राज्यात कोरोनामुळे चिंता वाढली,मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातल्या शाळा पुन्हा बंद

…तर कठोर निर्णय घ्यावे लागतील, अजित पवार यांचे संकेत

मुंबई,३ जानेवारी /प्रतिनिधी:- आज राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 12 हजार पार गेलाय. ओमिक्रॉन विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. अशावेळी राज्यातील कोरोना प्रादुर्भाव वाढलेल्या शहरातील शाळा बंद करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे आदी शहरांचा समावेश आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढायला लागली तर राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  दिले आहेत. ते साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होते.पश्चिम बंगालमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढायला लागल्यावर लॉकडाऊन लागू केला आहे. देशातील काही राज्यांमध्येसुद्धा नाईट कर्फ्यू सारखे निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. राज्याची राजधानी मुंबईमध्ये आजही 8 हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळले आहे. तर कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाची तिसरी लाट आल्याची भीती वर्तवली जात आहे.मुंबईमध्ये मागील आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. आज पुन्हा एकदा 8 हजार 82 रुग्णांची नोंद झाली आहे. काल सोमवारी सुद्धा 8 हजार 63 रुग्ण आढळले होते. मागील 6 सहा दिवसांपासून ही आकडेवारी वाढत चालली आहे.

  • कल्याण डोंबिवली मध्ये कोरोनाचा धोका वाढला, दिवसभरात तब्बल २०५ कोरोना बाधितांची नोंद, कल्याण पश्चिममध्ये सर्वाधिक रुग्ण आढळल्यानं चिंता वाढली
  •  कोरोना आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातल्या शाळा पुन्हा बंद, पहिली ते नववीचे ऑफलाईन वर्ग 31 जानेवारीपर्यंत बंद तर दहावी आणि बारावीचे वर्ग ऑफलाईन तर महाविद्यालयांचा निर्णय उद्या
  • ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांना कोरोनाची लागण, आयुक्तांना दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग,  ओमायक्रॉनच्या पडताळणीसाठी सॅम्पल्स पुण्याला पाठवले
  • ठाण्यातील शाळा , महाविद्यालय 31 जानेवारीपर्यंत बंद राहणार…दहवी आणि बारावीचे वर्ग मात्र ऑफलाईन पद्धतीनं सुरु राहणार
  • म्हाडाची परीक्षा पुन्हा लांबणीवर, 29 आणि 30 जानेवारीला होणारी परीक्षा पुढे ढकलली, सुधारीत  वेळापत्रक लवकरच जाहीर होणार
  • शिर्डीमध्ये व्यावसायिकांच्या सरसकट कोरोना टेस्ट करणार, अनेकांच्या संपर्कात येत आल्यानं उद्यापासून कोरोना टेस्टिंग होणार
  • थर्टीफस्टला झालेल्या बागा बीचवरील गर्दीचा व्हिडिओ व्हायरल, पार्टीदरम्यान कोरोना नियम धाब्यावर

ठाण्यातील शाळाही बंद करण्याचा निर्णय

ओमिक्रोन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार संसर्ग रोखण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता 10 वी व 12 वी चे वर्ग वगळता अन्य वर्गासाठी सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा प्रत्यक्ष अध्यापनासाठी दिनांक 31 जानेवारी 2022 पर्यंत बंद ठेवून ऑनलाईन पध्दतीने वर्ग सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली आहे.

नवी मुंबईत 10वी आणि 12वीचे वर्ग सुरु राहणार

नवी मुंबईतील शाळा बंद करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. नवी मुंबईतील पहिली ते नववी पर्यंतचे वर्ग बंद राहणार आहेत. तसंच 11वीचे वर्गही बंद ठेवण्यात येणार आहेत फक्त 10वी आणि 12वीचे वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय 31 जानेवारीपर्यंत लागू असणार आहे.

पुण्यातील शाळाही बंद करण्याचे महापौरांचे संकेत

महापौर मुरलीधर मोहोळ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक आज पार पडली. पुण्यात तूर्तास तरी शाळा बंदचा निर्णय नसल्याचं महापौरांनी स्पष्ट केलं आहे. असं असलं तरी पालकमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर नव्या निर्बंधांबाबत निर्णय होईल, असं महापौर म्हणाले. लसीकरणाबाबत पुणे राज्यात सर्वात पुढे आहे. 10 जानेवारीपासून बुस्टर डोस सुरु करत आहोत. तसंच नवीन निर्बंधांसंदर्भात पालकमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. यात शाळा, उद्यानं आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत विचार केला जाईल, असं महापौरांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.