ठाकरे सरकार सर्वात घाबरट आणि पळपुटं सरकार, देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

मुंबई,२८ डिसेंबर /प्रतिनिधी:- विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीमुळे महाविकास आघाडी सरकारआणि राज्यपाल सामना पाहण्यास मिळाला. तर दुसरीकडे आज  विद्यापीठ सुधारणा विधेयकावरून सभागृहात प्रचंड गोंधळ पाहण्यास मिळाला. भाजपच्या नेत्यांनी हे बेशरम सरकार आहे अशा घोषणाबाजी करून गोंधळ घातला. या गोंधळातच  विद्यापीठ सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले आहे. या विधेयकासह अधिवेशनाचे सूप वाजले आहे.

हिवाळी अधिवेशनात आज रात्री विद्यापीठ सुधारणा विधेयकावरून अभुतपूर्व गोंधळ पाहण्यास मिळाला. राज्य सरकारने हे विधेयक मंजूर करून घेतले आहे. त्यामुळे संतापलेल्या भाजपच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला. ‘सरकारचा धिक्कार’ असो अशा घोषणा दिल्या.

भाजप आमदार उभे राहून घोषणाबाजी करत होते. एवढंच नाहीतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सातत्याने सत्ताधारी यांना ‘बेशरम हा शब्द वापरण्यात येत होता. अखेर प्रचंड गोंधळात विद्यापीठ सुधारणा विधेयक संमत करण्यात आले आहे.

त्यानंतर सभागृहातून बाहेर पडल्यानंतर फडणवीस यांनी माध्यमांशी बोलत असताना महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

आजचा दिवस महाराष्ट्राच्या लोकशाहीतला सर्वात काळा दिवस आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात घाबरट आणि सर्वात पळपुटं सरकार कुठलं असेल तर ते ठाकरे सरकार, महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार आहे, हे आज सिद्ध झालं आहे असा घणाघात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं आज सूप वाजलं, आजच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळच्या सत्रात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ सुधारण विधेयक मांडलं. विरोधकांनी यावर जोरदार आक्षेप घेत गोंधळ घातला. पण गोंधळातच हे विधेयक मंजूर करुन घेतलं. यावर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

चर्चा न करता विधेयक मंजूर
विधानसभेत विद्यापीठाच्या कायद्यावर अकॅडेमीक चर्चा सुरु असताना जाणीवपूर्वक ठरवून चुकीच्या पद्धतीने आक्षेप घेऊन त्याठिकाणी चर्चा न करता हे विधेयक मंजूर करुन घेण्याचं पाप या सरकारने केलं आहे. दुर्देवाने या पापामध्ये विधानमंडळाचं सचिवालयही पूर्णपणे सामील आहे असा आरोप फडणवीस यांनी केला. खरंतर आम्ही अतिशय महत्वाची ऑब्जेक्षण मांडले होते. या राज्य सरकारला विद्यापीठांना आपलं शासकीय महामंडळ बनवायचं आहे असा आरोपही फडणवीस यांनी केला आहे.

‘आजचा दिवस महाराष्ट्राच्या लोकशाहीतील सर्वात काळा दिवस आहे. सर्वात घाबरट आणि पळपुटे सरकार आहे. विद्यापीठ विधेयकावर चर्चा सुरू असताना चुकीच्या पद्धतीने कामकाज रेटलं. विद्यापीठ ही राजकारणात नव्हते. आता उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांनी स्वत:ला प्र कुलपती म्हणवून घेतले आहे. अधिकार काढून घेतले. नविन शैक्षणिक धोरणाच्या विरोधात हा कायदा आहे. हे विद्यापीठावर कब्जा करू पहात आहेत, असा आरोप फडणवीसांनी केला.

‘आजवर हे टेंडरचे कागदोपत्र मागवते होते. आता विद्यापीठ ही राजकारणाचा अड्डा होईल. बहुमत असताना हे विधानसभा अध्यक्षपद निवडू शकत नाही कारण यांची माणसे यांच्या बरोबर नाहीतर आम्ही राज्यपालांकडे, न्यायालयात जाऊ. राज्यातील प्रत्येक विद्यापीठांत भाजप आंदोलन करेल. हा काळा दिवस कुणी विसरणार नाही’, असा इशाराही फडणवीसांनी दिला.

राज्यपालांना भेटणार, जानेवारीत आंदोलन करणार 
विधानसभेत झालेल्या प्रकाराची संपूर्ण माहिती राज्यपालांना देण्यात येणार आहे. तसंच हे विधेयक रोखण्यात यावं अशी मागणी त्यांच्याकडे करणार आहेत. तसंच न्यायलयातही या प्रकरणी दाद मागू असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. शिवाय, जानेवारी महिन्यापासून ठाकरे सरकारविरोधात प्रत्येक विद्यापीठात जाऊन भाजप, अभाविपचे कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत, जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

तर, हा सरकारचा आतंकवाद आहे. लोकशाहीचे उल्लंघन करत हा कायदा आणला आहे. हे बेईमानी करून सरकार आले आहे. अव्यवस्था निर्माण करण्याचे काम हे सरकार आहे, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.