‘त्या’ परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांची मैदानी चाचणी त्वरीत घ्या

आ.सतीश चव्हाण यांची विधान परिषदेत मागणी

औरंगाबाद- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने पोलिस उपनिरीक्षक पदाची पूर्व व मुख्य परीक्षा होऊन अडीच वर्षाचा कालावधी झाला असून यामध्ये उत्तीर्ण झालेल्या जवळपास दोन हजारांवर उमेदवारांची अद्यापही मैदानी चाचणीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी त्वरीत घेऊन त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारंसघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी शुक‘वारी विशेष उल्लेखाव्दारे विधान परिषदेत केली.

महाराष्ट्र लोकसेवा अयोगामार्फत 2018 मध्ये पोलिस उपनिरीक्षकपदाच्या 496 जागांसाठी जाहिरात काढण्यात आली होती. 24 मार्च 2019 रोजी पूर्व परीक्षा तर 4 ऑगस्ट रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आली. यामध्ये राज्यभरातून जवळपास 2 हजार 87 उमेदवार उत्तीर्ण झाले असून या पात्र उमेदवारांची मैदानी लगेच होणे अपेक्षीत होते. मात्र अद्यापही या उमेदवारांची मैदानी चाचणी अद्यापही पूर्ण न झाल्याने सदरील उमेदवारांना आर्थिक व मानसिक ताण सहन करावा लागत असून या मैदानी चाचणीकडे ते डोळे लावून बसले आहेत. मैदानी चाचणी उत्तीर्ण होण्याकरिता शरीर घडवण्यासाठी उमेदवारांना प्रतिमहा 10 ते 15 हजार रूपये खर्च करावे लागतात. बहुतांश पात्र उमेदवार हे शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य घरातील असल्याने त्यांना हा खर्च परवडत नसून अजून त्यांना किती दिवस प्रतिक्षा करायला लावणार? असा प्रश्न आ.सतीश चव्हाण यांनी औचित्याच्या मुद्याव्दारे उपस्थित केला.

उमेदवारांचे वाढते वय, वाढता खर्च तसेच ओमायक्रॉन या विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता सदरील पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी त्वरीत पूर्ण करून त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी सभागृहात केली