वृध्‍देचा खून करणाऱ्या आरोपीला अटक

औरंगाबाद,१९ डिसेंबर /प्रतिनिधी:-लोखंडी खाट चोरल्याचा जाब विचारल्याच्‍या कारणावरुन वृध्‍देचा खून  करणाऱ्या आरोपीला गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने रविवारी दि.१९ पहाटे अटक केली. सचिन मंडक नवरडे (२४, रा. जडगांव, औंढानागनाथ जि. हिंगोली ह.मु. करोडी ता.जि. औरंगाबाद) असे अरोपीचे नाव असून त्‍याला २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.एस. मांजरेकर यांनी दिले.

या प्रकरणात मयत बाळडाबाई गोविंद नरवडे (रा. करोडी) यांची मुलगी अनुसया हिरालाल सोनवणे (३५, रा. औरंगपुरा) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, फिर्यादीची आई व भाऊ करोडी येथे राहत होता. दोन महिन्‍यांपूर्वी फिर्यादीचा भाऊ ऊस तोडीसाठी गेल्यामुळे फिर्यादीची आई फिर्यादीच्‍या घरी राहत होती. ११ डिसेंबर रोजी फिर्यादीच्‍या मोठ्या भावाचे वर्षश्राध्‍द असल्याने ९ डिसेंबर रोजी फिर्यादीची आई करोडी येथे आली होती. मात्र १० डिसेंबर रोजी फिर्यादीची आई पुन्‍हा फिर्यादीकडे आली. त्यावेळी तिने करोडी येथे राहणारा सचिन नरवडे याने घरातील लोखंडी खाट चोरुन नेली. व त्‍या खाटेच्‍या लोखंडी पाईप विक्री करुन दोऱ्या कापून घरात आणुन टाकल्या. त्‍याबाबत फिर्यादीच्‍या आईने सचिनला जाब विचारला असता, याबाबत कोणाला काही सांगु नको, नाहीतर तुला बघुन घेईन अशी धमकी दिली. अशी माहिती फिर्यादीला सांगितली.

११ डिसेंबर रोजी फिर्यादीच्या मोठ्या भावाचे वर्षश्राध्‍द असल्याने फिर्यादीसह त्‍यांचे नातेवाईक करोडी येथे गेले होते. दुसऱ्या दिवशी सर्व नातेवाई आप-आपल्या घरी पतरले. तेव्‍हा फिर्यादीची आई करोडी येथील घरी एकटीच होती. १६ डिसेंबर रोजी करोडी येथील ओळखीच्‍या व्‍यक्तीने फिर्यादीला फोन करुन तुझ्या आईचा खून झाल्याचे सांगितले. प्रकरणात दौलताबाद पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपीला आज पोलिसांनी अटक करुन न्‍यायालयात हजर केले असता, सहायक सरकारी वकील समीर बेदरे यांनी आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहे काय, आरोपीने गुन्‍हा करण्‍यासाठी वापरलेले हत्‍यार जप्‍त करायचे आहे. आरोपी गुन्‍हा घडल्यापासून कोठे पसार झाला होता याचा तपास करायचा आहे. गुन्‍हा करण्‍यामागे आरोपीचा नेमका हेतू काय होता याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.