पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, 15 वर्षांच्या मुलांना 3 जानेवारीपासून लसीकरण!

नवी दिल्ली,२५ डिसेंबर/प्रतिनिधी:- पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गाच्या मुद्द्यावरुन संबोधित केलं. लहान मुलांना लसीकरणाला नववर्षापासून सुरुवात होणार आहे. तर सोबतच ओमायक्रॉनमुळे कोरोना योद्ध्यांना बुस्टर डोस देण्यात येणार आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. 

कोरोनाचे संकट अजून टळले नाही. आता ओमायक्रॉनचे नवे संकट आपल्यासमोर येऊन उभे ठाकले आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळा, मास्क वापरा. कोरोनाचे आलेले संकट आपल्याला पुन्हा एकदा टाळायचे आहे. ओमायक्रॉनच्या संकटामुळे पॅनिक होऊ नका पण सतर्क राहा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.

‘देशात कोरोनाचे संकट आले पण अजून हे संकट टळले नाही. त्याला रोखण्यासाठी आपण लसीकरण सुरू केले. मागील वर्षी 16 जानेवारीपासून आपण नागरिकांना लसीकरण सुरू केले होते. देशातील नागरिकांनी या अभियानाला साथ दिली. त्यामुळे भारतात 141 कोटी लोकांचे लसीकरण करण्याचे अभूतपूर्व आणि अवघड असे लक्ष पार केले, अजूनही देशभरात लसीकरण वेगाने सुरू आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधून कोरोनाच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली. यावेळी पंतप्रधानांनी १० जानेवारीपासून आरोग्य सेवक, डॉक्टर्स तसंच फ्रंट लाइनर्स यांना बूस्टर डोस देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे.

‘ओमायक्रॉन जगभरात पसरत आहे. आपले भारतीय संशोधक त्यावर नजर ठेवून आले. आतापर्यंत आपल्याकडे 18 वर्षांपर्यंतच्या व्यक्तीला लस घेण्यास परवानगी होती. पण, आता यापुढे १५ वर्षांपासून मुलांना लस घेता येणार  आहे. पुढील महिन्यात ३ तारखेपासून लसीकरण सुरू होणार आहे, अशी घोषणाही पंतप्रधानांनी केली.देशात 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. तर यानंतर बरोबर आठवड्यानंतर कोरोना योद्ध्यांना 10 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस देण्यात येणार आहे. 

कोरोनाच्या काळात या कोरोना योद्ध्यांनी आपल्या जीवावर उदार होवून आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडलं. आता देशात ओमायक्रॉनच्या विषाणूचा धोका आहे. त्यामुळे या कोराना योद्ध्यांना बूस्टर डोस दिला जाणार आहे. या निर्णयाचं सर्वच स्तरातून स्वागत केलं जात आहे.