क्रीडाविषयक विविध विकास योजनांसाठी 6801.30 कोटी रुपये वितरीत – केंद्रीय मंत्री अनुराग सिंग ठाकूर

नवी दिल्ली,२१ डिसेंबर/प्रतिनिधी:-क्रीडा हा विषय राज्यांच्या अखत्यारीतील असल्यामुळे, ग्रामीण पातळीवर सर्वसामान्य जनतेला क्रीडाविषयक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्राथमिकतेने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांवर असते. केंद्र सरकार त्यांच्या प्रयत्नांना पाठबळ पुरवीत असते. मात्र, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय ग्रामीण पातळीसह देशातील क्रीडा क्षेत्राचा विकास घडवून आणण्यासाठी पुढील योजना राबवित आहे: (1)खेलो इंडिया योजना, (2)राष्ट्रीय क्रीडा महासंघांना  मदत योजना (3)आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये यशस्वी झालेले क्रीडापटू आणि त्यांच्या प्रशिक्षकांना विशेष पारितोषिके, (4)राष्ट्रीय क्रीडा पारितोषिके (5)गुणवंत क्रीडापटूंना निवृत्तीवेतन, (6)पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय क्रीडा कल्याण निधी (7)राष्ट्रीय क्रीडा विकास निधी आणि (8) भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या माध्यमातून क्रीडा प्रशिक्षण केंद्रांचे परिचालन.

या सर्व योजनांचे सविस्तर तपशील मंत्रालय आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत. यासाठी लागणाऱ्या निधीचे वितरण राज्य/केंद्रशासित प्रदेश निहाय पद्धतीने न करता योजना-निहाय पद्धतीने केले जाते. गेल्या पाच वर्षांच्या काळात, मंत्रालयाच्या अनेक क्रीडा विकास योजनांसाठी 6,801.30 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली.