देशात बरे होण्याचा दर 60% हून अधिक, 24 तासांत 20,033 रुग्ण बरे

“चाचणी, रुग्णशोध, उपचार” धोरणानुसार, गेल्या 24 तासांत 2.4 लाखाहून अधिक चाचण्या
Description: Image

नवी दिल्‍ली,  3 जुलै 2020


कोविड -19 च्या तयारीबाबत आज राज्ये / केंद्रशासित प्रदेशांसमवेत कॅबिनेट सचिवांनी उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली.

कोविड -19 रुग्ण बरे होण्याच्या दराने आज 60% चा टप्पा पार केला. आज हे प्रमाण 60.73% आहे.

कोविड -19 रुग्णांचा प्राथमिक अवस्थेत असताना शोध घेऊन वेळेवर केलेल्या रुग्णालयीन व्यवस्थापनामुळे दररोज रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या 24 तासांत एकूण 20,033 कोविड -19 रूग्ण बरे झाले असून त्यामुळे आत्तापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या 3,79,891 पर्यंत पोहोचली आहे.

सध्या 2,27,439 सक्रिय रुग्ण असून ते सर्व वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.

कोविड-19 च्या प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी सर्व स्तरातील शासनाच्या समन्वित प्रयत्नांमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणि सक्रिय रुग्ण यातील तफावत सातत्याने वाढत आहे. आजमितीस सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्ण 1,52,452 हून अधिक आहेत. 

कोविड-19 चाचणीतील सर्व अडथळे दूर करण्यासाठी राबविण्यात आलेले “चाचणी, रुग्णशोध, उपचार” धोरण आणि राज्ये / केंद्रशासित प्रदेशांकडून व्यापक चाचणीची सोय करण्यासाठी अलीकडेच झालेल्या विविध उपाययोजनांमुळे दररोज चाचणी घेतल्या गेलेल्या नमुन्यांमध्ये निरंतर वाढ झाली आहे. आत्तापर्यंत 93 लाख नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 2,41,576 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. आतापर्यंत चाचणी केलेल्या नमुन्यांची एकूण संख्या 92,97,749 आहे.

देशातील चाचणी प्रयोगशाळांची संख्या आणखी वाढविण्यात आल्यामुळे देखील हे शक्य झाले आहे. शासकीय प्रयोगशाळांची संख्या 775 पर्यंत तर खाजगी प्रयोगशाळांची संख्या 299 पर्यंत वाढली आहे ज्यामुळे देशात एकूण 1074 प्रयोगशाळा झाल्या आहेत. वर्गवारी खालीलप्रमाणे:

  • जलद आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा: 579 (शासकीय: 366 + खाजगी: 213)
  • ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा: 405 (शासकीय: 376 + खाजगी: 29)
  • सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा: 90 (शासकीय: 33 + खाजगी:  57)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *