गोव्याच्या जनतेने भारताच्या इतिहासात स्वातंत्र्याची ज्योत प्रदीर्घ काळ तेवत ठेवली-पंतप्रधान नरेंद्र मोदी

गोवा मुक्ती दिन समारंभाला पंतप्रधान उपस्थित

पंतप्रधानांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिक आणि ‘ऑपरेशन विजय’मध्ये सहभागी सैनिकांचा  सत्कार

गोवा  ,१८ डिसेंबर/प्रतिनिधी :- गोवा इथे आयोजित गोवा मुक्ती दिनाच्या समारंभात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. पंतप्रधानांनी या कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिक आणि ‘ऑपरेशन विजय’मध्ये सहभागी असलेल्या सैनिकांचा सत्कार केला.  नूतनीकरण केलेले फोर्ट अग्वादा  कारागृह संग्रहालय , गोवा वैद्यकीय महाविदयालयातील सुपर स्पेशालिटी ब्लॉक, न्यू साऊथ गोवा जिल्हा रुग्णालय, मोपा विमानतळावरील हवाई उड्डाण कौशल्य विकास केंद्र आणि दाबोळी-नवेली, मडगाव येथील गॅस इन्सुलेटेड उपकेंद्रांसह अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. गोवा येथील बार कौन्सिल ऑफ इंडिया ट्रस्टच्या भारतीय आंतरराष्ट्रीय विधी शिक्षण आणि संशोधन विद्यापीठाची पायाभरणीही त्यांनी केली.

गोव्याची भूमी, गोव्याची हवा, गोव्याच्या समुद्राला निसर्गाची अद्भूत देणगी लाभली आहे, असे पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले. आणि आज सर्वांचा, गोव्यातील जनतेचा हा उत्साह गोवा मुक्तीचा अभिमान द्विगुणित करत आहे. आझाद मैदानावरील शहीद स्मारकावर शहीद जवानांना आदरांजली वाहण्याचे सौभाग्य आपल्याला लाभल्याचे त्यांनी सांगितले. शहिदांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर ते मीरामारमधील सेल परेड आणि फ्लाय पास्टला उपस्थित राहिले.  देशाच्या वतीने ‘ऑपरेशन विजय’मध्ये सहभागी असलेल्या वीरांचा आणि माजी सैनिकांना गौरवल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. आज गोवा इथे एकत्रपणे अनेक गोष्टी करायला मिळाल्या, अनेक आश्चर्यकारक अनुभवमिळाले याबद्दल पंतप्रधानांनी गोव्याच्या चैतन्यशील भावनेचे आभार मानले.

भारताचा बहुतांश भाग मुघलांच्या अधिपत्याखाली असताना, गोवा पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली आला होता, असे पंतप्रधानांनी नमूद केले.  त्यानंतर झालेल्या अनेक उलथापालथींचा भारत साक्षीदार आहे. शतकानुशतके उलटून गेल्यावर आणि सत्तांच्या उलथापालथीनंतरही गोवा आपले भारतीयत्व विसरला नाही किंवा उर्वरित भारत गोव्याला विसरला नाही, असेही  मोदींनी नमूद केले.  हे असे नाते आहे, जे काळाबरोबरच अधिकाधिक घनिष्ठ होत गेले.  गोव्यातील जनतेनेही मुक्तीसंग्राम आणि स्वराज्याच्या चळवळींचा जोर  कमी होऊ  दिला नाही.  त्यांनी भारताच्या इतिहासातील  स्वातंत्र्याची ज्योत प्रदीर्घ काळ तेवत ठेवली.याचे कारण   भारत ही केवळ एक राजकीय शक्ती नाही.  भारत ही एक संकल्पना आहे आणि मानवतेच्या हिताचे रक्षण करणारे एक कुटुंब आहे.  पंतप्रधान म्हणाले, की भारत ही एक अशी आत्मभावना  आहे जेथे राष्ट्र ‘स्व’ च्या वर आहे आणि तिथे एकच सर्वश्रेष्ठ मंत्र आहे.  – राष्ट्र प्रथम;  जिथे एकच संकल्प आहे – एक भारत, श्रेष्ठ भारत.

पंतप्रधान म्हणाले, की  संपूर्ण भारतातील लोकांच्या मनात खदखद होती, कारण देशाचा एक भाग अजूनही मुक्त झाला नव्हता  आणि काही देशवासियांना स्वातंत्र्य मिळालेले नव्हते.  सरदार पटेल आणखी काही वर्षे जगले असते तर गोवा मुक्त होण्यासाठी एवढी प्रतीक्षा करावी लागली नसती, असे मत त्यांनी व्यक्त केले.  पंतप्रधानांनी संग्रामात सहभागी झालेल्या वीरांना नमन  केले.  गोवा मुक्ती विमोचन समितीच्या सत्याग्रहात 31 सत्याग्रहींना त्यांचे  प्राण गमवावे लागले.  या बलिदानांची आणि पंजाबच्या वीर कर्नल सिंग बेनिपाल यांच्यासारख्या वीरांची आठवण ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.  “गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास हा केवळ भारताच्या संकल्पाचे प्रतीक नाही तर भारताची एकता आणि अखंडतेचा जिवंत दस्तावेज आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.

काही वर्षांपूर्वी आपण इटली आणि व्हॅटिकन सिटीला गेलो असताना  आपल्याला पोप फ्रान्सिसना भेटण्याची संधी मिळाली असल्याची आठवण त्यांनी जागवली. भारताप्रति पोप यांचा दृष्टीकोनसुद्धा तेवढाच सहृद्य होता. आपण पोपना भारतात येण्याचे आमंत्रण दिल्याचेही त्यांनी सांगितले.  “आपण मला दिलेली ही सर्वोत्तम भेट आहे. ” अशा शब्दात फ्रान्सि पोप यांनी या आमंत्रणाला प्रतिसाद दिला होता. भारतातील विविधता आणि झळाळती लोकशाही यांबाबत पोपना असलेली आत्मीयता, अशा शब्दात पंतप्रधानांनी हा प्रसंग अधोरेखित केला. संत राणी केतवन याच्या पवित्र प्रतिमा जॉर्जियाच्या सरकारकडे हस्तांतरित करण्याबाबतही पंतप्रधानांनी सांगितले.

प्रशासनामध्ये गोव्याची प्रगती नमूद करताना पंतप्रधानांनी गोव्याचे नैसर्गिक सौंदर्य हे नेहमीच त्याची खरी ओळख राहिली आहे असे सांगितले.  मात्र हे  सरकार आता  गोव्याची नवी ओळख निर्माण करत असल्याचेही ते म्हणाले. राज्याची नवी ओळख निर्माण करणे ही कोणत्याही कामात सरकारची प्राथमिकता असल्याचे त्यांनी नमूद केले. हागणदारीमुक्त राज्य, लसीकरण, हर घर जल, जन्म मृत्यू नोंदणी यासारख्या सामान्य माणसांचे जीवन सुखकर करणाऱ्या योजनांमध्ये गोव्यातील नामांकितांनी दिलेल्या योगदानाचा त्यांनी उल्लेख केला. स्वयंपूर्ण गोवा या योजनेच्या कामगिरीचा त्यांनी उल्लेख केला. मुख्यमंत्री आणि त्यांच्या टीमची प्रशंसा करत त्यांनी राज्यात पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी उचलेल्या पावलांचा त्यांनी उल्लेख केला.  नुकत्याच भारतात होउन गेलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे यजमानपद उत्कृष्टपणे निभावल्याबद्दल त्यांनी कौतुक केलं.

पंतप्रधानांनी दिवंगत मनोहर पर्रिकरांना आदरांजली वाहिली. “मला जेव्हा गोव्याची ही कामगिरी दिसते, नवी ओळख दृढ होताना दिसते तेव्हा मला मनोहर पर्रिकर या माझ्या मित्राची आठवण येते. त्यांनी गोव्याला विकासाची नवी शिखरेच गाठून दिली नाहीत तर गोव्याच्या क्षमतेत देखील त्यांनी वाढ केली. एखादी व्यक्ती आपल्या राज्यासाठी, तेथील जनतेसाठी स्वतःला किती प्रमाणात वाहून घेऊ शकते, तर शेवटच्या श्वासापर्यंत, याचे दर्शन त्यांच्या जीवनाने आम्हाला घडवले. संपूर्ण देशाने मनोहर पर्रिकरांमध्ये प्रामाणिकपणा, हुशारी आणि माणसांचा व्यासंग याचे प्रतिबिंब  पाहिले.”  असे पंतप्रधानांनी सांगितले.