पोलिस अधिकाऱ्यांची विभागीय परीक्षा आता ऑगस्टमध्ये!

परीक्षेसाठी पुस्तकासह परवानगी – गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई, दि. ३ : परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त यांची विभागीय परीक्षा आता ऑगस्टमध्ये घेण्यात येणार असून त्यांना परीक्षेसाठी पुस्तकासह परवानगी असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस यंत्रणेवर कामाचा प्रचंड ताण आहे. त्यामुळे परीक्षेची तयारी करण्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना पुरेसा कालावधी उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे सदर परीक्षा रद्द करण्याची मागणी राज्यातून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आली होती. त्यावर उपरोक्त निर्णय घेण्यात आला. या वर्षासाठीच्या दोन परीक्षांकरिता पुस्तकांसहित परीक्षेची परवानगी दिली असल्याचे श्री.देशमुख यांनी सांगितले.

पोलिस उपअधीक्षक/ सहायक पोलिस आयुक्त (नि:शस्त्र ) या पदावर सरळसेवेने नियुक्त झालेल्या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांसाठी, त्यांचा परिविक्षाधीन कालावधी संपल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत या विभागीय परीक्षेचे आयोजन करण्यात येत असते. सदरील परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाते. मात्र जुलै २०१३ नंतर आयोगामार्फत अशी विभागीय परीक्षा आयोजित करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यातील १८२ अधिकारी ही परीक्षा देणे बाकी आहेत. २२ मे २०२०च्या शासन निर्णयान्वये पोलीस अधिकारी (निवडश्रेणी व उच्च श्रेणी) यांच्या विभागीय परीक्षांचा अभ्यासक्रम सुधारित करण्यात आला. सदर परीक्षा आता अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) आणि महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक यांच्यामार्फत घेण्यात येणार आहे, असेही श्री.देशमुख यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *