हायस्पीड रेल्वेच्या चाचणीने गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार

नगर ते आष्टी दरम्यान धावली हायस्पीड रेल्वे ; बीड जिल्ह्यात प्रथमच धावलेल्या रेल्वेचे खा.प्रितमताई मुंडे यांनी केले स्वागत

कोण आली रे कोण आली…बीड जिल्ह्याची रेल्वे आली…मुंडे साहेब अमर रहेच्या घोषणांनी आसमंत दुमदुमला

  • हायस्पीड रेल्वेच्या चाचणीने बीड जिल्ह्यात जल्लोष

बीड /आष्टी ,२९ डिसेंबर/प्रतिनिधी :- बीड जिल्ह्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्प लवकरच पूर्णत्वाकडे जाणार आहे, नगर ते आष्टी दरम्यान धावलेल्या हायस्पीड रेल्वेमुळे हा बहूप्रतिक्षित प्रकल्प आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार आहे.

अहमदनगर रेल्वे स्थानक ते आष्टीपर्यंत चाचणीच्या निमित्ताने रेल्वेचे प्रथमच बीड जिल्ह्यात आगमन झाले,चाचणीसाठी धावलेली रेल्वे प्रथमच जिल्ह्यात आल्यानंतर खा.प्रितमताई मुंडे यांच्यासह असंख्य बीडकरांनी रेल्वेचे उत्साहात स्वागत केले.नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पाचे काम सध्या जलदगतीने सुरू आहे,नगर ते आष्टी दरम्यान लोहमार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर हायस्पीड रेल्वेची चाचणी घेण्यात आली.बीड जिल्ह्यासाठी हा क्षण अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा असल्याची प्रतिक्रिया यावेळी खा.प्रितमताई मुंडे यांनी दिली.यावेळी आ.सुरेश धस,मा.आ.भीमराव धोंडे, विजय गोल्हार, सर्जेराव तांदळे, देविदास नागरगोजे,सलीम जहांगीर, सविता गोल्हार, रामदास बडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आणि नागरीक उपस्थित होते.

खा.प्रितमताईंनी दिलेल्या घोषणेने आसमंत दुमदुमला

हायस्पीड रेल्वेच्या माध्यमातून जिल्ह्यात प्रथमच आलेल्या रेल्वेचे बीडकरांनी आष्टी रेल्वे स्थानकावर जल्लोषात स्वागत केले.लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी बघितलेले स्वप्न अनेक दशकांच्या प्रतिक्षेनंतर पंकजाताई आणि प्रितमताई मुंडे यांच्या प्रयत्नांनी प्रत्यक्षात धावलेले बघून उपस्थितांनी मुंडे साहेब अमर रहेच्या घोषणा दिल्या.यावेळी खा.प्रितमताई मुंडे यांनी ‘कोण आली रे कोण आली’ म्हणताच उपस्थितांनी ‘बीड जिल्ह्याची रेल्वे’ आली म्हणत आसमंत दुमदुमून टाकला.

रेल्वेचे स्वागत…स्थानकाची पाहणी आणि शब्दपूर्तीची हमी

रेल्वेचे स्वागत केल्यानंतर खा.प्रितमताई मुंडे यांनी विधिवत पूजा करून ‘रेल्वेपूर्तीचे’ नारळ फोडले.यावेळी त्यांनी रेल्वे स्थानकाची पाहणी केली,तसेच रेल्वे ट्रकवर चालत लोहमार्ग ही बघितला.रेल्वे हा जिल्ह्याच्या आणि आमच्या अस्मितेचा विषय असल्याने लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण करून जिल्ह्यात रेल्वे धावती ठेवू अशी हमी दिली,यावेळी उपस्थितांनी ‘ताई तुम्हीच रेल्वे प्रकल्प पूर्ण करू शकता ‘ अशी प्रतिक्रिया देऊन पंकजाताई आणि प्रितमताई म्हणजे शब्दपूर्तीची हमी असल्याची भावना व्यक्त केली.