देशाच्या आर्थिक प्रगतीला चालना देण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सरकार वचनबद्ध– पंतप्रधान नरेंद्र मोदी

उद्योगजगताच्या विविध क्षेत्रांतील कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद

आत्मनिर्भर भारताचे पंतप्रधानांचे स्वप्न साकारण्यासाठी व्यक्त केली वचनबद्धता

नवी दिल्‍ली,२० डिसेंबर/प्रतिनिधी :-उद्योगजगताच्या विविध क्षेत्रांतील कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोक कल्याण मार्ग येथे संवाद साधला. आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी उद्योग प्रतिनिधींशी साधलेला अशाप्रकारचा हा दुसरा संवाद होता.

कोविडशी लढताना देशाने दाखवून दिलेल्या आंतरिक शक्तीबद्दल पंतप्रधान बोलले. उद्योजकांनी दिलेल्या माहिती आणि सूचनांबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले. पीएलआय म्हणजे उत्पादनाधारित प्रोत्साहन योजनेसारख्या धोरणांचा पूर्ण उपयोग करून घेण्याचे आवाहनही त्यांनी उद्योजकांना केले. “ज्याप्रमाणे ऑलिंपिकमध्ये देशाला पदकांची आकांक्षा असते त्याचप्रमाणे आपले उद्योगही जगात पहिल्या पाचांमध्ये असावेत असे देशाला वाटते. आणि यासाठी आपण सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत”, असे पंतप्रधान म्हणाले. शेती आणि अन्नप्रक्रिया अशा क्षेत्रांमध्ये कॉर्पोरेट क्षेत्राने अधिक गुंतवणूक केली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त पंतप्रधानांनी व्यक्त केली. नैसर्गिक / सेंद्रिय शेतीवर आता अधिक भर दिला जात असल्याचीही चर्चा त्यांनी यावेळी केली. सरकारचे धोरणात्मक सातत्य त्यांनी अधोरेखित केले. देशाच्या आर्थिक प्रगतीला चालना देणारी व विकासाचा वेग वाढविणारी पावले उचलण्यास सरकार वचनबद्ध असल्याचे ठाम प्रतिपादन त्यांनी केले. अटी आणि शर्तीची पूर्तता करण्याचा बोजा कमी करण्यावर सरकारचा भर असल्याचे ते म्हणाले. ज्या क्षेत्रांतील अनावश्यक अटी-शर्ती कमी करण्याची / काढून टाकण्याची गरज आहे, अशा क्षेत्रांबद्दल सूचना देण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी उद्योगजगताला केले.

उद्योग प्रतिनिधींनी त्यांचे अभिप्राय पंतप्रधानांना सांगितले. खासगी क्षेत्रावर विश्वास ठेवल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. पंतप्रधानांच्या  नेतृत्वामुळे तसेच त्यांच्या वेळोवेळी हस्तक्षेप आणि परिवर्तनात्मक सुधारणांद्वारे देशाची अर्थव्यवस्था कोविडनंतर सुधारण्याच्या मार्गावर, वाटचाल करत आहे, असे या प्रतिनिधींनी सांगितले.  त्यांनी पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत दृष्टिकोनामध्ये योगदान देण्याबाबत वचनबद्धता दर्शवली आणि PM गतिशक्ती, IBC इत्यादीसारख्या सरकारने उचललेल्या अनेक पावलांचे कौतुक केले. देशात व्यवसाय सुलभतेला चालना देण्यासाठी उचलल्या जाऊ शकणाऱ्या उपायांविषयी त्यांनी माहिती दिली. कॉप 26 मधील भारताच्या वचनबद्धतेबद्दल आणि उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उद्योग कसे योगदान देऊ शकतात याबद्दल देखील त्यांनी चर्चा केली. 

टी व्ही नरेंद्रन म्हणाले की सरकारने  उचित वेळी दिलेल्या प्रतिसादामुळे कोविड नंतर V अक्षराप्रमाणे स्थिती सुधारली.  संजीव पुरी यांनी अन्न प्रक्रिया उद्योगाला आणखी चालना देण्यासाठी सल्ला दिला. उदय कोटक म्हणाले की, पंतप्रधानांनी स्वच्छ भारत, स्टार्ट अप इंडिया इत्यादीसारख्या सोप्या पण सुंदरपणे मांडलेल्या सुधारणांद्वारे पथदर्शक बदल घडवून आणले आहेत.  शेषगिरी राव यांनी भंगार विषयक (स्क्रॅपेज) धोरण अधिक व्यापक कसे करता येईल याबद्दल सांगितले.  केनिची आयुकावा यांनी भारताला उत्पादन क्षेत्रातीलमोठा देश  बनवण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्याबाबत वचनबद्धता व्यक्त केली.  विनीत मित्तल यांनी कॉप 26 मध्ये पंतप्रधानांच्या पंचामृत वचनबद्धतेबद्दल माहिती दिली. सुमंत सिन्हा म्हणाले की ग्लास्गो येथील पंतप्रधानांच्या नेतृत्वाचे जागतिक समुदायातील सदस्यांनी खूप कौतुक केले.  प्रीथा रेड्डी यांनी आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळाला प्रोत्साहन  देण्याच्या उपायांबद्दल सांगितले. रितेश अग्रवाल यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग यासारख्या उदयोन्मुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्याच्या गरजेबद्दल अवगत केले.