वैजापूर तालुक्यातील घायगांव येथे ड्रोन द्वारे “वॉटर ग्रीड” योजनेचे सर्वेक्षण ; आ.रमेश पाटील बोरणारे यांच्या हस्ते शुभारंभ

वैजापूर,२० डिसेंबर /प्रतिनिधी :- महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून वैजापूर व  गंगापूर या दोन तालुक्यातील ग्रामीण भागासाठी वॉटर ग्रीड योजना राबविण्यात येणार आहे. ही योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे.दोन्ही तालुक्यातील गावे आणि वाडया वस्तीवर वास्तव्याला राहणा-या नागरिकांपर्यंत पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याकरिता मुंबई येथील खाजगी यंत्रणेच्या माध्यमातून ” ड्रोन कँमे-याद्वारे प्राथमिक सर्वेक्षण मोहीमेचा ” शुभारंभ आ.रमेश बोरनारे यांच्या हस्ते घायगाव ता.वैजापूर येथे करण्यात आला.

राज्य शासनाच्या ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने पैठण तालुक्यात वॉटर ग्रीड प्रकल्पाला मंजुरी दिल्यानंतर पाणी टंचाईने होरपळणा-या वैजापूर व गंगापूर या दोन तालुक्यातील टंचाईग्रस्त ग्रामीण भागात गावासह वाडया वस्तीवरील रहिवासी नागरिक आणि त्यांच्याकडील पशुधनाला वॉटर ग्रीड योजनेच्या माध्यमातून  पाणीपुरवठा करण्याची भूमिका असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे प्रभारी उपअभियंता प्रवीण देशपांडे यांनी दिली.दोन्ही तालुक्यातील जवळपास ५०० गावे आणि वस्त्या असा आकारमान समोर ठेवून पाणीपुरवठा विभागाने ७५३ कोटी आर्थिक खर्चाचा कृति आराखडा तयार केला आहे.३१ मार्च अखेर पर्यंत प्रकल्पाचे आर्थिक अंदाजपत्रक आणि प्रकल्प अहवाल तयार करण्याचा सूचना असल्याचे उपअभियंता देशपांडे यांनी सांगितले. 
वॉटर ग्रीडला गोदावरीचे पाणी

कायगाव टोका येथील गोदावरी नदीपात्रातील पाणी या योजनेचे प्रमुख ” जलस्त्रोत ” आहे. मुख्य जलवाहिनीद्वारे वैजापूर व गंगापूर येथे उभारण्यात येणाऱ्या दोन स्वतंत्र जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पोहचवण्यात येईल. पाणी शुध्द करण्याच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ग्रामीण भागांना शाखानिहाय उपजलवाहिन्याद्वारे गावे, वाड्या वस्त्याना भूमिगत जलवाहिनीद्वारे पिण्याचे स्वच्छ व मुबलक प्रतिमाणसी ५५ लिटर पाणी पुरवठा कायमस्वरुपी देण्याचे नियोजन केले आहे.
ग्रामीण भागाची पाणी टंचाईचे संकट कायम स्वरुपी दूर होईल – आ.रमेश बोरनारे

वैजापूर, गंगापूर विधानसभा मतदार संघातील पिण्याचा पाणी प्रश्न ठोस उपाययोजना करावी या करिता मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे  लोकप्रतिनिधी या भूमिकेतून माझा पाठपुरावा होता असे आ.रमेश बोरनारे यांनी सांगितले.

गावपातळीवर विविध योजनेतून जलकुंभ आणि गावस्तरावर जलवाहिनी  (पाईपलाईन) टाकण्याच्या कामावर मोठा आर्थिक निधी खर्च झाला आहे.माञ पाणी टंचाईचे संकट वर्षानुवर्षे निर्माण होते.यांचे सखोलपणे अभ्यास केल्यावर असे समोर आले की योजनेसाठी गावात बारा महिने पाणी उपलब्धतेची हमी देणारे आश्वासक जलस्तोत्र नसल्यामुळे गावांना तीव्र पाणी टंचाईची झळ सोसावी लागते.विशेषतः उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट, टंचाई निवारण उपाय योजनेवर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यावर होणारा बेसुमार आर्थिक खर्चाची उधळपट्टी वॉटर ग्रीड योजना कार्यान्वित झाल्यानंतर बंद होईल असा दावा आ.रमेश बोरनारे यांनी बोलताना केले.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे, जिल्हापरिषद सदस्य रामहरीबापू जाधव, तालुकाप्रमुख सचिन वाणी, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख बाळासाहेब जाधव, कल्याण जगताप, सलीम वैजापुरी, युवासेनेचे आमेर अली, सरपंच हरिश्चंद्र साळुंके, मारुतीराव गायकवाड, रवी कसबे, हंसराज गवळी, प्रदीप साळुंके, कृष्णा धने, सुरेश शिंदे, विलास धने, अशोक साळुंके, रमेश साळुंके, मंडळ अधिकारी श्री.साळवे आदी उपस्थित होते.