला व ५०० युरो चे बक्षीस पटकावले. तसेच ह्या आउटस्ट़ँडिंग परफॅारमन्स बद्द्ल  तिला वुमन ग्रँड मास्टर नॅार्म प्रदान करण्यात आले. हा साक्षीचा दुसरा वुमन ग्रँड मास्टर नॅार्म आहे. वेस्टर्न एशियन ज्युनिअर  २०१९ मध्ये गोल्ड मेडल मिळवून पहिला नॅार्म मिळविला होता.     

Displaying photo (2).jpeg

ह्या स्पर्धेत ओपन मध्ये भारताच्या ग्रँड मास्टर अभिमन्यू पुराणिक तिसरा आला व महिला मध्ये पद तालिकेत साक्षी एकमेव भारतीय ठरली. ह्या स्पर्धेत ४५ देशाच्या २८० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. खास म्हणजे ह्या पैकी १६५ स्पर्धक टायटल प्राप्त होते. तिने ह्या स्पर्धेत इंडोनेशियाचा इंटरनॅशनल मास्टर अली मोहमद (रेटींग – २३९९), भारताचा इंटरनॅशनल मास्टर राहील मलिक (रेटींग – २३२३), जर्मनीची वुमन ग्रँड मास्टर हिनेमन जोसेफीन (Heinemann Josefine, रेटींग – २३६९), मलेशियाचा ची. सीयान ह्यांचा पराभव केला व नेदरलॅंडचा व्रोलिक लीयाम (Vrolijk Liam, रेटींग – २४७३), भारताचा इंटरनॅशनल मास्टर मनिष अॅंटो (Manish Anto, रेटींग – २३३६), इंडोनेशियाचा इंटरनॅशनल मास्टर कुहेंदी सीआन (Cuhendi Sean, रेटींग – २४१९) व भारताचा हिमीष कान्हा ह्यांच्या सोबत बरोबरी केली. आठ फेरीनंतर ५.५ गुण मिळवित साक्षी महिला मध्ये प्रथम क्रमांकावर होती. परंतु नवव्या फेरीत चिलीच्या ग्रँड मास्टर स्क्रोडर रोडरीगो (Schroeder Rodrigo, रेटींग – २४८४) कडून पराभव पत्करावा लागल्याने तिसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ह्या स्पर्धेत साक्षीचे आंतरराष्ट्रीय रेटींग ५९ ने वाढले व रेटींग परफॅारमन्स २३७४ राहिले. साक्षीची सध्याची आंतरराष्ट्रीय लाइव रेटिंग २२०५ आहे.
      कोरोना मुळे जवळपास दीड वर्षानंतर ही दुसरी ओवर द बोर्ड स्पर्धा खेळण्यास मिळाली. या आधी ऑक्टोबर मध्ये अर्मेनिया येथे झालेल्या येरेवान ओपन मध्ये साक्षी सहभागी झाली होती.‌  ऑगस्ट मध्ये साक्षीने ॲानलाइन एशियन वुमन चॅम्पियनशिप २०२१  मध्ये चौथा क्रमांक मिळविला. तिने या स्पर्धेत ९ पैकी ६.५ गुण मिळविले होते. समान गुणावर टायब्रेक मध्ये साक्षीचे ब्रांझ पदक थोडक्यात हुकले.‌

Displaying photo.jpeg


       या यशाबद्दल साक्षी म्हणाली, वुमन ग्रँड मास्टर चे दुसरे नॅार्म मिळाल्याबद्दल मी आनंदी आहे. शिल्लक एक वुमन ग्रँड मास्टर नॅार्म मिळवुन लवकरच वुमन ग्रँड मास्टरचे टायटल मिळवेल.