राज्यांना दोन कोटींपेक्षा जास्त एन-95 मास्क्स आणि एक कोटींपेक्षा जास्त पीपीई विनामूल्य वितरीत

नवी दिल्‍ली,  3 जुलै 2020

कोविड-19 चा प्रसार, संसर्ग  रोखण्यासाठी आणि त्याच्या व्यवस्थापनासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यासह अथक प्रयत्न करत आहेत. महामारीशी लढण्यासाठी आरोग्ययंत्रणा सक्षम करणे ही केंद्रची मध्यवर्ती भूमिका आहे.

कोविड-19 संबधित सुविधा वाढवण्यासोबतच केंद्र, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना वैद्यकिय साहित्याचा विनामूल्य पुरवठा करत आहे. भारत सरकारने पुरवठा केलेले बरेचसे साहित्य हे सुरुवातीला देशात उत्पादित केलेले नव्हते, तसेच महामारीच्या काळात जागतिक पातळीवर असलेल्या वाढीव मागणीमुळे विदेशी बाजारात सहजपणे उपलब्धही नव्हते.

तरीही, आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय, वस्त्रोद्योग मंत्रालय आणि औषध विभाग, उदयोग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभाग  (DPIIT), संरक्षण, संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि इतरांच्या सहकार्याने या कालावधीत देशांतर्गत उद्योगांना पीपीई, एन-95 मास्क्स, व्हेंटिलेटर्स आदी महत्वाच्या वैद्यकिय साहित्याचे उत्पादन आणि पुरवठा करण्यास प्रोत्साहन मिळाले. याचा परिणाम म्हणजे आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या कल्पना  दृढ झाल्या आणि भारत सरकारकडून पुरवठा केल्या गेलेल्या बहुतांश वस्तू देशांतर्गत उत्पादित झाल्या.

1 एप्रिल 2020 पासून केंद्राने 2.02 कोटींपेक्षा जास्त एन-95 मास्क्स आणि 1.18 कोटींहून जास्त पीपीई संच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना विनामूल्य वितरीत केले. याशिवाय 6.12 कोटींहून जास्त HCQ गोळ्याही त्यांना वितरित केल्या.

याशिवाय आतापर्यंत 11,300 ‘मेक इन इंडिया’ व्हेंटिलेटर्स विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेश, केंद्रीय संस्था यांना पाठवण्यात आले त्यापैकी 6154 व्हेंटिलेटर विविध रुग्णालयापर्यंत पोचवले आहेत.  आरोग्य मंत्रालयाने 1.02 लाख ऑक्सिजन सिलेंडर  राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना पाठवले त्यापैकी 72,293 हे थेट ऑक्सिजन बेडला लावता येण्यासारखे होते .

आतापर्यंत, आरोग्य मंत्रालयने 7.81 लाख पीपीई आणि 12.76 लाख एन95 मास्क दिल्लीत, 11.78 लाख पीपीई आणि 20.64 N95 मास्क महाराष्ट्रात, आणि 5.39 लाख पीपीई आणि 9.81 लाख एन95 मास्क तामिळनाडूला दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.