शेतात लोंबकळणाऱ्या विजेच्या तारेचा धक्का ; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू, वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यासह तिघांविरुध्द गुन्हा दाखल

वैजापूर,२९ डिसेंबर /प्रतिनिधी :- शेतात लोंंबकळणाऱ्या विद्युत वाहिनीचा धक्का लागून एका तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यु झाल्याची घटना तालुक्यातील सवंदगाव येथे आज सकाळी घडली. ता रामेश्वर बाळु रिठे (वय 19 रा. सवंदगाव) असे घटनेतील मृत तरुणाचे नाव आहे. 

दरम्यान शेतकऱ्यांनी वेळोवेळी सांगूनही  लोंंबकळणाऱ्या  विद्युत वाहिनीबाबत दुर्लक्ष करून तरुणाच्या मृत्युस कारणीभूत ठरणाऱ्या महावितरणचे उपअभियंत्यासह तिघांंविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुजाडे  (लाईनमन), गव्हाड (सबस्टेशन कनिष्ठ अभियंता) रा.परसोडा व राहुल बडवे (उपअभियंता) रा. वैजापूर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांंची नावे आहेत.   

याबाबत अधिक माहिती अशी की, रामेश्वर रिठे हा  सवंदगाव येथे शेतीव्यवसाय करून उदरनिर्वाह करत होता. मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास सुमारास तो त्याचे शेत गट क्रमांक 263 मधील शेतात कांद्याच्या पिकाला पाणी भरण्यासाठी गेला होता.दुसऱ्या दिवशी सकाळी आठच्या वाजेच्या सुमारास लगतच्या शेतातील संतोष रिठे या शेतकऱ्याला रामेश्वर हा शेतात लोंंबकळत असलेल्या विद्युत वाहिनीला मृतवस्थेत चिकटलेला दिसून आला. घटनेची माहिती त्याने भ्रमणध्वनीद्वारे गावातील इतर शेतकऱ्यांना सांगितली. पोलीस पाटील यांनी ही माहिती महावितरणचा लाईनमन भुजाडे याला सांगून विद्युत प्रवाह बंद करण्यास सांगितले. यानंतर रामेश्वर याचे नातेवाईक व इतर शेतकऱ्यांनी त्याचा मृतदेह विद्युत वाहिनीपासून वेगळा केला. याप्रकरणी दिपक रिठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महावितरणचा लाईनमन भुजाडे  सबस्टेशनचा कनिष्ठ अभियंता गव्हाड व  उपअभियंता राहुल बडवे या तिघांंविरुद्ध वैजापूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.

घटना घडताच शेतकऱ्यांनी भ्रमणध्वनीवर महावितरणाच्या कर्मचाऱ्यांंना संपर्क करून घटनास्थळी  बोलावले, मात्र ते तिकडे फिरकलेच नाही. अखेर मृत रामेश्वर याचे नातेवाईक व  शेतकऱ्यांनी त्याचा मृतदेह रुग्णवाहिकेत टाकून शहरातील महावितरण कार्यालयात आणला. कर्तव्यात हलगर्जीपणा करून रामेश्वर याच्या मृत्युस कारणीभूत ठरणाऱ्याविरुद्ध तत्काळ गुन्हे दाखल करा अशी मागणी यावेळी त्यांनी केली. सुमारे दोन तास रुग्णवाहिका कार्यलयासमोरच उभी असल्याने कार्यालय परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. यावेळी पोलीसांंना पाचारण करण्यात आले. शवविच्छेदन झाल्यानंतरच इतर निर्णय घेता येतील असे पोलीस शेतकऱ्यांना समज देण्याचा प्रयत्न करत होते. मात्र अगोदर गुन्हे दाखल करा मगच रुग्णवाहिका याठिकाणाहुन बाहेर पडेल अशी भूमिका शेतकऱ्यांनी  घेतली.