आत्‍या बहिणीच्‍या पतीचा गळा चिरुन निर्घुण हत्‍या:आरोपीला जन्‍मठेप

औरंगाबाद,२७ डिसेंबर /प्रतिनिधी:- दारु पिऊन  वारंवार मामेबहिणीला त्रास देत असल्या कारणाने व अनैतिक संबंधात अडसर येत होता म्ह्णून आत्‍याभावाने आत्‍या बहिणीच्‍या पतीचा गळा चिरुन निर्घुण हत्‍या केली. हा प्रकार २३ जुलै २०१८ रोजी उघडकीस आला होता. या प्रकरणात आरोपी धर्मा प्रताप जाधव (२२, रा. पुंडलिकनगर, मुळ रा. बावणी पांग्री ता. बदनापुर जि. जालना) याला जन्‍मठेप आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्‍यायाधीश ए.एस. कलोती यांनी सोमवार दि.२७ रोजी ठोठावली.

या प्रकरणात सातारा पोलीस ठाण्‍याचे तत्कालीन सहायक फौजदार त्रिंबक हरिभाऊ पवार यांनी फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, २३ जुलै २०१८ रोजी सकाही पावणे सात वाजेच्‍या सुमारास फिर्यादी व त्‍यांचे सहकारी परिसरात गस्‍त घालत होते. त्‍यावेळी नियंत्रण कक्षाला एका मोबाइल धारकाने फोन करुन रेणुकामाता मंदीर कमानी समोरील मैदानात मातीच्‍या ढिगार्याखाली मृत देह पडलेला असल्याचे सांगण्‍यात आले. ही माहिती निंयत्रण कक्षाने फिर्यादी व त्‍यांच्‍या सहाकार्यांना दिली. माहिती आधारे पोलिसांनी रेणुकामाता मंदीर कमानीसमोरील मैदान गाठले. तेथे एका व्‍यक्तीची गळा चिरुन हत्‍या करण्‍यात आल्याचे निदर्शनास आले.या प्रकरणात सातारा पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

असा लागला छडा

तपासादरम्यान पोलिसांना मयताचे नाव मयत संतोष जानू चव्‍हाण असल्याचे व तो हायकोट कॉलनी परिसरात राहात असल्याचे समजले़. त्‍यानंतर संग्रामनगर उड्डाणपुलाजवळ पोलिसांना संतोष चव्हाण यास तीन ते चार जण घेऊन जाताना सीसीटीव्ही फुटेज मिळाले़. फुटेज आधारे पोलिसांनी आरोपी धर्मा जाधव याचा मीत्र सचिन गोरे याची चौकशी केली असता, २२ जुलै २०१८ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्‍या सुमारास धर्माने फोन करुन सचिनला दर्गा रेल्वे पटरी जवळ बोलावले होते. त्‍यानूसार सचिन रेल्वे पटरीजवळ दुचाकीवर गेला. तेथे धर्माने माझा जवळचा नातेवाईक खून दारु पिला असून त्‍याला नेवून सोडायचे असल्याचे त्‍याने सांगितले. त्‍यानंतर धर्माने दोनतीन जणांच्‍या मदतीने नातेवाईकाला गाडीवर बसवले. रेणुकामाता मंदीर कमानीसमोर आरोपी धर्माने नातेवाईकाला गाडीवरुन उतरवले आणि सचिनला जाण्‍यास सांगितले.

दारु पिवून संतोष वारंवार करत होता भांडण

मयत संतोष चव्हाण आणि ज्योती यांचा सन २०१५ प्रेम विवाह झाला होता. मात्र संतोष दारूच्या आहरी गेला होता. संतोष दारूच्या नशेत ज्योतीला वारंवार त्रास देत होता. या‍बाबत ज्योतीने धर्माला सांगितले होते. मामबहिणीला वारंवार होणारा त्रास पाहून धर्माने संतोषचा गळा चिरुन खून केल्याचे तपासात समोर आले.

आरोपी धर्माला जन्‍मठेप

आरोपी हा गुन्‍हा घडल्यापासून अटकेत आहे. प्रकरणात तपास अधिकारी तथा तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे यांनी न्‍यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्‍या सुनावणीवेळी जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी १४ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्‍यात चौघांचे जबाब महत्वाचे ठरले तर एक जण फितुर झाला. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून भादंवी कलम ३०२ अन्‍वये जन्‍मठेप आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात अॅड. देशपांडे यांना अॅड. सिध्‍दार्थ वाघ यांनी सहाय केले. तर पैरवी म्हणुन पोलीस नाईक माहदेव सोळंके यांनी काम पाहिले.