समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगासह वेतन वेळत अदा करणार – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

मुंबई,२८ डिसेंबर/प्रतिनिधी :- समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे दर महिन्याला वेळेत वेतन मिळेल, असे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासांत सांगितले.

श्री. मुंडे म्हणाले, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत एकुण 54 समाजकार्य महाविद्यालयापैकी 50 महाविद्यालये कार्यरत आहेत. यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवाविषयक सोईसुविधा लागू करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

सेवा प्रणालीच्या माध्यमातून हे वेतन करण्यात येत आहे. यात असलेल्या त्रुटी दूर करुन सर्वांचे वेतन वेळेत दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. शिष्यवृत्तीची रक्कम आधार लिंक करुन दिली जाते. याशिवाय इतर योजना राबविण्यात येतात सामाजिक न्याय विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या योजनांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही योजनेसाठी निधी वळविला जात नाही, असे श्री. मुंडे यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

या अनुषंगाने सदस्य सर्वश्री नागोराव गाणार, गिरीश व्यास, अभिजित वंजारी, कपिल पाटील, विक्रम काळे, विजय उर्फ भाई गिरकर आदिंनी प्रश्न उपस्थित केला होता.