विधान परिषद निवडणुकीचा निकाल हा भाजपाच्या बाजूने,पैशाचा वापर करून घोडेबाजार-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक

मुंबई,१४ डिसेंबर /प्रतिनिधी:-अकोला आणि नागपूर विधान परिषद निवडणुकीचा निकाल हा भाजपाच्या बाजूने गेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडून आलेले उमेदवार या निवडणुकीत मतदान करतात. यामध्ये पैशाचा वापर करून घोडेबाजार झाला आहे हे स्पष्ट आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. मतदारांना खरेदी करण्यात आले हे कुठेतरी थांबायला हवे यासाठी राज्य सरकार पाऊले टाकणार आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.

राज्यसभेतही पैसे घेऊन अशाप्रकारे क्रॉस मतदान होत असताना संसदेत याविषयी कायदा करण्यात आला आहे. अशाप्रकारचा कायदा विधान परिषद निवडणुकीसंदर्भात करायला हवा, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली.

राज्य सरकारला अधिकार असेल तर आम्ही कायदा करू मात्र अधिकार नसेल तर संसदेत केंद्र सरकारने कायदा करून ही सगळी निवडणूक पारदर्शक व उघडपणे मतदान पद्धतीने झाली पाहिजे, अशी शिफारस केंद्र सरकारकडे करू, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.