आरोग्य, शिक्षण व जिवनोन्नती क्षेत्रात समाजकार्य व्यावसायिकांना करिअर करण्याचे दिवस – कुलगुरू येवले यांचे प्रतिपादन

औरंगाबाद,४ जानेवारी /प्रतिनिधी:- आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या गेब्ज फौंडेशनच्या सहयोगाने डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सामाजिक कार्य महाविद्यालयातर्फे  संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते.
 या संवाद सभेला विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ.  प्रमोद येवले आणि गेब्ज फौंडेशनचे चेअरमन व  माजी सनदी अधिकारी  विजयसिंह ठाकूर विशेष निमंत्रित होते. मराठवाड्यातील महिला आरोग्यासाठी विशेषतः गर्भाशय व स्तनाच्या कर्करोगाचे निदान लवकर होऊन ग्रामीण महिलांच्या आरोग्याचे प्रश्न प्राथमिक अवस्थेत सोडविले जावेत, यासाठी गेब्ज फाउंडेशन काम करते.या फौंडेशन सोबत विद्यापीठातील सामाजिक कार्य महाविद्यालय सुरुवातीपासून जनजागृती,स्त्री समुपदेशन क्षैत्रात  कार्य करत आहे. आरोग्य क्षेत्राबरोबरच शिक्षण आणि जीवनोन्नती क्षेत्रात गेब्सच्या सहकार्याने महाविद्यालयाला कार्य करायचे असून,  एक शाश्वत विकासाचे प्रारूप उभे करायचे आहे. त्यानिमित्ताने फौंडेशन व महाविद्यालय यांच्यात संवाद घडून व्यवसायिक नातेसंबंध दृढ करण्यासाठी  सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यासंवाद सभेत गेब्ज आरोग्याबरोबर मूल्यवर्धीत शिक्षणासाठी औरंगाबाद व जालना जिल्ह्यात जि.प.शाळा माॅडेल म्हणून उभे करताना सामाजिक कार्य महाविद्यालयाला सोबत घेणार असल्याचे गेब्ज फौंडेशनचे संस्थापक विजयसिंह ठाकूर यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात  कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी समाजकार्य अभ्यासक्रम हा सामाजिक विकासासाठी मूलभूत अभ्यासक्रम असल्याचे सांगून आरोग्य,  शिक्षण याबरोबरच जीवनोन्नती या क्षेत्रात करिअर करण्यासाठी समाजकार्य व्यवसायिकांना   खूप संधी आहेत. यासाठी सक्षमतेने विद्यार्थ्यांनी स्वत:ला घडवले पाहिजेत असे प्रतिपादन त्यांनी केले. याप्रसंगी प्रास्ताविक  प्राचार्य प्रा. डॉ. संजय साळुंखे  यांनी केले , तर सूत्रसंचालन डॉ. पी एम शहापूरकर यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. रमेश गावित यांनी केले. या कार्यक्रमासाठी गेब्ज हेअर केअर सोल्युशनचे मिलिंद कुलकर्णी , गेब्ज फौंडेशनचे गणेश मते, सचिन लिमकर , शिक्षक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.