देशातील १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण आजपासून

ओमायक्रॉन प्रकाराविरूद्धच्या लढयात  पुन्हा लक्ष केंद्रित करण्यासाठी केला पाहिजे-डॉ. मनसुख मांडविया

नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या लसीकरण नियोजनाचा शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड आढावा घेणार

औरंगाबाद,२ जानेवारी /प्रतिनिधी:- कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता लहान मुलांनाही लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाला देशभरात सुरूवात होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाताळच्या दिवशी घोषणा केली होती. आता नवीन वर्षापासून देशातील १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. यासोबतच १० जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सनाही खबरदारीचा डोस म्हणजे प्रिकॉशन डोस मिळेल.

मुलांच्या लसीकरणासाठी मुंबई महापालिकेसह राज्यभरातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्यात. नेमकी कशी सुरू आहे तयारी आणि लसीकरणासाठी नोंदणी कशी करायची? 

देशात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. ओमायक्रॉनचा धोका वाढत आहे. या पार्श्वभूमीवर 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातल्या मुलांचं लसीकरण सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. 

कशी करायची नोंदणी?

– लसीकरणासाठी कशी कराल नोंदणी? 
– सर्व प्रथम Covin App वर जाऊन लॉग इन करा
– मुलाचं नाव, जेंडर आणि जन्मतारीख निवडा
– तुमच्या जवळच्या लसीकरण केंद्राचा पिन कोड टाका. लसीकरण केंद्रांची यादी येईल.
– आता लसीकरणाची तारीख, वेळ आणि लस निवडा
– लसीकरण केंद्रावर जाऊन संदर्भ आयडी, सीक्रेट कोड सांगा आणि लस घ्या

महत्वाचं म्हणजे ज्या मुलांकडे आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र नसेल तर त्यांचं दहावीचं ओळखपत्रही पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जाणार आहे. इतकच नाही तर ऑनलाईन नोंदणीशिवाय वॉक इन नोंदणीचा पर्यायही देण्यात आला आहे. तर मग वाट कसली पाहता? कोरोविरोधातल्या लढाईचा भाग म्हणून प्रत्येक किशोरवयीन मुलानं लस घ्यायलाच हवी.

लसीकरण नियोजनाचा शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड घेणार आढावा

नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या लसीकरण नियोजनाचा शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड उद्या आढावा घेणार

कोविड-१९ ला प्रतिबंध करण्यासाठी आता १५ ते १८ वयोगटातील तरूणांना लस देण्यास मान्यता मिळाली आहे. याअनुषंगाने इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना लस देण्याबाबतच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी ३ जानेवारी रोजी सर्व संबंधितांची तातडीची बैठक आयोजित केली आहे.

कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांचे १०० टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे. राज्य शासन यासाठी सर्व पातळीवर प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत शालेय शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. त्याचा प्रा.वर्षा गायकवाड या बैठकीत आढावा घेतील.

या बैठकीस शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवांसह शिक्षण आयुक्त, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, महानगरपालिका/नगरपालिकेचे शिक्षणाधिकारी/ प्रशासन अधिकारी, गट शिक्षणाधिकारी ऑनलाइन उपस्थित राहणार आहेत.

ओमायक्रॉन प्रकाराविरूद्धच्या लढयात  पुन्हा लक्ष केंद्रित करण्यासाठी केला पाहिजे-डॉ. मनसुख मांडविया

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज राज्यांचे आरोग्य मंत्री आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे प्रधान सचिव/ अतिरिक्त मुख्य सचिव यांच्याशी कोविड-19 साठी सार्वजनिक आरोग्य सज्जता आणि राष्ट्रीय कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आभासी माध्यमातून  संवाद साधला. विषाणूच्या ओमायक्रॉन प्रकाराचे वाढते रुग्ण  आणि 15-18 वर्षे वयोगटाचे लसीकरण करण्याचा  अलीकडील निर्णय त्याचप्रमाणे निश्चित केलेल्या असुरक्षित वर्गासाठी  खबरदारीचा उपाय म्हणून दिला जाणारा  प्रिकॉशनरी डोस लक्षात घेऊन,  ही बैठक घेण्यात आली. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी या बैठकीची सूत्रे सांभाळली

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी या बैठकीत सुरुवातीपासूनच नमूद केले की, जागतिक स्तरावर, देश त्यांच्या पूर्वीच्या सर्वोच्च रुग्णसंख्येच्या  तुलनेत कोविड-19 रुग्णसंख्येत  3-4 पट वाढ अनुभवत आहेत. ओमायक्रॉन उत्परिवर्तन मोठ्या प्रमाणात संक्रामक  आहे, रुग्णांची मोठी लाट वैद्यकीय यंत्रणेवर भार आणू शकते त्यामुळे भारत कोविड-19 च्या या लाटेतून सुखरूप बाहेर येण्यासाठी मोठ्या रुग्णवाढीचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने, पायाभूत सुविधा वाढविण्यात कोणतीही कसर सोडू नये असा सल्ला त्यांनी राज्यांना दिला.

कोविड विषाणूचे उत्परिवर्तन कोणतेही असले तरी सज्जता आणि संरक्षणासाठीचे उपाय सारखेच आहेत, असे डॉ.  मांडविया यांनी यासंदर्भात बोलताना सांगतले.तळागाळाच्या स्तरावर  काम करण्यासाठी आणि देखरेख तसेच प्रतिबंधक यंत्रणा बळकट करण्याच्या दृष्टीने,राज्यांनी त्यांच्या पथकांमध्ये पुन्हा चैतन्य निर्माण करावे  त्याचप्रमाणे राज्यांनी ईसीआरपी -II अंतर्गत मंजूर निधीचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करावा असे आवाहन त्यांनी केले. यानंतर कोविड व्यवस्थापनाच्या विविध पैलूंवर म्हणजेच रूग्णालयाच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढीसह; चाचण्यांमध्ये वाढ ;संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी कठोर प्रतिबंधात्मक उपाय; आणि जनतेमध्ये कोविड प्रतिबंधासाठी सुयोग्य वर्तनावर भर यासंदर्भात  व्यापक आणि तपशीलवार चर्चा करण्यात आली.वैद्यकीय पायाभूत सुविधांमधील गंभीर अडथळ्यांवरही चर्चा करण्यात आली.

लसीकरण मोहिमेचे निर्णायक  महत्त्व अधोरेखित करताना मंत्री म्हणाले, “आपण 15-18 वयोगटातील लसीकरण आणि पात्र लाभार्थ्यांसाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रिकॉशनरी डोसच्या संदर्भात नियोजन करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे”. असुरक्षित वर्गात समावेश असलेल्या आरोग्य सेवेतील कर्मचारी आणि आघाडीवर राहून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे संपूर्ण  लसीकरण करण्यात आले आहे का, हे सुनिश्चित करण्याचे आवाहन डॉ. मनसुख मांडविया यांनी राज्यांना केले. 

देशात पायाभूत सुविधांचा विकास आणि लस उत्पादनाला गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत, याकडेही डॉ. मनसुख मांडविया यांनी लक्ष वेधले.संपूर्ण देशाला फायदा होण्याच्या दृष्टीने त्यांनी ,राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्याची विनंती केली