छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम पूर्ण व्हावे ही सर्वांचीच भूमिका – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

विधानपरिषद कामकाज

मुंबई,२७ डिसेंबर /प्रतिनिधी:- छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे अराध्य दैवत आहे. अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे ही सर्वांचीच भूमिका आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) अशोक चव्हाण यांनी दिली.

विधानपरिषद सदस्य विनायकराव मेटे यांनी अरबी समुद्रात मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय गेली अनेक वर्षापासून रखडलेला आहे. या शिवस्मारक बांधकामाबाबत केलेल्या कार्यवाहीबाबत लक्षवेधी मांडली.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी सर्वांचीच सकारात्मक भूमिका आहे. कोरोना परिस्थ‍ितीमुळे या कामाच्या मुदतवाढीसंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. या स्मारकाचे काम करणाऱ्या मे. एल अँड टी लिमिटेड कंपनीला आजतागायत कोणत्याही प्रकारची रक्कम अदा करण्यात आली नाही तसेच या कंपनीसोबत मुदतवाढ न देता करार रद्द करावयाचे ठरवले असते तर त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई द्यावी लागली असती. या कामाबाबतचा करारनामा करण्यापूर्वी तसेच करारनामा केल्यानंतर उद्भवलेले न्यायालयीन दावे यावर देखील काम सुरू आहे. तसेच या कामाला मुदतवाढ देताना त्यासाठी कोणतीही अतिरिक्त रक्कम संस्थेला देण्यात येणार नाही. या कामाबाबत सातत्याने वेळोवेळी आढावा घेऊन हे काम सुरू व्हावे तसेच हे स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी विधानपरिषदेत दिली.

बनावट नकाशांबाबत दोषींवर कारवाई होणार – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

मुंबई उपनगर जिल्ह्यातील भूमी अभिलेख उपअधीक्षक यांच्या अभिलेखातील १०२ नकाशे संशयास्पद असल्याच्या तक्रारींबाबत दोषींविरूद्धची कारवाई लवकरात लवकर पूर्ण होईल, अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानपरिषदेत सादर केली.

विधानपरिषद सर्वश्री सदस्य विजय गिरकर, प्रविण दरेकर यांनी मुंबई उपनगर अंतर्गत उपअधीक्षक, भूमि अभिलेख कार्यालयाच्या अखत्यारितील मौजे एरंगळ व उपनगरीय गावे ता.बोरीवली येथील हद्द कायम मोजणीचे जवळपास ८३० हून अधिक नकाशे बनावटरित्या तयार करून भूमि अभिलेख विभागाच्या अधिकृत मूळ अभिलेखात छेडछाड करून खोट्या नोंदी करून शासनाची फसवणूक केल्याबाबत दोषींवर कारवाई होणार का याबाबत लक्षवेधी विधानपरिषदेत सादर केली.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, ठाणे जिल्ह्यातील  वैभव ठाकूर यांनी  दाखल केलेल्या तक्रारीनुसार मुंबई उपनगर जिल्ह्यातील भूमी अभिलेख उपअधीक्षक यांच्या अभिलेखातील १०२ नकाशे संशयास्पद आहेत याची खात्री झाली आहे. जिथे बनावट नकाशे आढळले आहेत असे नगर भूमापन अधिकारी कार्यालय गोरेगाव येथे सखोल चौकशी करून सात आलेखांबाबत तर नगर भूमापन एरंगळ येथे चार सदोष नकाशे आढळले आहेत याबाबतीत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबधित नकाशांच्या नकला देण्याचे काम बंद करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणात दोषींवर कारवाई लवकरात लवकर करण्यात येईल, अशी माहितीही महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानपरिषदेत दिली.

शाळा व वर्ग तुकड्यांना अनुदान वेळेत मिळावे यासाठी प्रयत्नशील – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या तुकड्यांना अनुदान वेळेत मिळावे यासाठी शालेय शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी लक्षवेधीला उत्तर देताना दिली.

विधानपरिषद सदस्य डॉ.सुधीर तांबे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयामध्ये काही कागदपत्राअभावी अनेक शाळा त्रुटीमध्ये आलेल्या आहेत अशा शाळा तसेच वर्ग तुकड्यांना शासनाच्या निर्देशाप्रमाणे ३० दिवसाच्या आत प्रस्ताव दाखल करूनही सहा ते सात महिने उलटले तरी शाळा व वर्ग तुकड्यांना अनुदान मिळालेले नाही यासंदर्भात लक्षवेधी सभागृहात मांडली. या लक्षवेधीच्या चर्चेत विधानपरिषद सदस्य भाई जगताप, अमरनाथ राजूरकर यांनी सहभाग घेतला.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, शासनाकडून पात्र घोषित करण्यात आलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची तपासणी करून अनुदानासाठी प्राप्त असल्याबाबत काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा अनुदानासाठी पात्र ठरल्या आहेत. ज्या शाळा त्रुटी असल्याच्या कारणास्तव अपात्र ठरलेल्या आहेत त्या शाळांना तीस दिवसात त्रुटी पूर्तता प्रस्ताव शासनास सादर करण्यास कळविले होते. वित्त विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार यापुढे कोणत्याही शाळा अथवा तुकड्यांना  अनुदानास पात्र घोषित करण्यापूर्वी वित्त विभागाची मान्यता आवश्यक राहील असे कळविले होते त्यानुसार वित्त विभागाकडे याबाबतीत काढण्यात आलेल्या त्रुटीं दूर करण्याबाबत स्वत: पाठपुरावा करू, सर्व आमदारांसह उपमुख्यमंत्री यांना भेटून हा प्रश्न सोडविणार असल्याची  माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

अल्पसंख्यांक शिक्षण संस्थांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार – शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

अल्पसंख्यांक शिक्षण संस्थांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी लक्षवेधीला उत्तर देताना दिली.

विधानपरिषद सदस्य डॉ.वजाहत मिर्झा यांनी अल्पसंख्यांक संस्थेमध्ये शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या भरतीवरील बंदीमुळे अल्पसंख्यांक समाजातील अनेक सुशिक्ष‍ित रोजगाराच्या संधीपासून वंचित राहत आहेत. कोरोना कालावधीतही अल्पसंख्याक शाळामध्ये कार्यरत असलेल्या व मरण पावलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीवरील बंदी मुळे कोणतेच लाभ देण्यात आले नाहीत यासंदर्भात लक्षवेधी विधानपरिषदेत सादर केली.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, आपल्या निवडीप्रमाणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची निवड करून नेमणूक करण्याचा अधिकार या अल्पसंख्यांक शिक्षण संस्थांना आहे. तसेच न्यायालयीन आदेशानुसार दि. 13 जुलै 2016 च्या शासन निर्णयान्वये अल्पसंख्यांक शिक्षण संस्थाचे कर्मचाऱ्यांच्या भरती, नेमणूक  व ऐच्छिक समायोजनाबाबतचे अधिकार आबाधित ठेवले आहेत. अशी माहिती  शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत दिली.

अकोला येथील कामगार मृत्यू प्रकरणी दोषींवर कारवाई करणार – कामगार राज्यमंत्री बच्चू कडू

अकोला येथील ईगल इन्फ्रा कन्सोरटियमच्या डांबराच्या इमरशन टँकला वेल्डींग व प्लंबींगचे काम करत असताना स्फोट होऊन मृत्यू व जखमी झालेल्या कंत्राटी कामगारांच्या प्रकरणात दोषींवर नक्कीच कारवाई करणार आहे, अशी माहिती कामगार राज्यमंत्री बच्चू  कडू  यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना दिली.

सदस्य विनायक मेटे यांनी  अकोला येथील ईगल इन्फ्रा कन्सोरटियमच्या डांबराच्या इमरशन टँकला वेल्डींग व प्लंबींगचे काम करत असताना स्फोट होऊन त्यात दोन कंत्राटी कामगारांचा मृत्यू व तर चार कंत्राटी कामगार जखमी झालेल्या प्रकरणात  दोषींवर कोणती कारवाई केली याबाबतची लक्षवेधी विधानपरिषदेत मांडली.

कामगार राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले, अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर अमरावती ते चिखली पॅकेज २ चे रस्ता बांधणीचे काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणमार्फत मे. ईगल इन्फ्रा कन्सोरटियमला देण्यात आले आहे. अकोला येथील ईगल इन्फ्रा कन्सोरटियमच्या डांबराच्या इमरशन टँकला वेल्डींग व प्लंबींगचे काम करत असताना २४ नोव्हेंबर रोजी स्फोट होवून  त्यात दोन कंत्राटी कामगारांचा मृत्यू तर चार कंत्राटी कामगार जखमी झालेले आहेत. मयत दोन कामगारांच्या वारसदारांना प्रत्येकी रूपये पाच लाख रूपये भरपाई अदा करण्यात आली आहे. तसेच जखमी कामगारांच्या वैद्यकीय उपचारांचा सर्व खर्च कंत्राटदारांनी केलेला आहे. संबधित प्रकरणात दोषिंविरूद्ध कारवाई देखील करण्यात येणार असल्याची माहिती कामगार राज्यमंत्री बच्चू  कडू यांनी विधानपरिषदेत दिली.