सभागृहाची शान आणि मान राखण्याची जबाबदारी प्रत्येक सदस्याची-उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई,२८ डिसेंबर /प्रतिनिधी:- सदस्यांनी सभागृहात तारतम्य ठेवून बोलणे आवश्यक आहे. सभागृहाची शान आणि मान राखण्याची जबाबदारी प्रत्येक सदस्याची असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्यांनी संसदीय राजशिष्टाचार आणि आचारसंहितेचे पालन करावे, यासाठी विधीमंडळात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सविस्तर भूमिका व्यक्त केली.

श्री.पवार म्हणाले, सभागृहाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी विधीमंडळातील सर्वच पक्षाच्या आमदारांनी नियमांचे पालन केले पाहिजे. विधीमंडळ सर्वोच्च असून इतक्या वर्षांच्या सभागृहाच्या प्रदीर्घ वाटचालीत विधीमंडळ सभागृहाने उच्च मूल्य प्रस्थापित केली आहेत. त्यामुळे प्रत्येक आमदाराने आदर्श आचारसंहितेचे पालन करत जबाबदारीने वागले पाहिजे. विधानसभेत आमदार म्हणून निवडून आल्यानंतर तो सार्वजनिक जीवनात कसा वागतो? सभागृहात कसे वर्तन करतो? यावरुन त्याची प्रतिमा ठरत असते आता विधिमंडळाच्या  दोन्ही सभागृहाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण होते. राज्य आणि माध्यमे आपल्याकडे पाहत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने संसदीय शिष्टाचाराचे पालन केले पाहिजे असेही श्री.  पवार यावेळी म्हणाले.

००००

धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शासन सकारात्मक – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 28 :  राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून त्यांच्या खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून थेट रक्कम जमा करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले.

विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनामार्फत मदत मिळावी याबाबतचा मुद्दा विधानसभेत सदस्यांनी उपस्थित केला होता.

श्री.पवार म्हणाले, दरवर्षी डिसेंबर महिन्यात नागपूर येथे हिवाळी अधिवेशन घेण्यात येते. या अधिवेशनात धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनामार्फत मदत जाहीर केली जाते. मात्र मागील दोन वर्षांपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन झालेले नाही. परंतु राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शासन सकारात्मक आहे. मूळ धान उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळण्यासाठी धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीद्वारे पैसे जमा करण्यात येतील, असेही श्री.पवार यांनी सांगितले.