अवघ्या दीड महिन्यात 45 हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी भरले 25 कोटींचे वीजबिल

महा कृषी ऊर्जा अभियानास औरंगाबाद परिमंडलात वाढता प्रतिसाद

औरंगाबाद,२० डिसेंबर/प्रतिनिधी:- कृषिपंपाच्या वीजबिलातील थकबाकीत सुमारे ६६ टक्के सूट मिळविण्याच्या संधीचा लाभ घेत गेल्या अवघ्या दीड महिन्याच्या कालावधीत  औरंगाबाद परिमंडलातील  45 हजार 768 शेतकऱ्यांनी 24 कोटी 75 लाख रुपयांचे वीजबिल भरले आहे. तर परिमंडलातील 3 हजार 124 शेतकरी पूर्णपणे थकबाकीमुक्त झाले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांनीही आपली वीजबिले भरून सहकार्य करण्याचे व वीजपुरवठा खंडित होण्याची कारवाई टाळण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

महा कृषी ऊर्जा अभियानात औरंगाबाद जिल्ह्यातील सव्वादोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या मूळ थकबाकीमधील 1038 कोटी 99 लाख रुपये माफ करण्यात आले आहेत. तर या शेतकऱ्यांनी चालू वीजबिल व सुधारित थकबाकीपैकी 50 टक्के रकमेचा येत्या मार्च 2022 पर्यंत भरणा केल्यास आणखी तब्बल 811 कोटी 71 लाख रुपयांची माफी मिळणार आहे. जालना जिल्ह्यातील 1 लाख 29 हजार 728 शेतकऱ्यांच्या मूळ थकबाकीमधील 775 कोटी 69 लाख रुपये माफ करण्यात आले आहेत. या शेतकऱ्यांनी चालू वीजबिल व सुधारित थकबाकीपैकी 50 टक्के रकमेचा येत्या मार्च 2022 पर्यंत भरणा केल्यास आणखी तब्बल 507 कोटी 40 लाख रुपयेही माफ करण्यात येणार आहेत.

            1 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर या अवघ्या दीड महिन्याच्या कालावधीत औरंगाबाद जिल्ह्यातील 32 हजार 62 शेतकऱ्यांनी 17 कोटी 55 लाख रुपये तर जालना जिल्ह्यातील 13 हजार 706 शेतकऱ्यांनी 7 कोटी 19 लाख रुपये वीजबिल भरून महा कृषी ऊर्जा अभियानात सहभाग घेत थकबाकीमुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 252 व जालना जिल्ह्यातील 872 शेतकरी सुधारित थकबाकीतील 50 टक्के रकमेसह चालू वीजबिले भरून पूर्णपणे थकबाकीमुक्त झाले आहेत. ग्राहकांकडे वीजबिलांची प्रचंड थकबाकी असल्याने महावितरण सद्यस्थितीत अत्यंत कठीण आर्थिक संकटात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषिपंपाच्या चालू वीजबिलांची रक्कम भरणे आवश्यक आहे. योजनेत सहभाग नाही तसेच चालू वीजबिलांचा भरणाही नाही अशा शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचा वीजपुरवठा नाईलाजाने खंडित करण्याची कारवाई सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी थकबाकीसह चालू वीजबिलांचा नियमित भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

थकबाकीमुक्त शेतकऱ्यांचा सत्कार

गांधेली येथील कौतिकराव नाथाजी नरवडे यांचे कृषिपंपाचे 2 लाख 51 हजार 159 रुपये बिल थकीत होते. महा कृषी ऊर्जा अभियानात 1 लाख 83 हजार 189 रुपयांची सवलत मिळवत त्यांनी उरलेले 67 हजार 970 रुपयांचे संपूर्ण वीजबिल भरले. तसेच भालगाव येथील आश्रू पुंजाजी डिघुळे यांचे कृषिपंपाचे 56 हजार 757 रुपये बिल थकीत होते.  या योजनेत त्यांना 24 हजार 367 रुपयांची सवलत मिळाल्याने उरलेले 32 हजार 390 रुपयांचे संपूर्ण वीजबिल त्यांनी भरले. या दोन्ही थकबाकीमुक्त ग्राहकांचा औरंगाबाद ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांच्या हस्ते सोमवारी (20 डिसेंबर) सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यकारी अभियंता विष्णू ढाकणे, सहायक अभियंता मनीष डिघुळे, सहायक लेखापाल सुनील बनसोड उपस्थित होते.