आव्हाड म्हणतात, मुख्यमंत्री ठणठणीत,भाजपच्या नेत्यांनी रामाचा आदर्श तरी डोळ्यांसमोर ठेवावा- गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

मुंबई,२३ डिसेंबर /प्रतिनिधी:- समस्त भाजपवाले हे रामाचे नाव घेऊन सत्तेत आले. या भाजपच्या नेत्यांनी रामाचा आदर्श तरी डोळ्यांसमोर ठेवावा, अशी टीका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली.

मुख्यमंत्री विधिमंडळात उपस्थित नसल्याबाबत भाजपकडून सुरू असलेल्या विधानांबाबत आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली. राज्य व्यवस्थित चालले आहे, कुठेही अडचण येत नसून मुख्यमंत्री आमच्याशी रोज चर्चा करतात, कोणत्या विषयावर कोणती भूमिका घ्यायची याबद्दल व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन करतात, असे आव्हाड यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री हे आजारी आहेत. त्यांना दगदग न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असताना त्यांना शुभेच्छा देण्याऐवजी मुख्यमंत्री अधिवेशनात आलेच पाहिजेत असा राजकीय थयथयाट करणं अयोग्य आहे. मुख्यमंत्री असले तरी ते माणूसत आहेत. ते आजारी पडू शकतात, हे नैसर्गिक आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित होते व त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्र्याच्या तब्येतीवरुन संभ्रम निर्माण केला जात होता, तो चुकीचा आहे. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीवरुन जे राजकारण केले गेले ते विकृत असे होते. मात्र प्रश्न असा आहे‌ की, मागील काही दिवसांपासून पंतप्रधान संसदेत उपस्थित नाहीत तरीही संसद सुरु आहे. मग मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीवरूनच राजकारण कशाला? असा सवाल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.