माहीम येथील बनावट विदेशी मद्याचा कारखाना उद्ध्वस्त

मुंबई,२६ डिसेंबर/प्रतिनिधी:-  मोरी रोड, माहिम येथील कासा कोरोलीना बिल्डींग येथे छापा घातला असता त्या ठिकाणी परदेशातून आयात झालेले उच्च प्रतीचे विदेशी मद्य, भारतीय बनावटीचे विदेशी मद्य व परराज्यातील मद्य अशा एकूण विविध क्षमतेच्या १२३ सीलबंद बाटल्या व १८ रिकाम्या बाटल्या असा एकूण  ८ लाख ३७ हजार ६९२ रुपये  किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यामध्ये झहीर होसी मिस्त्री यास महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे. या आरोपीस  न्यायालयासमोर हजर करण्यात आलेले आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क, मुंबई आयुक्त कांतीलाल उमाप, राज्य उत्पादन शुल्क, ठाणे चे विभागीय उप-आयुक्त,  सुनिल चव्हाण, अंमलबजावणी व दक्षता संचालक श्रीमती उषा वर्मा  तसेच मुंबई शहर अधीक्षक  सी.बी. राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, “आय” विभाग मुंबई शहर कार्यालयाने केली असून वरील सर्व विदेशी मद्य  नाताळ व नववर्षे सणानिमित्त विक्री करण्याचा उद्देश होता. या गुन्ह्याचा पुढील तपास विनोद जाधव, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, आय विभाग, मुंबई शहर हे करीत असून जवान एस.एस. जाधव यांनी गुन्ह्याची फिर्याद दिली.

बनावट मद्य निर्मिती, वाहतूक, विक्री यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास या विभागाच्या टोल फ्री क्र. १८०० ८३३ ३३३३ व व्हॉटस अप क्र. ८४२२००१९३३ संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे.