शिवसेनेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षकांचा गौरव

औरंगाबाद,२ जानेवारी /प्रतिनिधी:- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त शिवसेना औरंगाबाद शाखेच्या वतीने गौरव  शिक्षकांचा कार्यक्रमाचे आयोजन  3 जानेवारी सोमवार रोजी करण्यात आले असून शिवसेना नेते उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई  यांच्या हस्ते शिक्षकांचा गौरव करण्यात येणार असल्याचे संयोजक शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी कळवले आहे. 

तापडिया नाट्यमंदिरात सोमवारी दुपारी साडेबारा वाजता हा कार्यक्रम होणार असून महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष तथा अनुसूचित जाती जमाती आयोग महामंडळाचे राज्य अध्यक्ष ज.मो. अभ्यंकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी राहणार आहे.  त्याचप्रमाणे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे ,रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, ग्रामविकास व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार ,आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट ,आमदार रमेश बोरणारे ,आमदार उदयसिंह राजपूत यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमास राहणार आहे.

गौरव शिक्षकांच्या या कार्यक्रमानिमित्त आंतरराष्ट्रीय ग्लोबल टीचर्स अवॉर्ड विजेते प्राध्यापक रणजीत देसले यांचे आभासी मार्गदर्शन सुद्धा होणार आहे. कार्यक्रमास सर्व शिक्षक वृंद यांनी कोरोना नियमावलीचे पालन करून उपस्थित राहण्याचे आवाहन  कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना औरंगाबाद शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.