नवोन्मेश आणि स्वयंउद्यमशीलतेला पोषक वातावरण तयार करण्याची गरज- उपराष्ट्रपती

  • आत्मनिर्भर भारत म्हणजे “संरक्षणवादी” अथवा ‘अलगवादाची’ भूमिका नाही :उपराष्ट्रपती
  • आत्मनिर्भर भारत मोहिमेत सहभागी होऊन ‘लोकल’ भारताला ‘ग्लोकल’ भारतात परिवर्तीत करा
  • पंतप्रधानांनी सुरु केलेल्या आत्मनिर्भर भारत ॲप संशोधन आव्हानाचे उपराष्ट्रपतींकडून कौतुक
  • ‘नव भारता’ला प्रयोगशील आणि नवनव्या संधींचा शोध घेणाऱ्या उत्साही तरुणाईची गरज
  • प्रत्येक क्षेत्रात भारताला विजयी शक्ती बनवण्यासाठी प्रयत्न करा : उपराष्ट्रपती
  • गुरुपौर्णिमेनिमित्त स्वदेशी बनावटीच्या ‘एलिमेंट’ या नव्या मोबाईल ॲपचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्‌घाटन

नवी दिल्ली, 5 जुलै 2020

देशात नवोन्मेशवृत्ती आणि स्वयंउद्यमशीलता वाढीस लागेल, यासाठी पोषक वातावरण तयार करण्याची गरज आहे, असे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी, भारतीयांनी ‘लोकल’ म्हणजेच स्थानिक उत्पादनांचा वापर सुरु करत, ‘ग्लोकल’ म्हणजे देशी उत्पादनांना जागतिक ब्रांड बनवण्यासाठी, पर्यायाने भारताला ‘ग्लोकल’ बनवण्यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन उपराष्ट्रपतींनी केलं. 

उपराष्ट्रपती भवनातून ‘एलिमेंट’ या स्वदेशी बनावटीच्या मोबाईल ॲपचे त्यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्स च्या माध्यामातून उद्‌घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.आत्मनिर्भर भारत अभियानाचा उद्देश देशाच्या आर्थिक क्षमतांना नवे बाल देऊन, एक मोठी झेप घेणे हा आहे, असे त्यांनी सांगितले. त्यासाठी, पायाभूत सुविधा अधिक मजबूत बनवणे. मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर, मनुष्यबळ अधिक कुशल करणे आणि एक दर्जेदार पुरवठासाखळी विकसित करणे हा आहे, असेही ते म्हणाले.

आत्मनिर्भर भारताविषयी सांगतांना ते म्हणाले, की देशात विविध ठिकाणी असलेल्या, अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रातील गुणवत्ता आणि उर्जेला अधिक झळाळी देणे, हाच या अभियानाचा उद्देश आहे. स्वयंउद्यमशीलतेला प्रोत्साहन, अभिनव कल्पनांना पाठबळ देत भरारी घेण्यासाठीचा या पाया आहे, ज्यातून शहरी आणि ग्रामीन भारताचा एकत्रित विकास होणार आहे, असे उपराष्ट्रपती म्हणाले.

आत्मनिर्भर भारत म्हणजे संरक्षणवाद किंवा जगापासून वेगळे होणारा ‘अलगवाद’ जोपासणारी भूमिका नाही, उलट हे एक व्यावसायिक प्रगतीचे धोरण असून या धोरणामुळे देशाला आपल्या पारंपारिक शक्तीची ओळख पटणार आहे तसेच त्याचा लाभ करुन घेण्याची संधी आहे, असे उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या आत्मनिर्भर भारत ॲप संशोधन आव्हानाचे उपराष्ट्रपटींनी कौतुक केले. देशातील गुणवंत शास्त्रज्ञ आणि कुशल तंत्रज्ञांमुळे भारत आयटीक्षेत्रातील एक महासत्ता म्हणून उदयास येत  आहे, असे कौतुकोद्‌गार उपराष्ट्रपतींनी काढले.  या आव्हान योजनेमुळे देशातील आयटी तज्ञांना नवनवे ॲप विकसित करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि त्या ॲपचा उपयोग आपले जीवनमान सुखकर करण्यासाठी होईल, असेही त्यांनी सांगितले.  पंतप्रधानांच्या कल्पनेनुसार, या आव्हानाची परिणती म्हणून अनेक दर्जेदार “मेड इन इंडिया’ ॲप तयार होतील ज्यातून आत्मनिर्भर ॲप इकोसिस्टीम देखील निर्माण होईल, असे नायडू यांनी सांगितले.

‘एलिमेंट’ या भारतीय बनावटीच्या ॲपची निर्मिती करण्यासाठी एक हजारपेक्षा अधिक आयटी व्यावसायिकांनी केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. “नव भारताला’ अशाच उत्साही आणि अभिनव कल्पना मांडणाऱ्या प्रयोगशील तरुणाईची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. “आपण केवळ कोणाचे अनुकरण करण्यासाठी संशोधन करु नये. संशोधन हा 21 शतकातला परवलीचा शब्द आहे.आपल्याकडे यशस्वी होण्यासाठीच्या सर्व गोष्टी आहेत. विविध क्षेत्रात जागतिक ब्रांड निर्माण करण्याचा पाया आपण रचला आहे.” असे नायडू यावेळी म्हणाले.

हे ॲप आठ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असेल, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. लवकरच हे ॲप इतर प्रादेशिक भाषांमध्येही उपलब्ध व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

भारतातील आयटी उद्योग आणि व्यावसायिकांचे हे प्रयत्न खरेच कौतुकास्पद आहेत कारण त्यांनी केवळ या क्षेत्रातील भारताची ताकद जगाला दाखवली नाही, तर आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले हे एक पाउल आहे. हे ॲप, अनेक परदेशी ॲप्सना उत्तम स्वदेशी पर्याय ठरू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देशातील प्रत्येक क्षेत्रात, भारताला प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी प्रयत्न करावेत, यावर नायडू यांनी भर दिला. विज्ञान-तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, संरक्षण क्षेत्र आणि मानवविकास, अशा प्रत्येक क्षेत्रात, भारताला आघाडीवर न्यायला हवे,असे त्यांनी सांगितले.

सध्या देशाला कोविड-19 सह इतर अनेक अंतर्गत आणि बाह्य आव्हानांचा सामना करावा लागतो आहे, असे सांगत, नायडू म्हणाले की सध्या आपण इतिहासातील एका महत्वाच्या टप्यातून जातो आहोत. मात्र, आपण आव्हानांचा सामना करतांना आपल्या निश्चयावर ठाम राहावे, असे त्यांनी सांगितले.

आज गुरुपौर्णिमेनिमित्त हे ॲप देशाला समर्पित करतांना उपराष्ट्रपतींनी ‘गुरु’ची आपल्या जीवनातील महत्वाची भूमिका विषद केली.

यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक, श्री श्री रविशंकर जी, जीएमाआर ग्रुप चे अध्यक्ष ग्रांधी मल्लिकार्जुन राव, योगगुरू बाबा रामदेव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *