सेवाभावी विचारसरणीने केलेल्या कार्यामुळेच आज महात्मा गांधी मिशन संस्थेचा नावलौकिक जगभर -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार

संकटांमध्ये कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून योग्य प्रकारचे मार्गदर्शन-खासदार शरद पवार

संकटग्रस्त लोकांना मदत करण्याचा गांधीजींचा विचार या संस्थेने योग्यरीत्या कृतीमध्ये आणला-खासदार शरद पवार

शरद पवारांनी एमजीएमला दिली २ कोटींची देणगी

May be an image of 11 people, people standing and flower

औरंगाबाद,१ जानेवारी /प्रतिनिधी:- सेवाभावी विचारसरणीने केलेल्या कार्यामुळेच आज महात्मा गांधी मिशन संस्थेचा नावलौकिक जगभर आहे. आज हजारो विद्यार्थी आपल्या महाविद्यालयातून बाहेर पडून जगभर कार्य करत आहेतकधी भारताबाहेर गेल्यावर त्यांना भेटण्याची संधी मिळते, तेव्हा त्यांच्या मनात संस्थेबद्दल असलेल्या आस्थेबद्दल ऐकायला मिळते अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी एमजीएम विद्यापीठाचे कौतुक केले. त्यांच्या हस्ते विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीचे उदघाटन झाले.

May be an image of 11 people, people standing and flower

औरंगाबाद येथे एमजीएम संस्थेचा ३९ वा वर्धापन दिन खा.शरदचंद्र पवार यांच्या शुभहस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झाला.यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ,विद्यापीठाचे कुलपती कमलकिशोर कदम ,अंकुशराव कदम आदी उपस्थित होते.

May be an image of 5 people and people standing

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे भाषण त्यांच्याच शब्दांत …
महात्मा गांधीजींपासून प्रेरणा घेऊन माझे सहकारी कमल किशोर कदम यांनी महात्मा गांधी मिशन संस्था स्थापन केली. संस्था आज ४०व्या वर्षात पदार्पण करीत आहे, याचा मला विशेष आनंद होत आहे. राज्याबाहेर दर्जेदार शिक्षण देणारी संस्था म्हणून एमजीएम संस्था नावारूपाला आली. एमजीएम संस्थेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला मला प्रत्यक्ष हजर राहावे, ही माझी इच्छा होती. मात्र सद्यस्थितीतील कोरोना प्रादुर्भावामुळे मला उपस्थित राहता आले नाही.

महाराष्ट्राच्या बाहेर उत्तर प्रदेशमध्ये नोएडामध्ये जाण्याच्या प्रयत्नांनासुद्धा महात्मा गांधी मिशनला यश आले आणि तिथेही दर्जेदार शिक्षण देणारी संस्था म्हणून आज आपल्या संस्थेचा लौकिक आहे. मी अनेकवेळा दिल्लीमध्ये उत्तर प्रदेशच्या सहकाऱ्यांकडून संस्थेच्या यशाबद्दल ऐकतो. त्यावेळेला एक वेगळेच समाधान मिळते. या संस्थेची उभारणी करत असताना कमलभाऊ आणि त्यांच्या टीमसमोर एक निश्चित उद्दिष्ट होते. आताच कार्यक्रमामध्ये गौतम बुद्धांचा उल्लेख झाला आणि गौतम बुद्ध स्वत: एक जबरदस्त राज्यकर्ता होते. पण त्यांनी त्यांच्या राजसत्तेचा त्याग करून समाजासाठी कार्य केले. त्यांना विचारले असता, समाजातील अगदी शेवटच्या माणसाचे दु:ख संपवणे ही त्यांची जबाबदारी आहे, असे ते म्हणत. कमल किशोर कदम हे नेहमी सांगायचे की महाराष्ट्रातील तळागाळातील मुलांना शिक्षणाचा अधिकार व लाभ मिळाला पाहिजे आणि त्या भावनेनेच महात्मा गांधी मिशनची स्थापना झाली. आज ही संस्था एक नावलौकिक प्राप्त व दर्जेदार शिक्षण संस्था म्हणून नावारूपाला आली.

या संस्थेचं एक वैशिष्टय आहे, ते म्हणजे गांधीजींचा विचार चिरकालीन राहील, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे. महात्मा गांधींकडे एक महामानव म्हणून साऱ्या जगाने पाहिले. महात्मा म्हणून त्यांना संबोधलं. जबरदस्त शक्ती असलेल्या इंग्रजांच्या समोर सामान्य माणसाला संघटित करून कुठल्याही प्रकारचे शस्त्र हातात न घेता, हिंसेच्या मार्गाचा स्वीकार न करता अहिंसेच्या मार्गाने सामान्य माणसांची जबरदस्त शक्ती आपण उभी करू शकतो, हे संपूर्ण जगाला महात्मा गांधींनी दाखवून दिले. त्यामुळे गांधी आणि गांधी विचारांबद्दल जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आस्था आणि औत्सुक्य निर्माण झाले. त्याच विचाराने ही संस्था काम करते, याचा अभिमान आपल्या सगळ्यांना असायला हवा. या संस्थेने ज्या ज्या वेळेला समाजावर संकट आली त्या त्या वेळेला शैक्षणिक कार्य पलीकडे जाऊन त्या संकटग्रस्त लोकांना मदत करण्याची भूमिका सातत्याने घेतली. शेतीवरील दुष्काळाचे, अतिवृष्टीचे संकट असो, या संकटांमध्ये कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून योग्य प्रकारचे मार्गदर्शन करण्याचे काम या संस्थेने केले आहे.

कोरोनासारखं मोठं संकट संबंध जगावर आलं होतं आणि त्यावेळेला कुणी जबाबदारी घ्यावी याची महात्मा गांधी मिशन संस्थेने वाट पाहिली नाही. सगळे जण कामाला लागले आणि लाखभर रूग्णांना त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी हातभार लावला. संकटग्रस्त लोकांना मदत करण्याचा गांधीजींचा विचार या संस्थेने योग्यरीत्या कृतीमध्ये आणला. मी मुंबईत गेल्यावर कोरोना काळात विविध महानगरपालिकेच्या व विविध संस्थांच्या कामगिरीचा आढावा घेतला. त्यावेळेला तेथील लोकांनी हक्काने सांगितलं की आमच्या पाठीशी महात्मा गांधी मिशन संस्था होती. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, सेवाभावी परिचारिका आणि त्यांचे सगळे साहाय्यक यांनी कशाचीही चिंता न करता आम्हाला या संकटातून बाहेर काढण्याचे काम केले. अशा प्रकारे महात्मा गांधी मिशन संस्थेचे कौतुक मला ऐकू येतं तेव्हा माझी छाती अभिमानाने भरून येते.

आज दोन विद्यापीठे आपण काढली. त्यांच्यामार्फत विविध विषयांवर आपण शिक्षण देण्याचं काम केले. विद्यापीठाकडून घेतल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची आकडेवारी जर पाहिली तर साधारण २८० च्या आसपास ही आकडेवारी आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स विषयावर आपली संस्था काम करते आहे. असे नवीन उपक्रम आपण यशस्वीपणे राबवले आहेत. संस्थेचा लौकिक भारताबाहेर पसरला आहे त्याचा अभिमान वाटतो.

हे कार्य आपण अशाच पद्धतीने अखंडरीत्या चालू ठेवावं. एका लहानशा गावातून उभी राहिलेली संस्था घडण्यासाठी अनेकांनी हातभार लावले. इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष न देता आपण सेवाभावी विचारसरणीने केलेल्या कार्यामुळेच आज महात्मा गांधी मिशन संस्थेचा नावलौकिक जगभर आहे. आज हजारो विद्यार्थी आपल्या महाविद्यालयातून बाहेर पडून जगभर कार्य करत आहेत. कधी भारताबाहेर गेल्यावर त्यांना भेटण्याची संधी मिळते, तेव्हा त्यांच्या मनात संस्थेबद्दल असलेल्या आस्थेबद्दल ऐकायला मिळतं.

आपण करत असलेल्या कार्याबद्दल आपल्याला धन्यवाद देणं ही आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. कमलभाऊ, विजयअण्णा तुम्ही या ठिकाणी जे रोपटं लावले त्याचा महावृक्ष झाला. त्याची छाया समाजातील उपेक्षितांना मिळत आहे. त्यासाठी मी तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो.विद्यापीठाला पुढील वाटचालीसाठी एक कोटी रुपयांचा निधी सुपूर्द केला जाईल आणि त्याच्या व्याजातून विद्यार्थ्यांच्या विकसनशील प्रयत्नांना प्रोत्साहित करण्याची भूमिका आपण घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम राबवावे याकरिता एक कोटी रुपयांचा निधी आपल्याकडे देण्यात येईल. एकूण दोन कोटी रुपयांची ही रक्कम आपण कायमस्वरूपी मुदतठेव म्हणून बँकेत ठेवावी.

पुन्हा एकदा कमलभाऊ व इतर मान्यवरांना मी मनापासून धन्यवाद देतो.