संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्याचे स्वप्न साकारणारी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था

राज्यातील अधिकाधिक  विद्यार्थ्यांना संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून जास्तीत जास्त संख्येने जाता यावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने सन 1977 मध्ये औरंगाबाद येथे मुलांसाठीची सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची स्थापना केली आहे. आपल्या देशाच्या सेवेसाठी आज पर्यंत साडेपाचशे पेक्षा अधिक विद्यार्थी संरक्षण दलातील विविध विभागात अधिकारी म्हणून या संस्थेच्या माध्यमातून मिळाले आहेत. दरवर्षी हजारो विद्यार्थी या संस्थेमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी संस्थेव्दारे घेण्यात येणारी पात्रता परिक्षा देतात. यातील गुणवत्ता यादीनुसार साधारण तीनशे विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येवून छाननी अंती केवळ 60 विद्यार्थ्यांची  या प्रशिक्षणासाठी निवड केली जाते. त्यानंतर दोन वर्षाच्या खडतर प्रशिक्षणानंतर विद्यार्थी  राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी  (एन.डी.ए)  साठी प्रवेशास पात्र ठरतो आणि सोबतच परिक्षा पास होण्याचीही शक्यता वाढते. पुढील वर्षाच्या प्रवेशासाठीहि या संस्थेकडून राज्यभरातून  सैनिकी सेवापूर्व शिक्षण 46 व्या तुकडीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांना दि.24 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज दाखल करता येईल.

galleryimg12

यासाठी पात्रता- या  प्रशिक्षणासाठी अर्ज करणारा उमेदवार हा अविवाहित मुलगा असावा. उमेदवार महाराष्ट्राचा अधिवासी असावा, त्याचा जन्म 02 जानेवारी 2006 ते 31 डिसेंबर 2007 च्या दरम्यान झालेला असावा. तर मार्च / एप्रिल / मे 2022 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत परीक्षेला बसणारा असावा. म्हणजेच जून 2022 मध्ये इयत्ता 11 वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असावा. तसेच उमेदवार हा सैन्यदलात अधिकारी बनण्यासाठी दिलेल्या सर्व निकषांसाठी पात्र असावा. यूपीएससी ने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, पुणे (एन.डी.ए) आणि भारतीय नौसेना प्रबोधिनी, एझिमला, केरळ (आय.एन.ए.) येथील प्रवेशासाठी निश्चित करण्यात आलेल्या शारिरीक निकषास पात्र असावा. हे निकष यूपीएससी तथा सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबादच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. उमेदवाराची उंची 157 सेंटीमीटर., वजन 43 किलोग्रॅम, कमीत कमी छाती न फुगवता-74 सेंटीमीटर, फुगवून-79 सेंटीमीटर, रातांधळा किंवा रंगांधळेपणा नसावा, चष्मा (-) 2.0 D पेक्षा जास्त नसावा.

galleryimg11

सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था औरंगाबाद यांच्याकडे अर्ज प्राप्त झाल्यानंतर उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखत यांच्याद्वारे केली जाते. पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा इंग्रजी  माध्यमातून 13 फेब्रुवारी 2022 रोजी विविध केंद्रावर घेतली जाईल. परीक्षेमध्ये एकाच प्रश्नपत्रिकेत 150 गुणांचे बहुपर्यायी प्रश्न असतील. त्यामध्ये गणिताचे 75 आणि सामान्य ज्ञानावर 75 गुण आधारित असतील. लेखी परीक्षा साधारणतः  इयत्ता 8 वी ते 10 वी च्या स्टेट बोर्ड व सी.बी.एस.ई. च्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल. प्रत्येक योग्य उत्तराला 1 गुण मिळेल व प्रत्येकी चुकीच्या उत्तराला 0.5 गुण वजा केले जातील. तसेच यशस्वी परीक्षार्थींना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. पात्र उमेदवाराची मुलाखत प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन माध्यमातून घेण्यात येतील.

तेव्हा इच्छूक उमेदवारांना www.spiaurangabad.com या वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करता येईल. परीक्षा शुल्क रु.450 ऑनलाईन फक्त क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, किंवा नेट बँकींग इत्यादी द्वारे भरावे. डिमांड ड्राफ्ट किंवा चलान द्वारे भरलेले परीक्षा शुल्क स्विकारले जाणार नाही. प्रवेश अर्ज संस्थेच्या अटी व शर्ती नुसार भरलेला नसल्यास अर्ज नामंजूर होईल. तसेच प्रवेश परीक्षा शुल्क परत मिळणार नाही. प्रवेश अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख    24 जानेवारी 2022 सायं.6.00 वाजेपर्यंत असणार आहे. उमदेवारांना परीक्षेचे हॉल तिकीट दि.07 फेब्रुवारी 2022 रोजी संस्थेच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल. परीक्षा संबंधीत सूचनांसाठी वेळोवेळी www.spiaurangabad.com  या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन औरंगाबाद, सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेचे संचालक अमित दळवी कर्नल (निवृत्त) यांनी केले आहे

मुलांप्रमाणेच मुलीही देश सेवेची संधी मिळण्यास पात्र होण्यासाठी  या संस्थेप्रमाणेच मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था असावी या मागणी चा सकारात्मक विचार करून  औरंगाबादच्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेच्या धर्तीवर नाशिक येथे महिलांसाठी सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यासाठी  नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समितीही गठित करण्यात आली आहे. नाशिक येथे मुलींसाठीही सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र लवकर सुरु झाल्यास महिलांनाही देश सेवेची संधी मिळणार आणि संरक्षण दलात महिलांचे प्रमाणही वाढणार हे  मात्र नक्की…..

रेखा पालवे

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,मराठवाडा विभाग, औरंगाबाद