वर्ष अखेर,नूतन वर्षाचे स्वागत साधेपणाने साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना

औरंगाबाद,३० डिसेंबर/प्रतिनिधी:- औरंगाबाद जिल्ह्यात यावर्षी 31 डिसेंबर (वर्ष अखेर) व नूतन वर्ष 2022चे स्वागत अत्यंत साधेपणाने साजरा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जिल्हा प्रशासनाने जारी केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत.

कोविड -19  व ओमिक्रॉन या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नगरविकास विभाग, मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच जिल्हा प्रशासनाने विहित केलेल्या नियमांचे कोटकोर अनुपालन नागरिकांनी करावे. कोरोनाच्या अनुषंगाने 31 डिसेंबर रोजी व 1 जानेवारी 2022 रोजी नववर्ष स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पाडता नववर्षाचे स्वागत शक्यतोवर घरीच साधेपणाने साजरे करावे, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी शशीकांत हदगल यांनी परिपत्रकाद्वारे केले आहे.

मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या आदेशान्वये राज्यात 25 डिसेंबरपासून रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सदर आदेशांचे नागरिकांनी पालन करावे. कोविड -19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता सूचनांचे ततोतंत पालन करावे. 31 डिसेंबर व नूतन वर्षच्या स्वागताकरिता आयोजित केलेल्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसनक्षमतेच्या 50 टक्केपर्यंत तर खुल्या जागेत आयोजित केलेल्या कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या 25 टक्केच्या मर्यादेत उपस्थित राहण्यास परवानगी असेल. सदर ठिकाणी कोणत्याहीप्रकारे गर्दी होणार नाही व शारीरिक अंतर राखले जाईल. मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच त्या ठिकाणी निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 60 वर्षांवरील नागरिकांनी व दहा वर्षांखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्याद्ष्टीने शक्यतोवर घराबाहेर जाणे टाळावे. 31 डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी  समुद्रकिनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्यासंख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टंसिंग (सामजिक अंतर) राहील, तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल, याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये. तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. नतून वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोणातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात. फटाक्यांची आतषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे कोटकोरपणे पालन व्हावे, असेही  परिपत्रकात नमूद करण्यात आलेले आहे.